Breaking News

‌‘नेहले पे देहला‌’ @ ५० वर्षे; पडद्यामागच्या गोष्टी जास्त रंजक

सुनील दत्तच्या वांद्य्रातील पाली हिलवरील अजंठा बंगल्यातील तळघरात असलेल्या मिनी थिएटरमध्ये एखादा चित्रपट अथवा गाणी पाहायला जाताना कायमच दिलीपकुमारच्या बंगल्यावर नजर पडायचीच. मीडियात असल्यानेच हा एक वेगळाच अनुभव. दिलीपकुमार आणि सुनील दत्त हे सख्खे शेजारी. ते कधीच कोणत्याही चित्रपटात एकत्र आले नाहीत, पण सुनील दत्त आणि सायरा बानू यांनी नायक नायिका साकारली आणि त्यात एक चित्रपट होता ‌‘नेहले पे देहला‌’. मुंबईत हा चित्रपट २ एप्रिल १९७६ रोजी प्रदर्शित झाला, म्हणजेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाला पन्नास वर्षे पूर्ण झाली.
मुंबईत या चित्रपटाचे मुख्य चित्रपटगृह शालिमार होते. हा गुन्हेगारीपट अगदीच साधारण मसालेदार मनोरंजक होता (म्हणाली तशी भट्टी जमली नव्हती) म्हणून चित्रपट रसिकांनीही त्याला तेवढेच साधारण स्वरुपाचे यश दिले. प्रेक्षक उगाच एखाद्या चित्रपटासाठी वेळ, पैसा आणि येण्या-जाण्यासाठी शक्ती खर्च करत नाहीत. अजंठा आर्ट्स या आपल्या बॅनरखाली सुनील दत्त यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आणि दिग्दर्शन राज खोसला यांचे आहे.
सुनील दत्तने आपल्या या चित्रपटाचे काही दिवसांचे चित्रीकरण आपल्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावरील प्रशस्त हॉलमध्ये करायचं ठरवलं. सगळेच फिल्मवाले चित्रपट निर्मितीत पैशाची उधळपट्टी करत नाहीत. सायरा बानूला तर आपल्या बंगल्याजवळच हे चित्रीकरण असल्याने अधिक आनंद. आपल्या बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावरून सुनील दत्तच्या पहिल्या मजल्यावरील चित्रीकरण दिसत असल्याने तिने आपल्या घरातूनच मेकअप करून जायचं ठरवलं. तसं ती करे आणि सुनील दत्तने आपल्या प्रॉडक्शनमधील एकाला वेगळीच कामगिरी दिली. दिग्दर्शक राज खोसला यांनी ‘ मॅडम को बुलाव, शॉट रेडी है’ असं म्हणताच तो प्रॉडक्शन बॉय शिट्टी वाजवून सायरा बानूला सेटवर बोलवत असे. साधारण आठवडाभर हे चित्रीकरण होत असताना हे शिट्टी वाजवणे झाले. हे पाहून दिलीपकुमारने सुनील दत्तला म्हटले, असं हे शिट्टी वाजवून सायराना सेटवर बोलावण्यापेक्षा आपण दोघांच्या घराला जोडणारा एक पूल बांधूयात. हे ऐकून सुनील दत्त आणि सायरा बानू मनापासून हसले.
ही अतिशय वेगळी अशी गोष्ट, सुनील दत्तच्या २००४च्या जन्मदिनानिमित्त सोशल मीडियात पोस्ट केली. केवढा एक्सलुझिव्ह किस्सा बघा.( सोशल मीडियावर अशा अनेक एक्सुझिव्हज आठवणी, गोष्टी, किस्से असतात ही एक जमेची बाजू) सुनील दत्तच्या निधनानंतर संजय दत्तने अजंठा बंगला आणि त्यातील मिनी थिएटर, एडिटिंग रुम हे सगळे पाडून त्या जागी नवीन चकाचक आधुनिक शैलीची इमारत उभारली आहे. काळ बदलला, हेतू बदलले. जगणं बदललं.
आपण एकत्र काम करावं असं अगदी साठच्या दशकात सुनील दत्त आणि सायरा बानू यांना वाटत होतं, पण तेव्हा दक्षिणेकडील काही चित्रपटांसाठी (खानदान, मिलन वगैरे) तशी ऑफरही होती. सुनील दत्तचे म्हणणे होते, एखाद्या प्रेमकथेसाठी आपण एकत्र येऊयात. सायरा बानू त्या काळातील एक सौंदर्यवान अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात (राजेंद्रकुमार सायरा बानूकडे आकर्षित झाला आहे असे गॉसिप्स मॅगझिनमधून केवढे तरी पिकवले, शिजवले गेले) ज्योती स्वरूप दिग्दर्शित ‌‘पडोसन‌’ (१९६८) या भन्नाट विनोदीपटात सुनील दत्त आणि सायरा बानू पहिल्यांदाच एकत्र आले. पिक्चर सुपर डुपर हिट ठरला. कधीही पहावा
झक्कास टाईमपास.
