यश हे सर्वाधिक ताकदवान टॉनिक… चित्रपटाच्या जगात यशाचे नाणं कायमच चालणारं. सर्वांनाच हवेहवेसे वाटणारे. जपून ठेवावे असे. उगाच नाही म्हणत एक पिक्चर सुपरडुपर हिट होने दे… चित्रपटाच्या यशाची वाट रसिक प्रेक्षकांच्या आवडीनिवडीवर अवलंबून असते. रसिकांना चित्रपट आवडला रे आवडला, आजच्या मल्टीप्लेक्स युगात रात्री दहा वाजून पंचावन्न मिनिटांचा शोदेखील हाऊसफुल्ल गर्दीत टाळ्या शिट्ट्यांनी एन्जॉय
केला जातो. सोशल मीडियात अनेक जण व्यक्त होतात आणि पिक्चर सुपरडुपर हिट है तो सेलिब्रेशन तर हवेच.
‘देऊळ बंद २’च्या यशाचा असाच उत्फूर्त आणि लक्षवेधक सोहळा पुणे शहरात साजरा झाला. आपला हा चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि ते करताना हा चित्रपट चर्चेत ठेवण्यासाठी दिग्दर्शक आणि कलाकार प्रवीण तरडे याने कमालीची मेहनत घेतली आणि त्याचं गोड फळ त्याला मिळाले. आपला चित्रपट फोकसमध्ये राहण्यासाठी आपणच जोरदार शोरदार प्रयत्न करायला हवेत हे प्रवीण तरडेने अधोरेखित केले. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही त्याच्या यशाचा वेग आणि वेध कायम ठेवायचा असतो.
‘गोष्ट मोठी शंभर कोटी’ अशा आकर्षक टॅगलाईनने हा सोहळा रंगला. म्हटलं तर हा ‘प्रवीण तरडे वन मॅन शो’. त्याने या यशाबद्दल तयार केलेल्या एका क्लिपमध्ये आपल्या चित्रपटाच्या जवळपास सर्वच तंत्रज्ञाचे विशेष कौतुक केले हे उल्लेखनीय. चित्रपट माध्यम आणि व्यवसायात पडद्यामागची टीम खूप महत्त्वाची असते, अशा कौतुकाने त्यांचा हुरूप वाढतो. या यशाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्याच्या यशाचा लाभ गरजू शेतकऱ्यांना आणि त्यांच्या मुलांना देण्यात येणार आहे. चित्रपटाच्या यशातून सामाजिक बांधिलकी जपली जात आहे.
मराठी चित्रपटाच्या यशाचा सोहळा खूप वेगळा असतो, त्यात अनावश्यक दिखावूपणा नसतो असा माझा दीर्घकालीन सुखद अनुभव, खूप आठवणी आहेत. काही सांगायला हव्यात. सतिश कुलकर्णी निर्मित आणि सचिन पिळगावकर दिग्दर्शित
‘गंमत जंमत'(१९८७)चा रौप्य महोत्सवी यशाचा सोहळा आजही मला आठवतोय.
जुहू समुद्रकिनारा लगतचे हॉटेल सन ॲण्ड सॅण्ड हा एकेकाळचा हिंदी चित्रपटसृष्टीचा सेलिब्रेशनचा जणू सर्वोत्तम हुकमी स्पॉट. (वा अड्डा) सत्तरच्या दशकातील चित्रपटात ते दिसते. याच प्रतिष्ठित स्पॉटच्या प्रशस्त हॉलमध्ये हा सोहळा रंगला. या पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेला मराठी चित्रपटाचा हा पहिला सोहळा. त्यानंतर अमिताभ बच्चन यांचे रंगभूषाकार दीपक सावंत यांनी निर्माण केलेल्या ‘आक्का’ चित्रपटाचा जया बच्चन यांच्या शुभ हस्ते ध्वनिफित प्रकाशन वगैरे काही मोजक्याच मराठी चित्रपटांचे सोहळे येथे झाले. सतिश कुलकर्णी निर्मित आणि सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘एकापेक्षा एक’ (१९९०) या चित्रपटाच्या यशाचा सोहळा जुहू येथील सेन्टॉर हॉटेलमध्ये अमिताभ बच्चनच्या शुभ हस्ते कलाकार आणि तंत्रज्ञांना स्मृतीचिन्हे देत रंगला.
