Breaking News

हॉटेल सी रॉकचे चित्रपटसृष्टीशी नातेसंबंध…

चित्रपटाच्या जगात एवढे, असे आणि इतके रंग एकमेकांत मिसळले गेले आहेत की त्याचा शोध अजिबात संपायचा नाही. अशीच एक भन्नाट आणि भारी गोष्ट, आपल्या चित्रपटसृष्टीचे मुंबईतील पंचतारांकित हॉटेलशी असलेले नातेसंबंध. हा रंगीत (कलरफुल्ल) विषय वरकरणी दिसतो तसा केवळ तपशील, माहिती आणि संदर्भ सांगण्यापुरता नाही. त्यात केवढी तरी विविधता आहे हे सिनेपत्रकारितेच्या निमित्ताने केलेल्या भटकंती, भेटीगाठी आणि निरीक्षण यातून अधोरेखित होत गेले. रुपेरी पडद्यावर येत असलेल्या, दिसत असलेल्या गोष्टीच्या पाठीमागे, पलीकडे, अवतीभवती बरंच काही आहे. असाच एक स्पॉट, हॉटेल सी रॉक.
आज वांद्रे येथील बॅण्ड स्टँडचा परिसर एका खास गोष्टीसाठी ओळखला जातो, चर्चेत असतो, न्यूजमध्ये असतो, तो म्हणजे शाहरुख खानचा मन्नत बंगला. त्या परिसरात कोणत्याही वेळी जावं तर भाईचे ( अर्थात एस आर के) चाहते या बंगल्यासोबत फोटो अथवा सेल्फी घ्यायला उत्सुक असल्याचे हमखास पाहायला मिळते. मध्यंतरी एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार देश विदेशातील अगणित पर्यटक मुंबईत फिरायला आल्यावर सर्वाधिक प्रमाणात गेट वे ऑफ इंडिया येथे भेट देतात आणि मग त्यानंतर मन्नत बंगल्याचा दुसरा क्रमांक आहे.
काही वर्षांपूर्वीपर्यंत याच बॅण्ड स्टँड येथील हॉटेल सी रॉक लक्षवेधक ठरत होते. आज जेथे ताज लॅण्ड हॉटेलची भव्य दिव्य दिमाखदार वास्तू उभी आहे, त्याच्या अगदी समोरच हॉटेल सी रॉक होते. १९७७ साली सुरू झालेले हे हॉटेल साधारण २००० सालापर्यंत वैभवात उभे होते आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीत त्याचाही विशेष वाटा आहे. ती वास्तू पाडल्यानंतर खरंतर तेथे काहीच नव्हते. पण आता त्या जागेवर एक वास्तू उभी राहत आहे. तेही पंचतारांकित हॉटेलच आहे अथवा अन्य काही आहे ते अजून स्पष्ट झालेले नाही. काही जरी असले तरी हिंदी चित्रपटसृष्टी आणि सी रॉक यांच्या नात्यातील वीण सांगायला हवीच.
१९८३ सालची गोष्ट. मी मीडियात नवीनच होतो. चित्रपटांतून अधूनमधून मुंबईतील पंचतारांकित हॉटेल संस्कृती पहात होतो (यश चोप्रा दिग्दर्शित ‘दीवार’ मध्ये नरीमन पॉइंट येथील ओबेरॉय हॉटेल), तर कधी जुहू येथील सन ॲण्ड सॅण्ड हॉलमधील एखाद्या सुपर डुपर हिट चित्रपटाच्या पार्टीचे फोटो पाहत होतो. पण जेव्हा प्रत्यक्षात या पंचतारांकित हॉटेलमध्ये जाण्याचा योग आल्यावर मध्यमवर्गीय संकोच कायम राहणारच.
मी सी रॉकला पहिल्यांदा पाऊल टाकले ते कंवल शर्मा दिग्दर्शित ‘जिम्मेदार’ चित्रपटाच्या मुहूर्ताच्या वेळी! राजीव कपूर, टीना मुनिम, अनिता राज आणि अनुपम खेर यांच्या प्रमुख भूमिका. आमंत्रणावरची साडेसात वाजता अशी वेळ वाचून ठीक वेळेवर सी रॉकला पोहोचलो तेव्हा हॉलची सजावट चालली होती (तात्पर्य आमंत्रणावर दिलेल्या वेळेवर या चित्रपटसृष्टीत काहीही घडत नाही हा पहिला धडा घेतला आणि तो कायमच पाळला.) कवल शर्मा अनेक वर्षे मनमोहन देसाई यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक