Breaking News

प्रेम शास्त्र @५१ वर्ष; देव आनंदच्या पत्नीच्या भूमिकेत चक्क बिंदू…

चित्रपटाच्या जगातील काही वेगळ्या गोष्टी आश्चर्याचा असा काही धक्का नि धसका देतात की असं का नि कसे, कशाला असा प्रश्न सतत पडत राहतो आणि मग पटकथेची गरज असे उत्तर मिळाले की ते स्वीकारावे लागले तरीही त्या धयातून सावरायला वेळ लागतो…. चित्रपट संस्कृतीतील हीदेखील एक रंजक गोष्ट.
आता तुम्हीच सांगा, “प्रेम शास्त्र” हे चित्रपटाचे नाव देव आनंदचे रुपडे, दिलखुलास व्यक्तिमत्त्व, त्याची शैली, प्रतिमा (इमेज) आणि लोकप्रियता यांना एकदम फिट्ट आहे, देव आनंद कुठेही असला तरी तो देव आनंद असे. त्याचा फेवरेट स्टुडिओ वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओतील त्याच्या चित्रपटाच्या मुहूर्ताना प्रत्यक्ष हजर राहताना असा लाईव्ह अनुभव घेतला आहे….
पण वादग्रस्त विषयांवरील चित्रपटाचे दिग्दर्शक अशी ओळख निर्माण झालेल्या बाबुराव इशारा अर्थात बी. आर. इशारा दिग्दर्शित चित्रपटात देव आनंदने नायक साकारावा ही “प्रेम शास्त्र” या चित्रपटाच्या घोषणेपासूनच आश्चर्याची गोष्ट होती. त्या काळात नवीन चित्रपटाची घोषणा झाली रे झाली त्याबाबत उत्कंठा सुरू होई. या चित्रपटाची कथा वेगळी असेल, अशी अपेक्षा. या चित्रपटाचा निर्माता अमरजीत हा आनंद बंधुच्या नवकेतन फिल्म या बॅनरशी अगदी घरचे संबंध असलेला, बरं या चित्रपटात झीनत अमान नायिका आहे अशी अनेक समीकरणे जुळून आल्याने देव आनंदने हा चित्रपट स्वीकारला असावा अशी आम्ही देव आनंद भक्तांनी स्वतःचीच समजूत काढली आणि या चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावरील आगमनाची अतिशय आतुरतेने वाट पाहिली. सत्तरच्या दशकापर्यंतचे चित्रपटाचं वेड हे शब्दात सांगता येणार नाही असे भन्नाट आणि भारी होते. आपल्या देशातील जनसामान्यांच्या आयुष्याला चित्रपट आणि क्रिकेटने जणू व्यापून टाकले होते, आयुष्यातील आनंदाचा तो भावनिक, मानसिक आणि काहींना बौद्धिक आधार होता. आयुष्य सोपं सुटसुटीत आणि सुंदर होण्यासाठी चित्रपट आणि क्रिकेटची आवड असावी असा एक अप्रत्यक्ष समज होता.
अमरजीत आणि देव आनंद ही जोडी नवकेतन फिल्म निर्मित ‘हम दोनो’ (१९६१) पासून जमलेली. अमरजीतचे दिग्दर्शन देव आनंदची दुहेरी भूमिका, साधना व नंदा अशा दोन नायिका आणि जयदेवचे श्रवणीय संगीत असा जुळून आलेला योग सुपर डुपर हिट ठरला. “हम दोनो”चे दिग्दर्शन विजय आनंदचे आहे असं म्हणणारा एक वर्ग आहे, चित्रपटाच्या श्रेयनामावलीत दिग्दर्शक म्हणून अमरजीत असेच आहे ( यू ट्यूबवर पाहू शकता) आणि हा चित्रपट रिपीट रनला प्रदर्शित होताना छापलेल्या नवीन पोस्टरवर मात्र विजय आनंदचे नाव आहे. हा बदल नवकेतन फिल्मने केला की चित्रपटाच्या वितरकांनी हा प्रश्नच आहे. तोही कधीच न सुटलेला. दिग्दर्शक अमरजीत आणि देव आनंद ही जोडी ‘तीन देविया ‘(१९६५), ‘दुनिया'(१९६८),
‘गॅम्बलर'(१९७१) या चित्रपटात एकत्र आली. अमरजीत यांचे नालंदा पिक्चर्स असे चित्रपट निर्मितीचे बॅनर होते.
चित्रपट संगीताचा उत्तम कान आणि दृष्टी असलेला दिग्दर्शक हीदेखील अमरजीतची ओळख. या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. या जोडीचा चित्रपट ‘प्रेम शास्त्र’. मात्र दिग्दर्शन बी. आर. इशारा यांचे. त्या काळातील धाडसी कथानकावरील चित्रपटाचे दिग्दर्शक ही त्यांची प्रतिमा. ती त्यांना ओळख दिली,’चेतना'(१९७१) या चित्रपटाने. दोन जिवलग मित्र (शत्रुघ्न सिन्हा आणि अनिल धवन) आणि एक शरीरविक्रय करणारी स्त्री (रेहाना सुल्तान) यांच्या व्यक्तीरेखाभोवतीचा हा चित्रपट त्याच्या धाडसी पोस्टर्सपासूनच गाजला. त्यांनी जणू चित्रपट दिग्दर्शित करण्याची ” फॅक्टरी” उघडली होती ( त्या काळातील रामगोपाल वर्मा म्हणूया). एक नजर (अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांचा हा सुरुवातीच्या दिवसांतील चित्रपट), दिल की राहे, एक नाव दो किनारे, हाथी के दात (त्या काळातील हा सर्वाधिक फ्लॉप चित्रपट. आमच्या गिरगावातील सेन्ट्रल चित्रपटगृहातून अवघ्या चार दिवसांत उतरवला), नयी दुनिया नये लोग, जरुरत असे अनेक मध्यममार्गी चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. लो बजेट आणि झटपट पटपट निर्मिती ही जणू त्यांची खासियत.
काही चित्रपट सामाजिक समस्येवर तर काही तेव्हाच्या मोकळ्या ढाकळ्या स्त्री पुरुष संबंधांवर होते. काळाच्या पुढचे ते दिग्दर्शक होते.चित्रपट दिग्दर्शनाचा त्यांचा झपाटा विलक्षण होता, कधी एखाद्या चित्रपटावरून वा त्यातील दृश्यावरुन त्यांचा सेन्सॉर बोर्डाशी वाद होई. अशा विषयांवर मुद्रित माध्यमातून फोकस टाकला जाताना काही ठिकाणी वादग्रस्त दृश्यांचे फोटो आवर्जून प्रसिद्ध करत. बी. आर. इशारा यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटांची जातकुळी एकदम वेगळी होती. त्यांचे बरेच चित्रपट “फक्त प्रौढांसाठी’ (ए प्रमाणपत्र) असत आणि पोस्टरवर तो ‘ए’ अगदी ठळकपणे दिसून येई. चित्रपट संस्कृतीतील हीदेखील एक रंजक गोष्ट. अशा अगणित छोट्या छोट्या गोष्टींनी चित्रपटाचा प्रवास सुरू आहे.
चित्रपट रसिकांच्या मागील पिढीला दिग्दर्शक बी. आर. इशारा चांगलेच ज्ञात आहेत आणि त्यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटात देव आनंद? म्हटलं ना, चित्रपटाच्या जगात काही वेगळं घडलं बिघडलं की कुतुहल वाढते. तसंच हे. देव आनंद पहिल्यांदाच ( आणि एकदाच) असा चौकटीबाहेर) प्रेम शास्त्र हे देव आनंदच्या चित्रपटाला नाव शोभते. रुपेरी पडद्यावर प्रेम करताना पहावे ते देव आनंदला. युवतीला (अर्थात नायिकेला) आकर्षित करणे, नजरेतून, कटाक्षातून
प्रेम व्यक्त करणे, नायिकेला प्रेमात पाडणे, प्रेमाने तिला चिंब चिंब करणे, तिच्यावर मनसोक्त मनमुराद प्रेम करणे, तिचं प्रेम प्राप्त करणे, त्यातून एक गोष्ट तयार होणं, त्यात प्रेम गीत संगीत असणं हे सगळे देव आनंद एके देव आनंद असं बरचसं समीकरण. प्रेम शास्त्र चित्रपटात असाच प्रेम पाक अथवा प्रेमाचा गोडवा असेल असे वाटलं तर त्यात आश्चर्य ते काय? प्रेम शास्त्र मुंबईत १२ जुलै १९७४ रोजी प्रदर्शित झाला. (मेन थिएटर मिनर्व्हा.) म्हणजे या चित्रपटाच्या प्रदर्शनास एकावन्न वर्षे पूर्ण झाली. तारखेनुसार या चित्रपटाचे अस्तित्व आहे. चित्रपटात देव आनंद एक ख्यातनाम लेखक आहे. नाव सागर शर्मा. त्याची पत्नी नीलिमा शर्मा (बिंदू). यांच्या संसारातील तणाव, वाद वगैरे वगैरे. याचं कारण नीलिमाचे बेफिकीर वागणं, दारू पिणे वगैरे वगैरे. सागर शर्मा यांचे पिता आणि त्यांची मुलगी यांच्या नात्यावरील एक पुस्तक खूपच गाजते. एका पर्यटन स्थळावर सागर शर्मा यांस त्याची निस्सीम वाचक बरखा अरोरा