राजकमल कलामंदिर (युवा विभाग) निर्मित, किरण शांताराम निर्मित आणि सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘अशी ही बनवाबनवी’ (१९८८) हा सर्वकालीन सुपरहिट चित्रपट. कितीही वेळा कुठूनही पाहावा तोच मजेशीर टाईमपास. त्यातील वसंत सबनीस यांच्या खुमासदार शैलीतील पटकथा संवाद आणि सर्वच कलाकारांचा उत्तम टायमिंग साधलेला उत्फूर्त अभिनय यांचे गणित म्हणजे मनोरंजनाची बेरीज. मला आठवतंय या चित्रपटाचा यशाचा सोहळा दोनदा झाला. रौप्यमहोत्सवी सोहळा राजकमल कलामंदिर स्टुडिओत रंगला आणि सुवर्ण महोत्सवी सोहळा जुहू येथील सेन्टॉर हॉटेलच्या स्वीमिग पुलाच्या प्रशस्त हिरवळीवर रंगला, त्यातही विशेष म्हणजे चित्रपटसृष्टीतील आदर्श ठेवावा अशा चित्रपती व्ही. शांताराम आणि दिलीपकुमार यांच्या खास उपस्थितीत तो रंगला. अशा दोन लिजण्डसना एकत्र पहावे, ऐकावे, अनुभवावे हा तर एक वैशिष्ट्यपूर्ण अविस्मरणीय क्षण. मीडियाने मला काय दिले, तर हे असे भरपूर सकारात्मक दृष्टिकोन देणारे लाईव्ह अनुभव दिले. “अशी ही बनवाबनवी”च्या यशाची उंची या सोहळ्यात त्यात जाणवली. जगभरातील विविध भाषांतील चित्रपटांच्या यशाचे सोहळे अनेक. त्यात वेगळेपण असते ते हे असे.
मराठी चित्रपटाच्या यशाच्या सोहळ्यात विजय कोंडके निर्मित आणि दिग्दर्शित ‘माहेरची साडी’ (१९९१) चे खणखणीत यश काय वर्णावे? आजही या चित्रपटाच्या विशेषतः ग्रामीण भागातील यशाचे किस्से, कथा, गोष्टी रंगवून खूलवून सांगितल्या जातात. अशा गोष्टींतून यशस्वी चित्रपट एका पिढीकडून पुढच्या पिढीसोबत चालत राहतात. चित्रपट संस्कृतीतील हेदेखील एक वैशिष्ट्य. ‘माहेरची साडी’ च्या यशाचे सेलिब्रेशन अंधेरीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये साजरे केले. इंदिरा काँग्रेसचे खासदार सुनील दत्त हे विशेष पाहुणे म्हणून होते आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर निर्माता आणि दिग्दर्शकांना खास आमंत्रित करण्यात आले होते. मराठी चित्रपटाच्या यशाची गोष्ट हिंदी चित्रपटसृष्टीलाही ज्ञात होतीच, पण आपल्या आनंदात त्यांनाही सहभागी करून घेतले. दादा कोंडके यांनी या चित्रपटाच्या यशाचे भरभरुन कौतुक केले.
दादा कोंडके यांच्या “पळवापळवी”(१९९०) या चित्रपटाच्या यशाचा सोहळा मरीन लाइन्स येथील मराठी चित्रपटसृष्टीच्या तेव्हच्या एका तारांकित हॉलमध्ये रंगला आणि विशेष म्हणजे जितेंद्र प्रमुख पाहुणा होता. दादांनी या सोहळ्यात अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांनाही खास आमंत्रित करुन मराठी चित्रपटसृष्टीतील जणू एकोपा दाखवला. आजही सोशल मीडियात या चौघांचा फोटो पाह्यला मिळतोय आणि आजच्या जेन झी पिढीला त्या विशेष क्षणाची माहिती मिळतेय. या सोहळ्याच्या दिवशी लक्ष्मीकांत बेर्डे कोल्हापूरला शूटींग करत असल्याने उपस्थित नव्हता. अन्यथा त्या काळातील चित्रपट रसिकांचे आवडते टॉप फाईव्ह एकत्र असा अतिशय दुर्मीळ योग जमून आला असता. हा क्षण हुकल्यामुळे लक्ष्मीकांत बेर्डेही हळहळला असे त्याच्या एका भेटीत मला जाणवले. महेश कोठारे अभिनित, निर्मित आणि दिग्दर्शित धूम धडाका, दे दणादण, झपाटलेला, थरथराट यांच्या यशाचे सोहळेही ‘जबरदस्त’.
