Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर ‌‘रयत‌’चे ऋण फेडणारे आधुनिक एकलव्य -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणजे विकासाचे कणखर नेतृत्व ः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
सामान्य माणसाने असामान्यत्वाच्या शिखरावर कसे पोहोचावे याचे तेजस्वी उदाहरण म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास होय. संघर्ष, कष्ट, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेच्या बळावर एखादा व्यक्ती जनमानसाच्या हृदयावर अधिराज्य गाजवू शकतो हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवले आहे. ज्या रयत शिक्षण संस्थाने त्यांना घडवलं, संस्कार दिले, जीवनाला दिशा दिली; त्याच मातृसंस्थेला आजवर तब्बल १३५ कोटी रुपयांहून अधिक रकमेची गुरुदक्षिणा अर्पण करून त्यांनी आधुनिक काळातील एकलव्य ही ओळख अक्षरशः सार्थ ठरवली आहे. ही केवळ देणगी नाही, तर शिक्षण, संस्कार आणि गुरूऋणाप्रती असलेली त्यांची अथांग कृतज्ञता आहे, असे गौरवोद्गार राज्याचे कार्यकुशल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उलवे नोड येथील सोहळ्यात काढले.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी, या परिसरात भाजपची ताकद नगण्य होती, पण लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यामुळे भाजपचा रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे अधोरेखित करून लोकनेते रामशेठ ठाकूर हे केवळ उद्योजक नसून भूमिपुत्रांच्या हक्कासाठी लढणारे आणि विकासाला गती देणारे कणखर नेतृत्व आहेत, अशा शब्दांत त्यांचा गौरव केला.
गोरगरिबांचे आधारस्तंभ, सर्व समाजाचे प्रेरणास्थान, थोर दानशूर व्यक्तिमत्व आणि जनसामान्यांच्या हक्कासाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन सत्कार सोहळा तसेच जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था संचलित रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या नवीन अत्याधुनिक इमारतीचा उद्घाटन सोहळा उलवे नोड येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत भव्य, दिव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, प्रशासकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक, वैद्यकीय आणि विधी क्षेत्रातील हजारो मान्यवर, हितचिंतक, आणि जनसागराच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे हा सोहळा ऐतिहासिक ठरला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, पुष्पगुच्छ आणि चाफ्याच्या फुलांची परडी आणि सन्मानचिन्ह देऊन लोकनेते रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर यांचे अभीष्टचिंतन करण्यात आलेे. अनेक मान्यवर, हितचिंतक, नागरिकांनी उपस्थित राहून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याविषयीचा आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली.
उलवे नोड सेक्टर १२ येथील रामशेठ ठाकूर मैदानावर झालेल्या या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, सांस्कृतिकमंत्री ॲड.आशिष शेलार, महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी, फलोत्पादन व खारजमीन विकासमंत्री भरत गोगावले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व रायगडचे खासदार सुनील तटकरे, मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार दिलीप वळसे-पाटील, आमदार रविशेठ पाटील, आमदार मंदा म्हात्रे, आमदार महेंद्र दळवी, आमदार विक्रांत पाटील, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी खासदार धैर्यशील पाटील, माजी आमदार पंडित पाटील, माजी आमदार देवेंद्र साटम, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक आमदार प्रशांत ठाकूर, लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव वर्ष नियोजन समितीचे अध्यक्ष आमदार महेश बालदी, ज्येष्ठ नेते व समितीचे कार्याध्यक्ष जे.एम.