होता म्हणून त्यांच्या शुभ हस्ते या चित्रपटाचा मुहूर्त आणि आपला सुपुत्र या चित्रपटात नायक आहे म्हणून त्याला आशीर्वाद द्यायला चक्क राज कपूर. (लहानपणापासून पडद्यावर पाहिलेली गोरी गोरी गोमटी माणसं अशी चक्क काही अंतरावरच प्रत्यक्षात दिसताहेत हे स्वप्नवतच होते. पण प्रत्यक्षात होते.) रात्री उशिरापर्यंत हा मुहूर्त रंगला हे आठवतंय. चित्रपटसृष्टीचा कारभार घड्याळाची गरज नाही या अलिखित नियमानुसार चालतो हेही समजलं.
सी रॉकमध्येच अनिल शर्मा दिग्दर्शित ‘हुकुमत’ या चित्रपटाच्या मुहूर्त दृश्यात सदाशिव अमरापूरकर हे एका पाळीव कुत्र्याशी संवाद साधताहेत हे दृश्य पाहून खरंच आनदलो. याचं कारण, यातून या चित्रपटातील खलनायकाला मुहूर्त दृश्यात महत्व दिले. सदाशिव अमरापूरकर यांना ही गोष्ट आवर्जून सांगितली. विशेष म्हणजे मुहूर्त पार पडला आणि धर्मेंद्रचे आगमन झाले. वातावरण अतिशय खेळीमेळीचे होते. नवीन चित्रपटाचा मुहूर्त ही गोष्ट त्या काळातील चित्रपटसृष्टीसाठी जणू एक सण असे. फिल्मी पाहुणे भला मोठा पुष्पगुच्छ आणणार आणि मुहूर्त दृश्य पार पडतोय तोच टाळ्या आणि लगोलग हाती मिठ्ठास पेढा.
याच सी रॉकच्या स्वीमिंग पुलावरही काही चित्रपटांचे झक्कास मुहूर्त रंगले. अनिल शर्मा दिग्दर्शित ‘शेर’ या चित्रपटाच्या मुहूर्ताच्या वेळचा अनुभव भन्नाट आहे. मुहूर्ताच्या वेळेपासून तासाभराने एकेक तारा तारका स्वीमिंग पुलावर येऊ लागले. फ्लॅश उडू लागले. किमी काटकर नेहमीप्रमाणेच आपल्या आईसोबत आली. स्वप्ना आली. रणजीत आला. धर्मेंद्रची वाट पाहिली जात होती. अर्थात तोच ‘शेर’ होता आणि तो आला, आम्ही त्याला पाहतोय, तो मात्र किमी काटकरला पाहत होता आणि अगदी अनपेक्षितपणे त्याने छान हसत असलेल्या किमी काटकरचे चक्क चुंबन घेतले. तेही ओठांचे. ती या धक्क्याने बावरली, घाबरली की सुखावली हे कळले नाही आणि कळून उपयोगही नव्हता. फोटो मात्र भरभरुन निघाले आणि या चित्रपटाचं अस्तित्व या फोटोपुरतेच राहिले. कारण हा चित्रपट मुहूर्तानंतर बंद पडला तो कायमचाच. ते काही असो. चित्रपटसृष्टीतील भटकंतीत असं काही लाईव्ह, चालतं बोलतं, घडतं पाहायला मिळेल हे सांगता येत नाही म्हणून त्या फिरण्यात गंमत आहे.
या पंचतारांकित हॉटेलमध्ये फिल्मी पार्ट्या तर केवढ्या तरी होत. मला आठवतंय जवळच्याच मेहबूब स्टुडिओत सुभाष घई दिग्दर्शित ‘कर्मा’ या चित्रपटाच्या भर दुपारच्या अतिशय जोरदार लक्षवेधक मुहूर्तानंतर याच सी रॉकच्या प्रशस्त हॉलमध्ये विशेष मेजवानी आयोजित केली होती आणि या चित्रपटातील नायिका तोपर्यंत निश्चित न झाल्याने या मेजवानीला डिंपल कपाडिया, पूनम धिल्लो, मीनाक्षी शेषाद्री होत्या. आपल्याला करारबद्ध करण्यात यावे यासाठी अशी हजेरी आणि भेटीगाठी घ्याव्या लागतातच.
याच सी रॉकच्या अगदी टॉपवरच्या फिरत्या स्पॉटची केवढी खासियत होती (चर्चगेट येथील ॲम्बेसेडर हॉटेल आणि सी रॉक या दोनच ठिकाणी हे अतिशय हळुवार आणि नकळतचे फिरणं). येथे एस. रामनाथन दिग्दर्शित