(झीनत अमान) भेटते आणि एक नवे नाते आकार घेत घेत जाते. अनेक नाट्यमय गोष्टी घडत घडत हा चित्रपट पुढे सरकतो. या चित्रपटात रहेमान , आय. एस. जोहर, अभी भट्टाचार्य, असित सेन, अन्वर हुसेन, अंजू महेंद्र, डेव्हिड इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे छायाचित्रणकार फरेदून इराणी आणि संकलन आय. एम. कन्नू. या चित्रपटाला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत आहे आणि यातील मुझे प्यार का (पार्श्वगायक आशा भोसले आणि किशोरकुमार), टिप टिप टिप (आशा भोसले), नाम हमारा मेरा मशहूर हो गया (आशा भोसले आणि किशोरकुमार) ही गाणी लोकप्रिय झाली होती.
त्याचा चित्रपटाला काहीही फायदा झाला नाही. चित्रपट पडायचा थांबला नाही. १९७४ साली देव आनंद आणि झीनत अमान जोडीचे प्रेम शास्त्र आणि देव आनंद दिग्दर्शित ‘इश्क इश्क इश्क’ हे दोन्ही चित्रपट दणदणीत फ्लॉप ठरले. देव आनंदवरील प्रेमाखातर पहावे तर त्यात काही पाहण्यासारखे असावे. ही जोडी गॉसिप्स मॅगझिनमधून जास्त गाजली. एका पंचतारांकित हॉटेलमधील फिल्मी पार्टीत झीनत अमानने राज कपूरसोबत एन्ट्री करेपर्यंत आणि राज कपूर दिग्दर्शित “सत्यम शिवम सुंदरम”(१९७८) या चित्रपटासाठी झीनत अमानची निवड होईपर्यंत देव आनंद आणि झीनत अमान हॉट केक होती.सत्तरच्या दशकातील सर्वाधिक लक्षवेधक उन्मादक अभिनेत्री म्हणून झीनत अमान ओळखली गेली.
त्या काळातील जवळपास सर्वच आघाडीचे दिग्दर्शकांचे चित्रपटात (बी. आर. चोप्रा , नासिर हुसेन, मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा, शक्ती सामंता, प्रमोद चक्रवर्ती, जे. ओम प्रकाश , ओ. पी. रल्हन , मनोजकुमार, फिरोझ खान, संजय खान, ब्रीज) तिने भूमिका साकारली तशीच ती बी. आर. इशारा यांच्या दिग्दर्शनातील “प्रेम शास्त्र” मध्ये संधी मिळाली ही तर देव आनंदची कृपा. पण बिंदू देव आनंदच्या पत्नीच्या भूमिकेत ही गोष्ट पटकथेनुसार असली तरी न पटणारी. आणि म्हणूनच फर्स्ट डे फर्स्ट शोलाच हा चित्रपट फ्लॉप ठरला तो कायमचाच. अहो, त्यानंतर काही वर्षांनी अधूनमधून मॅटीनी शोला “प्रेम शास्त्र” प्रदर्शित झाला, पण या चित्रपटात देव आनंद आणि बिंदू पती-पत्नी असल्याने तेव्हाही कोणी नाही पाहिला.
एखादा चित्रपट असादेखील असतो.

  • दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

Check Also

कलावंतांच्या रखडलेल्या मानधनाचा प्रश्न विधिमंडळात

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यानंतर शासनाकडून सुधारणा व तातडीच्या कार्यवाहीचे आश्वासन मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील …

Leave a Reply