पनवेल : रामप्रहर वृत्त
आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम यांनी सोमवारी (दि.२९) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर आणि उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत कदम यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
शरद कदम यांनी कबड्डी क्षेत्रात प्रशिक्षक म्हणून उल्लेखनीय कार्य करत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. त्याचबरोबर तांबाटी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून काम करताना त्यांनी गावाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले. सामाजिक, क्रीडा आणि सार्वजनिक क्षेत्रातील त्यांच्या दीर्घ अनुभवामुळे ते खालापूर तालुक्यात एक सक्रिय आणि लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शरद कदम यांचे पक्षात स्वागत करत त्यांच्या क्रीडा, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनातील अनुभवाचा भाजपला निश्चितच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला. समाजातील विविध घटकांना जोडण्यामध्ये त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनीही शरद कदम यांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत करत त्यांच्या सहभागामुळे खालापूर तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद आणखी वाढेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी खालापूर तालुका अध्यक्ष सन्नी यादव, हरिभाऊ जाधव, रवी पाटील, विठ्ठल मोरे आदी उपस्थित होते.
Check Also
आशा सचदेव सत्तरीत, चित्रपटसृष्टीत पन्नाशी
आजच्या मल्टीप्लेक्स युगातील जेन झी पिढीला हिंदी चित्रपटसृष्टीतील आशा सचदेव नावाची अभिनेत्री माहीत असण्याची शक्यता …
RamPrahar – The Panvel Daily Paper