म्हात्रे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ‌काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, ‘दिबां‌’चे पुत्र अतुल पाटील, पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेल पंचायत समिती सभापती रंजना वास्कर, उपभापती भूपेंद्र पाटील, खालापूर पंचायत समितीचे सभापती कृष्णा पारंगे, जिल्हाधिकारी किशन जावळे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे, पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, संचालक व नगरसेवक परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, उरणचे उपनगराध्यक्ष रवी भोईर, पनवेल महापालिकेचे सभागृहनेते ॲड. प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, महिला व बाल कल्याण सभापती ममता म्हात्रे, रायगड जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, जेबीएसपी संस्थेचे संचालक संजय भगत, जिल्हा परिषद सदस्य निकिता खारकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवनप्रवास, संघर्ष, सामाजिक कार्य आणि राजकीय वाटचालीचा आणि कार्याचा गौरव करणाऱ्या व विस्तृत आढावा घेणाऱ्या ‌‘रामपर्व‌’ या विशेष पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या सोहळ्यात करण्यात आले. या क्षणी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करत आनंद व्यक्त केला तसेच उलवे परिसरातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे या उद्देशाने उभारण्यात आलेल्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या अत्याधुनिक इमारतीचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
प्रशस्त वर्गखोल्या, सुसज्ज प्रयोगशाळा, डिजिटल शिक्षणसुविधा, आधुनिक क्रीडांगण आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धतीमुळे ही संस्था परिसरातील शैक्षणिक क्षेत्रासाठी नवी दिशा ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, प्रशासकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक, वैद्यकीय आणि विधी क्षेत्रातील मान्यवर नागरिकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण कार्यक्रमाला अभूतपूर्व उंची प्राप्त झाली. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वी केला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित हा भव्य सोहळा समाजसेवा, शिक्षणप्रेम, सामाजिक ऐक्य आणि लोकहिताचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला.
आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज आपण करत असलेला हा सत्कार केवळ एका व्यक्तीचा सत्कार नाही; तर सामान्य माणसामध्ये दडलेल्या असामान्य शक्तीचा, जिद्दीचा आणि समाजाप्रती समर्पणाच्या भावनेचा गौरव आहे. आपल्या यशाचे शिखर गाठल्यानंतरही ज्याने आपल्या मातीशी, आपल्या संस्थेशी आणि आपल्या लोकांशी असलेली नाळ जपली, त्या व्यक्तिमत्त्वाला अभिवादन करण्याचा हा सुवर्णक्षण आहे. जसा महाभारतातील एकलव्याने आपल्या गुरूसाठी सर्वस्व अर्पण केले तसेच आपल्या कार्यातून समाजऋण फेडणारे, शिक्षणाला जीवनाचे सर्वोच्च साधन मानणारे आमचे लोकनेते रामशेठ ठाकूर हे खऱ्या अर्थाने आधुनिक युगातील ‌‘एकलव्य‌’ आहेत.
रयत शिक्षण संस्थेच्या जवळपास अनेक प्रमुख इमारती, शाळा असतील, कॉलेजेस असतील याला सढळ हाताने त्यांनी मदत केली. १३५ कोटी रुपये आणि दरवर्षी एकही वर्ष असे जात नाही की ज्यावर्षी लोकनेते रामशेठ ठाकूर रयत शिक्षण संस्थेला त्या ठिकाणी आपली मदत देत नाहीत, त्यामुळे एकलव्याप्रमाणे आपली गुरुदक्षिणा गुरुने न मागता देणारे असा प्रकारचे रामशेठ ठाकूर आहेत आणि हे आपल्याला खरोखर अतिशय प्रेरणा देणारे आहे तसेच त्यांचा प्रवासदेखील थक्क करणारा आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटले की, साधी नोकरी करत असताना त्यांना सिडकोचे १० हजार रुपयांचे काम करण्याची पहिली संधी मिळाली. या कामासाठी त्यांनी घरचे दागिने गहाण टाकले, पेढीवरून पाच हजार उचलले आणि पहिल्यांदा ते काम केले व पहिल्या कामामध्ये त्या ठिकाणी अडीच हजार रुपये नफा कमवला. ज्यावेळी साडेचारशे रुपये पगार होता, त्यावेळी अडीच हजारांचा नफा कमवून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या लक्षात आले की नोकरी तर करायचीच आहे, पण मोठे व्हायचे असेल तर हे कामही करावे लागेल आणि मग ५० हजार रुपयाचे काम, एक लाखाचे काम असे करता-करता ते आपले काम वाढवत गेले. ज्यावेळी सिडकोने त्या काळात एक कोटी रुपयाचे काम काढले त्या वेळी फक्त मोठे कंत्राटदार हे एक कोटीच काम करू शकणार होते, मग लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सिडकोच्या विरुद्ध जाऊन एक मोठे आंदोलन उभारले आणि सांगितले याचे पार्ट करा. हे काही एक काम नाही आहे, याचे पार्ट करु शकता आणि इथल्या सगळ्या भुमिपूत्रांना एकत्रित करून सगळ्यांना थोडे थोडे काम देऊन ते काम त्याठिकाणी पूर्ण केले आणि त्यातून भूमिपुत्र कशा पद्धतीने काम करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले.
