डेहराडून : वृत्तसंस्था
अफगाणिस्तान संघाने आयर्लंडविरुद्धच्या दुसर्या टी-20 क्रिकेट सामन्यात 3 बाद 278 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. ऑस्ट्रेलिया संघाने 2016मध्ये श्रीलंकेविरुद्ध 3 बाद 263 धावा केल्या होत्या. हा विक्रम अफगाणिस्तानने मोडला. लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंड संघाला 6 बाद 194 धावा करता आल्या. या लढतीत 84 धावांनी विजय मिळवून अफगाणिस्तानने टी-20 मालिका 2-0ने जिंकली. अफगाणिस्तानच्या हझरतुल्ला झझाईने 62 चेंडूंत 16 षटकार व 11 चौकारांसह नाबाद 162 धावा तडकावल्या. टी-20मधील ही दुसरी सर्वोच्च खेळी ठरली. फिंच 172 धावांसह अव्वल स्थानावर आहे, मात्र डावात सर्वाधिक षटकाराचा विक्रम झझाईने नोंदविला. त्याने फिंचच्या 14 षटकारांचा विक्रम मोडला. झझाईने 42 चेंडूंत शतक पूर्ण केले. टी-20मधील हे तिसर्या क्रमांकाचे वेगवान शतक ठरले. उस्मान घानीने 48 चेंडूंत 73 धावा कुटल्या. या जोडीने 236 धावांची सलामी दिली. ही टी-20मधील पहिल्या विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी ठरली. यापूर्वीचा विक्रम फिंच-शॉर्ट जोडीच्या नावावर होता. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन जोडीने झिम्बाब्वेविरुद्ध हा विक्रम रचला होता.
- संक्षिप्त धावफलक : अफगाणिस्तान-20 षटकांत 3 बाद 278 (हझरतुल्ला झझाई नाबाद 162, उस्मान घानी 73, रॅनकिन 1-35) वि. वि. आयर्लंड-20 षटकांत 6 बाद 194 (स्टिर्लिंग 91, ओब्रायन 37, रशीद खान 4-25).