आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती; संयुक्त बैठक आणि पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल येथील एसटी डेपोचे बांधकाम गेली अनेक वर्षे प्रलंबित होते, परंतु आता या प्रकल्पाला गती देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याची माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. त्यामुळे दीर्घकाळ रखडलेल्या या प्रकल्पाला आता गती मिळणार आहे.
या संदर्भात गुरुवारी (दि.३०) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत एसटीचे महाव्यवस्थापक दिनेश महाजन, संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिकाऱ्यांसमवेत डेपो परिसराची पाहणीही केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, पनवेल एसटी डेपोचा प्रश्न अनेक वर्षांपासून चर्चेत असून काही प्रमाणात तो नागरिकांच्या संतापाचाही विषय बनला आहे. सुरुवातीला रत्नागिरी मॉडेलवर डेपो उभारण्याचा विचार होता. त्यानंतर बीओटी पद्धतीने काम करण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र विमानतळ प्राधिकरणाच्या हद्दीत येणारा भाग, पर्यावरणीय परवानग्या तसेच इतर प्रशासकीय अडचणींमुळे प्रकल्पात मोठा विलंब झाला. यामध्ये बऱ्याच अंशी कंत्राटदारही कारणीभूत आहे. आता हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी ठोस निर्णय घेण्यात आले आहेत. विशेषतः पावसाळा जवळ आल्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
डेपोच्या बांधकामासाठी आणि झाडे तोडण्यासाठी आवश्यक परवानग्या तसेच बांधकामासंदर्भातील इतर अडथळे दूर करण्यासाठी संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकल्पात एकूण जागेच्या ५५ टक्के भागावर एसटी डेपो आणि वर्कशॉप उभारण्यात येणार आहे, तर उर्वरित ४५ टक्के जागा डेव्हलपरला देण्यात येणार असून डेव्हलपरला दिलेल्या जागेतूनच डेपोचा खर्च उचलला जाणार आहे. संबंधित सर्व परवानगी मिळाल्यानंतर २४ महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि साहित्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. आम्ही सर्वजण एसटी डेपोची इमारत लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी पाठपुरावा करत आहोत, असेही आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले
या बैठकीला पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, महिला व बालकल्याण सभापती ममता म्हात्रे, पंचायत समितीचे उपसभापती भूपेंद्र पाटील, नगरसेवक गणेश कडू, भाजप शहराध्यक्ष नगरसेवक सुमित झुंजारराव, अनुसूचित जाती सेल उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष सदस्य अमित जाधव, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, नगरसेविका रूचिता लोंढे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, नगरसेवक, इतर पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper