खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन
खारघर ः रामप्रहर वृत्त
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे असून निसर्गसंपदा आपल्या पुढील पिढीलाही लाभली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण निसर्गाचे जतन केले पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर येथे केले.
पनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर सेक्टर १४ येथील हिंदू स्मशानभूमीत उभारण्यात आलेल्या पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण तसेच प्राणी अंत्यसंस्कार केंद्राच्या उभारणीचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१७) झाले. त्यावेळी ते बोलत होते.
या पर्यावरणपूरक कामांसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिकेचे मनापासून अभिनंदन केले. महापालिकेची पर्यावरणविषयक कटिबद्धता अशा कृतींमधून स्पष्टपणे दिसून येत असून पर्यावरणाचा वारसा भावी पिढ्यांसाठी जतन व्हावा यासाठी तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करून महापालिका सकारात्मक पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले.
महापौर नितीन पाटील यांनी सांगितले की, पनवेल शहर आता आंतरराष्ट्रीय शहर बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून त्या दृष्टीने पर्यावरणपूरक गोष्टींचे महत्त्व कमालीचे वाढत आहे. त्यांनी सर्व नागरिकांना पर्यावरण्याचे संवर्धन करण्याचे आवाहन करतानाच यासाठी नागरिकांचे सहकार्य व सूचना अत्यंत महत्वाच्या असल्याचे नमूद केले.
खारघर सेक्टर १४ येथील स्मशानभूमीमध्ये कार्यान्वित करण्यात आलेली ही प्रणाली नैसर्गिक वायूप्रवाहावर आधारित असून ती अत्यंत शाश्वत आणि कमी प्रदूषण करणारी आहे. या प्रणालीमुळे केवळ १२५ किलो लाकडाची आवश्यकता भासेल. लाकडाच्या कमी वापरामुळे कार्बन उत्सर्जनात मोठी घट होणार आहे. धूर, दुर्गंधी व हानिकारक वायूंवर प्रभावी नियंत्रण मिळवता येत असल्याने दहन प्रक्रिया जलद, कार्यक्षम आणि स्वच्छ होईल. सौरऊर्जेसारख्या शाश्वत तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या या यंत्रणेमुळे स्वच्छ, सुरक्षित व सन्मानपूर्वक अंतिम संस्काराची सुविधा उपलब्ध झाली असून यामुळे कमी देखभाल खर्चात दीर्घकालीन आर्थिक बचत होणार आहे.
यासोबतच भूमिपूजन झालेल्या प्राण्यांच्या शवदाहिनीमुळे मृत प्राण्यांची वैज्ञानिक व सन्मानपूर्वक सुरक्षित विल्हेवाट लावणे शक्य होणार आहे. यामुळे शहरात दुर्गंधी, संसर्ग व रोगराईचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी होऊन सार्वजनिक आरोग्याचे रक्षण होईल. धूर आणि प्रदूषणावर नियंत्रण मिळवणारी ही पर्यावरणपूरक व्यवस्था असून यामध्ये मोठ्या व लहान प्राण्यांसाठी स्वतंत्र व विविध क्षमतेची आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या कार्यक्रमाला उपमहापौर प्रमिला पाटील, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, महिला व बालकल्याण समिती सभापती ममता म्हात्रे, आयुक्त मंगेश चितळे, नगरसेवक मनोज भुजबळ, प्रवीण पाटील, समीर कदम, मधू पाटील, दिनेश खानावकर,नरेश ठाकूर, शशिकांत शेळके, नगरसेविका अनिता पाटील, स्वरस्वती काथारा, दमयंती भोईर, मनाली ठाकूर, जिल्हा चिटणीस रविनाथ पाटील, ब्रिजेश पटेल, संजय जैन, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, शहर अभियंता राजेश कर्डिले, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर भगवान गीते, डॉ. मधुलिका लाड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper