लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे उद्गार; पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
पनवेल : रामप्रहर वृत्त
स्वतःच्या प्रकृतीची काळजी न करता शेवटच्या श्वासापर्यंत समाजस्वास्थ्यासाठी झटणारे स्व. जनार्दन भगत यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील कार्य अजरामर आहे. त्यांचा वारसा घेत आपण सर्व वाटचाल करीत असून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देऊन नवी पिढी घडविण्याचे काम करीत आहोत. रयत शिक्षण संस्था आपली मातृसंस्था आहे आणि या संस्थेचा आदर्श घेऊन शिक्षण देण्याचे काम होत आहे, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खांदा कॉलनी येथे केले.
कष्टकर्यांचे द्रष्ट नेते, थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांचा 34वी पुण्यतिथी कार्यक्रम शनिवारी (दि. 7) खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर महाविद्यालयात (स्वायत्त) झाला. त्या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर अध्यक्षीय भाषणात बोलत होते. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेने रयत शिक्षण संस्थेचा शैक्षणिक वारसा जपला आहे, असे त्यांनी नमूद केले.
जशी दिवसामागून रात्र तसा जन्मानंतर मृत्यू असतो, परंतु काही माणसे अमर असतात, कारण त्यांनी आपल्या कार्याने जिव्हाळ्याचे, त्यागाचे अनुभव समाजास दिलेले असतात. त्यामुळे ते जनतेच्या स्मरणातून कधीच लोप पावत नाहीत. ते चांगल्या कार्याची प्रेरणा समाजाला सतत देत राहतात. या विचाराला साजेसे त्यागाचे अमरशिल्प म्हणून स्व. जनार्दन भगतसाहेब यांची कायम स्मृती राहिली आहे. भगतसाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, उपमहापौर सीताताई पाटील, कार्यकारी मंडळ सदस्य व महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, नगरसेवक नितीन पाटील, कार्यकारी मंडळ सदस्य व नगरसेवक अनिल भगत, नगरसेवक अजय बहिरा, कार्यकारी मंडळ सदस्य संजय भगत, वसंत पाटील, भार्गव ठाकूर, नगरसेविका दर्शना भोईर, नगरसेविका सुशिला घरत, शशिकांत शेळके, अमोघ ठाकूर, प्रभारी प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, खारघरच्या रामशेठ ठाकूर कॉलेजचे प्राचार्य डॉ. भूपेंद्र गायकवाड यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुढे म्हटले की, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचा विस्तार व कारभार वाढला आहे. आपले कॉलेज नामांकनात ए प्लस आहे. याचे कारण आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि सुविधा देण्याचे काम केले आहे. यापुढे अनेक शिक्षण क्षेत्रातील आव्हाने आपल्या सर्वांना पेलायची आहेत आणि परदेशाप्रमाणे आपल्या येथेही शिक्षण देण्याचे काम झाले पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहायला हवे.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी सांगितले की, जनार्दन भगतसाहेबांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट आहे. त्यांनी अहोरात्र जनतेची सेवा केली. फक्त राजकारण नाही, तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. आयुष्यापेक्षा ध्येय मोठे असले पाहिजे, अशी शिकवण त्यांनी समाजामध्ये रूजवली. भगतसाहेबांनी गव्हाण-पनवेलला मार्गदर्शन करण्याचे काम केले. समाजामध्ये न्याय निवाडा करण्याचे कामही त्यांनी प्रामाणिकपणे केले.
दरम्यान, स्व. जनार्दन भगतसाहेबांनी अहोरात्र आपला देह ’बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या तत्त्वाच्या पूर्ततेसाठी कारणी लावला. तळागाळातील लोकांबद्दल त्यांना विशेष प्रेम होते. लोकांचे दारिद्य्र व भूक दूर करण्यासाठी अगदी मनापासून तळमळ होती. समाजातील शेवटच्या घटकाचा उद्धार फक्त शिक्षणामुळेच होऊ शकेल हे त्यांनी जाणले होते. आपली दूरदृष्टी, अविश्रांत कष्ट, चिकाटी, धडाडी त्याचबरोबर व्यापक समाजहिताची तळमळ ही उदात्त भावना स्व. जनार्दन भगत यांच्या अंत:करणात कायम होती. त्यांची शिक्षणाविषयी असणारी प्रचंड आस्था, तळमळ या इच्छापूर्तीच्या उद्देशाने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापन करण्यात आली. समाजातून अज्ञानरूपी अंधःकाराचा नाश होऊन ज्ञानरूपी प्रकाश सर्वत्र निर्माण व्हावा. त्याचप्रमाणे या भागातील सर्वसामान्य गरीब माणसाचा उत्कर्ष व्हावा या उदात्त ध्येयाने प्रेरित झालेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेने केजी ते पीएचडी आणि तत्सम कोर्सेस अशी शैक्षणिक क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक तत्त्वातून प्रेरणा घेऊन स्व. जनार्दन भगत यांच्या आशीर्वादाने आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उत्तम सुविधा, उच्च दर्जाचे शैक्षणिक वातावरण यामुळे विद्यार्थांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देणारी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था अग्रस्थानी ठरली आहे.
दर्जेदार शिक्षण देत राहू -आमदार प्रशांत ठाकूर
स्पर्धेचे युग व ऑनलाईन शिक्षणामुळे विविध कोर्सेस येत आहेत. त्याचे प्रशिक्षण आता उपलब्ध होत आहेत. त्यामुळे सर्वच शिक्षण संस्थांना स्पर्धेशी तोंड द्यावे लागणार आहे. आपली संस्था स्पर्धेच्या युगातही तयार असते. आजवर आपली संस्था सर्वोत्तम शिक्षण देण्याचे काम करीत आली आहे हे अभिमानास्पद आहे. प्रतिभावंत विद्यार्थ्यांमुळे आपल्या संस्थेचे नाव उज्ज्वल झाले आहे. यापुढेही विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात दर्जेदार व आवश्यक शिक्षण देण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करीत राहू, असे सांगून लोकनेते रामशेठ ठाकूर रयत शिक्षण संस्थेशी जोडले गेले आहेत आणि या संस्थेच्या गुणातून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची वाटचाल सुरू आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी सांगितले.
जनार्दन भगतसाहेबांच्या नावाने व आशीर्वादाने सुरू झालेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे नाव जगभरात पोहचले याचे सर्व श्रेय लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सर्व सहकार्यांना आहे. समाजाला दिशा देण्याचे आणि शिक्षण देण्याचे भगतसाहेबांचे स्वप्न लोकनेते रामशेठ ठाकूर पूर्ण करीत आहेत.
-अरुणशेठ भगत, अध्यक्ष,जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था