सिडको आली तेव्हा सिडकोला विरोध खूप होता. कोणी ऑफिस द्यायला तयार नव्हते. रामशेठ ठाकूर यांनी सांगितले, माझ्याकडे ऑफिस सुरू करा. त्यांच्याकडे ऑफिस सुरू झाले. त्याच्यावर मोठा मोर्चा त्या काळात गेला. तो मोर्चा गेल्यानंतर रामशेठ ठाकूर यांनी सांगितले मोर्चा याकरिता आला की तुम्ही आमच्या स्थानिकांना नोकऱ्या दिल्या नाहीत. त्याच ठिकाणी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आम्ही स्थानिकांना नोकऱ्या देतो आणि तिथल्या तिथे स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या व तेथून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपला संघर्ष सातत्याने पुढे नेला. ज्यावेळी मोठे काम जेएनपीटी पोर्टचे निघाले तोपर्यंत कंपनी बऱ्यापैकी स्थापन झाली होती, खूप मोठे काम होते आणि गणेश नाईकसाहेबांनी आपल्या मुलाला त्याठिकाणी पाठवले व सांगितले की मोठे काम आले आहे आणि हे काम रामशेठ ठाकूर हेच करू शकतात, रामशेठने ते काम करावे. त्यावेळी रामशेठ ठाकूर विदेशात होते. त्यांना विदेशात फोन लावला, ते म्हणाले मी हे काम करीन आणि मग त्यावेळी पोर्टचे मोठ त्या काळचे जेवढे मोठे मोठे कंत्राटदार होते त्या सर्वांना मागे टाकून वेळेत काम पूर्ण करण्याचे त्या ठिकाणी काम हे रामशेठ ठाकूरांनी करून दाखवले आणि त्यातून ही जी कंपनी आज इतकी मोठी आपल्याला पहायला मिळते ती कंपनी त्यांच्या मेहनतीतून व जिद्दीने उभी करुन दाखविली आणि भुमिपुत्रदेखील काम करू शकतात तेही उत्तम व जिद्दीने उभी करून दाखविली. भुमिपूत्रदेखील काम करू शकतात, तेही उत्तम काम करू शकतात हे दाखवण्याचं काम खऱ्या अर्थाने रामशेठ ठाकूर यांनी केले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
एकीकडे स्वतःचा व्यवसाय सुरू होता, त्यासोबत स्व.दि.बा.पाटीलांसोबत वेगवेगळ्या आंदोलनामध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर त्या ठिकाणी सहभागी होते. ८०च्या दशकामध्ये फार काही कायदे नव्हते. कोणाचीही जमिन उचलली की ती घेऊन टाकायची, त्याच्यावर सरकारने नाव लावून टाकायचे, त्यांना काही मिळाले, तर ठिक, नाही मिळाले तर ठिक तुम्ही लढत रहा, अशा पद्धतीने या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी स्व.दि.बा.पाटील यांच्या नेतृत्वामध्ये भूमिपुत्रांचा जो लढा झाला त्यात अतिशय प्रमुख भूमिका लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी निभावली आणि टप्याटप्याने प्रत्येक आंदोलनामध्ये भुमिपुत्रांना त्यांचे हक्क मिळत गेले. जमिनी मिळाल्या, साडेबारा टक्केचा निर्णय झाला, घरांचा निर्णय झाला, नोकऱ्यांचा निर्णय झाला, व्यवसायाचा निर्णय झाला अशा वेगवेगळ्या गोष्टी सातत्याने संघर्षाची फार मोठी गाथा ही लोकनेते रामशेठ ठाकूरांची आहे आणि त्यामुळे भुमिपुत्रांनी त्यांना थेट लोकसभेमध्येच पाठवून दिले. हा असा नेता आहे की जो डायरेक्ट लोकसभेपर्यंत पोहचला आणि दोन्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिग्गजांना त्या ठिकाणी पराभूत करण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. ते असे व्यक्ती आहेत, ज्यांनी ५१-५२व्या वर्षी घोषित करून टाकले की आता मला राजकारणात राहायचे नाही, मी निवडणूक लढणार नाही, खरं म्हणजे अनेक निवडणूक ते जिंकू शकले असते पण त्यांनी निर्धार केला, निर्णय केल्यानंतर मागे वळून बघितले नाही आणि सातत्याने समाजकार्य ते करीत राहिले. रायगड जिल्ह्यातील, नवी मुंबईच्या भागातील सर्व विकासामध्ये त्यांचे योगदान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