‌‘नेहले पे देहला‌’बद्दल काय सांगू? दिग्दर्शक राज खोसला माझ्या अतिशय आवडत्या दिग्दर्शकातील एक. त्यांच्या ‌‘नकाब‌’ (१९८४) या चित्रपटाच्या निमित्ताने वांद्य्रातील पाली हिलवरील निवासस्थानी मुलाखतीसाठी भेटलो असता त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक जुन्या चित्रपटांच्या चित्रीकरणाच्या वेळच्या गोष्टी सांगितल्या. त्यात ‌‘नेहले पे देहला‌’बद्दल बोलण्यासारखे काहीही नव्हते. सत्तरच्या दशकातील एक हुकमी फॉर्मुला म्हणजे मा बाप के खून का बदला आणि चित्रपटाच्या पहिल्या रिळात लहानपणी हरवलेले दोन भाऊ मोठे झाल्यावर चित्रपटाच्या क्लायमॅक्सला भेटणे आणि आपल्या आई वडिलांच्या खुनाचा बदला घेताना खलनायकाची धुलाई करणे. चित्रपटाची सुरुवात आणि शेवट यांच्या दरम्यानचा मनोरंजनाचा खचाखच मसाला म्हणजे पिक्चर असे सरळ साधे गणित होते. ते जमलं की पब्लिक खुश आणि जर गणित फसलं तर पब्लिक नाराज. असा एकदम सिधा हिसाब. या चित्रपटाची मनोरंजनाची खिचडी जास्त शिजली नाही. खौपनाक खलनायक (प्रेमनाथ) एका प्रकरणात एक खून करतो, त्यात दोन लहान भाऊ हरवतात. त्यातला एक राम (सुनील दत्त) आणि दुसरा रहिम (विनोद खन्ना) भिन्न धर्मामध्ये लहानाचे मोठे होतात. हे बरे असते. सर्वधर्मसमभाव साधता येतो. रामची प्रेयसी बीना (सायरा बानू). या चित्रपटात बिंदू, रणजित, त्रिलोक कपूर, देव कुमार, ओम प्रकाश, अन्वर हुसेन, कामिनी कौशल, भारत भूषण इत्यादींच्याही भूमिका. राहुल देव बर्मनच्या संगीतातील सावन का महिना आ गया हे गाणे बरं होते.
आश्चर्य वाटले ते दिग्दर्शक राज खोसला यांचे. खरंतर गुरूदत्तच्या दर्जाचा दिग्दर्शक. गुरूदत्त दिग्दर्शक आणि अभिनेताही. जास्त कौतुक वाट्याला आले. तशी गुणवत्ताही होती. राज खोसला यांनी दिग्दर्शित केलेल्या सीआयडी (१९५६), काला पानी (१९५८), सोलवा साल (१९५८), एक मुसाफिर एक हसिना (१९६२), वो कौन थी (१९६५), मेरा साया (१९६६), दो बदन (१९६६), दो रास्ते (१९६९), मेरा गाव मेरा देश (१९७१), कच्चे धागे (१९७३), प्रेम कहानी (१९७५), मै तुलसी तेरे आंगन की (१९७८), दोस्ताना (१९८०) हे चित्रपट विषयातील केवढी तरी विविधता दाखवताहेत. (याशिवाय त्यांचे शरीफ बदमाश वगैरे चित्रपट जमले नव्हते.) एकच दिग्दर्शक रहस्यमय, भयपट, गुन्हेगारीपट, सामाजिक चित्रपट, डाकूपट, प्रेम त्रिकोण अशी केवढी तरी विविधता दाखवतो आणि या प्रत्येक चित्रपटातील गाण्यांचे टेकिंग अप्रतिम. ‌‘नेहले पे देहला‌’मध्ये राज खोसलाचा टच दिसला नाही. निर्माता म्हणून सुनील दत्तही विशेष कारागिरी करण्यात अपयशी. अन्यथा अजंठा आर्ट्‌‍स या बॅनरखाली मोनी भट्टाचार्य दिग्दर्शित मुझे जीने दो, सुनील दत्त दिग्दर्शित यादे (हा एकपात्री चित्रपट आहे), रेश्मा और शेरा असे दर्जेदार चित्रपट निर्माण केले. नेहले पे देहला सत्तरच्या दशकातील ठोकळेबाज आणि नियोजनाचा अभाव असलेला चित्रपट वाटला. मुंबईत शालिमार चित्रपटगृहात तरीही शंभर दिवसांचे यश प्राप्त केले. हे आश्चर्यच. त्या काळातील चित्रपट रसिकांच्या माफक अपेक्षा असत आणि या चित्रपटातील कलाकार लोकप्रिय होते. तेवढेही पुरेसं होतं. आवडत्या कलाकाराला पडद्यावर पाहण्यासाठी किमान एकदा तरी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणारे फिल्म दीवाने होते. प्रेम प्रेम प्रेम म्हणतात ते हेच.
नेहले पे देहलाच्या बरोबरच (म्हणजे शुक्रवार दिनांक २ एप्रिल १९७६ रोजी) प्रमोद चक्रवर्ती दिग्दर्शित ‌‘बारुद‌’ ( ऋषि कपूर आणि शोमा आनंद) आणि एस. रामनाथन दिग्दर्शित ‌‘सबसे बडा रुपय्या‌’ (मेहमूद, विनोद मेहरा, मौशमी चटर्जी आणि फरिदा जलाल) हेही चित्रपट प्रदर्शित झाले आणि त्यांच्या प्रदर्शनासही पन्नास वर्षे पूर्ण झाली. पण हे चित्रपट प्रदर्शित होत असताना रमेश सिप्पी दिग्दर्शित ‌‘शोले‌’(१९७५)ची अक्राळविक्राळ क्रेझ जराही कमी झाली नव्हती. त्या वातावरणात टिकून राहण्यासाठी पिक्चरही तसा सॉलीड हवा होता…

  • दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

Check Also

‌‘एसआयआर‌’संदर्भात सर्वपक्षीय शिष्टमंडळाची प्रशासनाशी चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाच्या …

Leave a Reply