रामदास फुटाणे निर्मित आणि डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित “सामना”(१९७५) हा चित्रपट अनेक कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतो. निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू यांच्या अभिनयाचा जबरदस्त ‘सामना’ हेही एक कारण आहे आणि १९ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आली आणि काही दिवसांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली याही कारणास्तव हा चित्रपट चर्चेत राहिला. (सामना तसेच गुलजार दिग्दर्शित ‘आन्धी’ वगैरे काही चित्रपट या बंदीमुळे चित्रपटगृहातून उतरवण्यात आले.) एकोणीस महिन्यानंतर आणिबाणी उठली आणि हे चित्रपट पुन्हा प्रदर्शित होताना त्यांच्याभोवती एक वैशिष्ट्यपूर्ण वलय आणि वजन प्राप्त झाले होते. तेव्हापासून हे चित्रपट कायमच गाजत असतात. ‘सामना’ पुन्हा पुन्हा प्रदर्शित होताना त्याला हाऊसफुल्ल गर्दी होऊ लागली. एकदा लोकप्रिय झालेला चित्रपट कायमच
लोकप्रिय असतो.
‘सामना’ चित्रपटाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गतवर्षी पुणे शहरातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात आयोजित करण्यात आलेल्या खास खेळाला अक्षरशः प्रचंड गर्दी, इतकी की अखेर दरवाजा बंद करून घ्यावा लागल्याने अनेक रसिक सभागृहाच्या बाहेरच राहिले आणि त्याची चक्क बातमी झाली. यावेळच्या खास चर्चासत्रात रामदास फुटाणे, डॉ. मोहन आगाशे, विलास रकटे आणि मी, अशा आम्ही सहभाग घेतला. या सोहळ्यामुळे जुन्या चित्रपटाच्या यशाचा असा चाळीस अथवा पन्नास वर्षानी खास सोहळा आयोजित करण्याचा ट्रेंड आला. प्रत्येक यश काहीना काही देत असते ते हे असे. सामना ते देऊळ बंद २ या वाटचालीत अनेक मराठी चित्रपट लोकप्रिय ठरले. सत्तरच्या दशकात एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स आणि तंबू थिएटर्स ही चित्रपट पाहण्याची माध्यमे होती. दूरदर्शन माध्यम नवीन होते. १९८२ साली एशियाडच्या वेळी आपल्या देशात रंगीत दूरचित्रवाणी आणि चित्रफित (व्हिडिओ) आला. गावोगावी व्हिडिओ थियेटर्स आली. टूरिग टॉकिजला एक प्रकारची स्पर्धा निर्माण झाली. नव्वदच्या दशकात उपग्रह वाहिन्यांच्या आगमनाने पडद्यावरचा चित्रपट घरात आला. नवीन शतक सुरू झाले आणि मोबाईल, मल्टीप्लेक्स आले. ते काही वर्षांनी रुजले. मग ओटीटी प्लॅटफॉर्म आला. त्यावर जगभरातील अनेक देशांतील विविध भाषांतील चित्रपट वेबसिरीज घरबसल्या पाहायला मिळताहेत. एकीकडे मराठी चित्रपटाच्या यशापयशाचे गणित मांडले जात असताना याही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात आणि अशा बदलत्या सामाजिक सांस्कृतिक माध्यम वातावरणात यशस्वी ठरलेल्या मराठी चित्रपटांचे सोहळे असे आठवणीत राहिले.
- दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)
RamPrahar – The Panvel Daily Paper