पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्यालयात प्रथम, द्वितिय, तृतीय वर्ष पदवी, पदव्युत्तर वर्गातील व पीएचडी पुरस्कृत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा सोमवारी (दि. १३) संस्थेचे स्फुर्तिस्थान स्व. चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भूषविले. मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. कविता लघाटे आणि जेबीएसपी संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आमदार प्रशांत ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमास संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य व नगरसेवक परेश ठाकूर, नगरसेवक एकनाथ गायकवाड, नगरसेविका सीताताई पाटील, संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, सचिव डॉ.एस.टी. गडदे, सदस्य ॲड. राहुल घरत, गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भाऊशेठ पाटील, महात्मा फुले कॉलेजचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, आदेश ठाकूर आदी उपस्थित होते.
“आजचे जग स्क्रीन आणि तंत्रज्ञानाने व्यापले असले, तरी माहितीच्या महासागरात वाहवत न जाता विद्यार्थ्यांनी भानावर राहून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. केवळ मोठे होण्याचे स्वप्न पाहणे पुरेसे नाही, तर ते साकार करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न आणि शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक बांधिलकीही जोपासली पाहिजे,” असे प्रतिपादन प्रभारी अधिष्ठाता डॉ. कविता लघाटे यांनी केले तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात, शिक्षणाचा वसा आणि संस्कारांचा वारसा जपत समाजातील इतर घटकांनाही सोबत घेऊन पुढे जाण्याची वृत्ती, आपल्या यशाचा आनंद इतरांसोबत वाटण्याची कला विद्यार्थ्यांनी जोपासली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. आदरणीय चांगू काना ठाकूर यांच्या संघर्षमय आणि मूल्याधिष्ठित जीवनातून प्रेरणा घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याने स्वकीर्ती रूपाने आदर्श समाजासमोर निर्माण करावा; त्याचबरोबर देशाभिमान, सामाजिक उत्तरदायित्व आणि कठोर परिश्रम यांच्या बळावरच उत्तुंग यश प्राप्त करावे, असे सांगितले.
आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वाढत्या प्रभावामुळे करिअरच्या नव्या संधी आणि आव्हानांचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे गरजेचे आहे. केवळ पदवी मिळवून न थांबता व्यावसायिक कौशल्ये आत्मसात केली, तर पनवेल तालुक्याच्या वेगवान विकासामुळे येत्या पाच वर्षांत निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या असंख्य संधींचा लाभ युवकांना घेता येईल. त्यासाठी युवकांनी सजग राहिले पाहिजे.
प्राचार्य डॉ.एस.के. पाटील यांनी महाविद्यालयाच्या आजपर्यंतच्या प्रगतीचा आढावा सादर केला, तर पाहुण्यांची ओळख अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.बी.डी. आघाव यांनी करून दिली. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये महाविद्यालयातील सर्वोत्तम पायाभूत सुविधा, सुसज्ज डिजिटल ग्रंथालय, अद्ययावत प्रयोगशाळा, सकारात्मक शैक्षणिक वातावरण, सर्वांगीण विकासासाठी प्रोत्साहन देणारे व्यवस्थापन व प्राध्यापकवृंद याबाबत कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी परिषद व विद्यार्थी कल्याण कक्षाचे चेअरमन डॉ.एस.एन. परकाळे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.बी.डी. आघाव व महिला विकास कक्षाच्या चेअरमन डॉ. आर.डी.म्हात्रे यांनी परिश्रम घेतले. डॉ.आर.व्ही. येवले, डॉ.जी.एस. तन्वर, प्रा.ए.व्ही. पाटील व प्रा.एन.एच. कडू यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. एस.एन. परकाळे यांनी मानले.
Check Also
पनवेल महापालिकेच्या विकास प्रकल्पांचे सादरीकरण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांचे सादरीकरण सोमवारी (दि.६) …
RamPrahar – The Panvel Daily Paper