आता तर पुढच्या काळामध्ये आपले सरकार मुंबईपेक्षा सुंदर मुंबई या रायगड जिल्हा व नवी मुंबईमध्ये करणार आहेत. खरी पुढची मुंबई इथेच होणार आहे. या क्षेत्राचा इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासामध्ये ठळकपणे जी नावे लिहिली जातील त्यातले एक नाव हे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे असेल, असे शेवटी मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्याचा गौरवही केला. संयमी, शिस्तबद्ध आणि लोकांसाठी काम करणारा लोकप्रतिनिधी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवन कार्याचा आलेख मांडला. आजची उपस्थिती पाहून त्यांच्यावर मनापासून व हृदयावर प्रेम करणारे कार्यकर्ते पहायला मिळाले. कर्तृत्व, नेतृत्व यांचा अनोखा संगम रामशेठ ठाकूर यांच्या जीवनात पहायला मिळतो. गाव, गरीब माणूस, शेतकरी, कामगार यांच्या हक्काच रक्षण करण्यासाठी; त्याचबरोबर स्थानिकांना रोजगार मिळविण्यासाठी रामशेठ ठाकूर यांनी आपले आयुष्य खर्च केले, असे सांगितले.
१९९५च्या काळात कंत्राटदारांनी अर्धवट सोडलेली मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि उड्डाणपुलांची कामे रामशेठ ठाकूर यांच्या धाडसी सहकार्यामुळेच पूर्ण होऊ शकली, अशी आठवण सांगून मंत्री गडकरी म्हणाले की, रामशेठ ठाकूर यांनी जेएनपीटी आणि सिडकोच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांना रोजगार मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष केला. विकासाची फळे स्थानिक माणसापर्यंत पोहचली पाहिजेत हा त्यांचा विचार मोलाचा आहे. त्यांनी कामात कधीही बेमानी केली नाही त्यामुळे राजकारणाच्या पलीकडे जाऊन रामशेठ ठाकूर हे लोकनेता झाले. आज देशामध्ये पैसेवाले कमी नाहीत, पण देण्याची वृत्ती फार थोड्या लोकांमध्ये आहे. रामशेठ ठाकूर यांच्याकडे ती दानत मोठ्या प्रमाणात आहे. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान मोठ्या प्रमाणात आहे. असंख्य विद्यार्थ्यांना त्यांनी आर्थिक मदत केली आहे. ते कॉट्रक्टर जरुर आहेत, पण सर्व प्रथम त्यांना भूमिपुत्रांची काळजी आहे. रामपर्व ही जीवनाची सुरुवात आहे आणि शतायुषी होईपर्यंत हा रामपर्व युग असाच चालत राहिल, असा विश्वास मंत्री गडकरी यांनी व्यक्त केला.
आज सत्तेच्या खुर्चीला फारच चिकटून बसतात. नगरसेवकाला आमदार व्हायचे असते, आमदाराला मंत्री व्हायचे असते, मंत्र्यांना मुख्यमंत्री व्हायचे असते. असे अतृप्त असणे आजच्या राजकारणात पहायला मिळते, मात्र दोन वेळा खासदार होऊनही वयाच्या ५२व्या वर्षी राजकारणातून निवृत्त होणारे रामशेठ ठाकूर यांचा आदर्श सर्वच राजकारणांनी घ्यावा, असे नमूद करतानाच त्यांचा १००वा वाढदिवस याच मैदानावर व्हावा, असा विश्वास व्यक्त करताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या यशामध्ये त्यांच्या धर्मपत्नी शंकुतलाताई ठाकूर, चिरंजीव आमदार प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर यांचेही योगदान असल्याचा आवर्जून उल्लेख ना. गडकरी यांनी केला.