‘गिरफ्तार’ ची पार्टी रंगली होती. सिनेपत्रकारितेने हेदेखील दिले. याच सी रॉकच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या मिनी थिएटरमध्ये आम्हा सिनेपत्रकारांना कधी आगामी चित्रपटाची गाणी दाखवली जात. तेथे डबिंगही होत असे. अतिशय प्रशस्त आणि अगदीच मोजक्या पंचवीस आरामदायक आसनाचे असं ते होतं. काही झाले तरी ते पंचतारांकित हॉटेलमध्ये होते.
श्रीदेवीचे कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसात मुंबईत आपलं घर नव्हते (घराची समस्या अशी सर्व सामाजिक स्तरावर). अनेक वर्षे ती याच
सी रॉकमध्येच राहायची. आता तिच्या तारखांनुसार निर्माते महागडं भाडे भरत होते अथवा कसं याचा त्या काळातील मीडियाने शोध घेतला नाही. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल मीडियाला त्यात स्टोरी दिसली असती.
काही सांगता येत नाही.
सी रॉकच्या पबमध्ये ‘हमला’ या चित्रपटातील मादक मोहक गाण्याचं किमी काटकरवर चित्रीकरण असतानाच नेमकं दिग्दर्शक एन. चंद्रा यांच्या सांगण्यावरून मुलाखतीसाठी जाणं झालं. एन. चंद्रा यांचे गाण्याचं चित्रीकरण हा एक वेगळाच अनुभव असतो. त्यांचं व्हिजन जबरदस्त. त्या काळातील यशस्वी पटकथा लेखक के. के. शुक्ला यांचे अतिशय आवडते हॉटेल सी रॉक. विशेष उल्लेखनीय गोष्ट यातील बारमध्ये ते आपल्या भेटीसाठी अथवा मुलाखतीचे ठरवतं. त्या काळातील फिल्मवाले असे दिलदार आणि दिलखुलास असत. वागण्यात, बोलण्यात, विचारात हिशोबीपणा नसे.
आता एक वेगळी आठवण. तेजाब, राम लखन आणि त्रिदेव यांनी यशाची हॅट्‌‍ट्रिक साधली आणि माधुरी दीक्षित स्टार झाली. तिच्या अनेक नवीन चित्रपटांचे मुहूर्त होऊ लागले. त्यात एक चित्रपट होता, सुशील मलिक दिग्दर्शित ‘अन्नदाता’. आणि नायक संजय दत्त. सी रॉकच्या वरच्या मजल्यावर पाठीमागे एक मोठ्या कटआउटसमोर मुहूर्त दृश्य होते. दुपारी अकरा वाजताची वेळ असताना साडेबारा वाजले तरी काहीच हालचाल दिसेना. फोटोग्राफर्सची चलबिचल सुरू झाली, फार उशीर होतोय असं म्हटलं जाऊ लागले आणि मग एकदाचं संजू आणि माधुरीवर मुहूर्त दृश्य पार पडले, पण चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होण्याआधीच तो बंद पडला. सुरुवातच अडखळत झाल्यावर काय हो?
अशा सी रॉकमध्येच १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील एक येथे झाल्याचे वृत्त आले आणि त्यानंतर या सी रॉकची झळाळी उतरु लागली. काही वर्षांनी ते बंद
पडले आणि मग पाडलेही गेले. आता त्या जागेवर नवीन बांधकाम सुरू आहे असे वृत्त समजले आणि हा फ्लॅशबॅक तुमच्यासमोर उभा केला. चित्रपटाच्या जगात अनेक लहान मोठ्या जागा, ठिकाणं, स्थळं, वास्तू यांचा सहभाग आहे, समावेश आहे. त्यात पंचतारांकित हॉटेलही आहेत आणि तेथील
अशा अनेक गोष्टी, आठवणी, किस्से, कथा आहेत.

  • दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

Check Also

निसर्गाच्या सानिध्यात धोदाणी ते माथेरान इको-फ्रेंडली ट्रेक

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्तनिसर्गरम्य डोंगररांगा, हिरवाईने नटलेला परिसर, …

Leave a Reply