उरण : प्रतिनिधी, वार्ताहर
लॉकडाऊन सुरू केल्यापासून 19 दिवसानंतर उरणमध्ये रविवारी (दि. 12) एकदम दोन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यात उरण शहरातील हॉटेल व्यावसायिकाचा मुलगा आणि जेएनपीटी येथील सीआयएसएफ जवानाच्या पत्नीचा समावेश आहे. दोन्ही रुग्णांना ट्रॅव्हल हिस्ट्री नसल्याने उरणमध्ये खळबळ उडाली आहे.
लॉकडाऊनमध्ये उरण तालुक्यातील क्वारंटाईन सेंटर व होम क्वारंटाईनमध्ये विविध ठिकाणी संशयितांना चाचणीसाठी ठेवण्यात आले होते. त्यांची चाचणी पूर्ण होऊन बाधित नसल्याने त्यांना घरी सोडण्यात येत होते, मात्र रविवारी उरणमध्ये दोन रूग्ण आढळल्याने येथील यंत्रणा हादरली आहे. दोन्ही रुग्ण आजारी असल्याने त्यांना नेरुळ येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी केली असता, ती पॉझिटीव्ह आली. त्यानंतर त्यांना आता पनवेल येथील कोविड (उपजिल्हा) रुग्णालयातील कोरोनाबधितांच्या कक्षात पुढील उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती उरण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे यांनी दिली.
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 12) कोरोनाचे नवीन चार रुग्ण आढळले आहेत. यापैकी खारघरमधील दोन आणि कळंबोली व तळोजा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. या नव्या रुग्णांमुळे पनवेल तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 26वर गेली असून, उरणचे दोन रूग्ण धरून रायगड जिल्ह्यातील एकूण आकडा 28वर पोहोचला आहे.
बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये 9 एप्रिलपासून टीबी व अन्य गंभीर आजारावर उपचार घेत असलेल्या मूळच्या खारघर येथील रहिवाशी असलेल्या व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. याच हॉस्पिटलमध्ये टीबी, काविळ, न्यूमोनिया, मधुमेह आणि उच्चरक्तदाबावर उपचार घेत असलेल्या कळंबोली येथील व्यक्तीचाही रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. खारघर येथील आणखी एकाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह असून त्याला पनवेलच्या कोविड (उपजिल्हा) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर नवी मुंबई येथे दवाखान्यात काम करणारी व यापूर्वीच बेलापूरमध्ये क्वारन्टाईन असलेल्या तळोजा फेज-1मधील एका व्यक्तीचा रिपोर्टही कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.
रायगड जिल्ह्यात कोरोनाचे 28 पॉझिटीव्ह रुग्ण झाले असून 27 जणांचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत तसेच पनवेलच्या कोविड (उपजिल्हा) रुग्णालयात 12 जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.