सत्कारमूर्ती लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या भाषणात सर्वांचे आभार मानले. ते म्हणाले, माझ्यावर प्रेम करणारी सर्व मंडळी आहे त्यामुळेच मी मोठा झालो आहे. ७५ वर्ष पूर्ण झाली, या ७५ वर्षात अनेक बरे वाईट अनुभव आले. १० हजारांचे काम, १२ हजारांचे काम, गाढवावर माती वाहून नेण्याचे काम ही सगळी कामे केली आणि त्याबरोबर काम मिळत नाही म्हटल्यानंतर मी झगडलोसुद्धा. १९८१चे आंदोलन, ८४चे आंदोलन यामध्ये सहभाग घेतला. ८१चे आंदोलन ज्यावेळी जासई नाक्यावर झाले. भगतसाहेबांचं डोकं फुटल, श्रावणशेठ कोळी, आदरणीय दि.बा. पाटीलसाहेबांना मार बसला. त्यावेळेला मी आंदोलनात होतो आणि ८४च्या आंदोलनात ज्येष्ठ नेतेमंडळींना तुरुंगात डांबले गेले आणि पाटीलसाहेबांनासुद्धा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेव्हा ८४चे आंदोलन पुढे नेण्याकरिता नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली. मी, दशरथ ठाकूर, बी.के. ठाकूर आणि भारती पोवार त्यावेळेला नेतृत्व करून ते ८४चे आंदोलन आम्ही पुढे नेले. लोकांच्या आशीर्वादाने, सहकार्याने त्यात आम्ही यशस्वी झालो, असे त्यांनी सांगितले.
यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले पुत्र आमदार प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर यांच्या कर्तृत्वाचा प्रामुख्याने उल्लेख केला. आपले सर्वांचे सहकार्य; त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी व मान्यवरांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन यामुळे पुढील १०-२० वर्षे काम करण्याची उर्जा मिळाल्याचा उल्लेख केला. आयुष्यात जे आपण काम करत असतो, त्यांची नोंद आणि दखल ही घेतली जात असते, त्यातून आज आपल्या सर्वांचे सहकार्य आणि प्रेमामुळे येथपर्यंत पोहचलो आहे. काम करत असताना गावागांवातील लोकांना सोबत घेऊन काम करत राहिलो, त्यामुळे स्वतःबरोबर लोकांचेपण भले झाले. लोकांचे सहकार्य मिळाले. त्यातूनच या परिसरात प्रकल्प उभे राहून विकास झाला आणि स्थानिक भूमिपुत्रालादेखील त्यांचे हक्क मिळाले, असेही त्यांनी या निमित्त्ााने नमूद केले.
या सोहळ्याचे प्रास्ताविक लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव वर्ष नियोजन समितीचे अध्यक्ष आमदार महेश बालदी यांनी केले. त्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवनाचा जीवनपट उलगडला. त्याचबरोबर रामशेठ यांच्या परिस्पर्शाने दगडाचेही सोने होते, त्यामुळेच माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता दोन वेळा आमदार झाल्याची प्रामाणिक कबुली त्यांनी दिली. उपस्थितांचे आभार जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक आमदार प्रशांत ठाकूर यांनी मानले.
दरम्यान, सोहळ्यापूर्वी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री शरदचंद्र पवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी प्रतिभाताई पवार यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभीष्टचिंतन करून शुभेच्छा दिल्या.

Check Also

सुमन कल्याणपूर; एक आवाज, अनेक गोष्टी…

सुमन कल्याणपूर म्हणताच हिंदी चित्रपट संगीत शौकीनांना पटकन ही गाणी आठवणारच. ना ना करते प्यार …

Leave a Reply