आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती
पनवेल ः रामप्रहर वृत्त
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने सोनी पैठणी महोत्सवाचे भव्य आयोजन शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालयात करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उदघाटन भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि.२) झाले.
उद्घाटन समारंभास महापौर नितीन पाटील, माजी सभागृहनेते तथा नगरसेवक परेश ठाकूर, महिला व बालकल्याण समिती सभापती ममता म्हात्रे, रोटरी क्लब डिस्ट्रीक्ट गव्हर्नर नितीन ढमाले, नगरसेवक प्रथमेश सोमण, रोटेरियन डॉ. गिरीश गुणे, डॉ. अमोद दिवेकर, डॉ. पटेल, पनवेल क्लब अध्यक्ष दीपक गडगे, नेहल ठक्कर चंद्रन आदी मान्यवर उपस्थित होते. तब्बल १७० वर्षांची देदिप्यमान परंपरा असलेल्या या महोत्सवामध्ये महिलांसाठी अस्सल येवला आणि नाशिकच्या रेशमी पैठणी साड्यांचा विशेष खजिना उपलब्ध करून देण्यात आला आहे.
यावेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या या स्तुत्य उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. रोटरी क्लबच्या माध्यमातून सातत्याने समाजोपयोगी कामे केली जातात. या सामाजिक कार्याला हातभार लावण्यासाठी तसेच पैठणी परंपरेचा आनंद घेण्यासाठी पनवेलकरांनी या महोत्सवाला जास्तीत जास्त संख्येने भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्राची संस्कृती आणि सौंदर्य जपणाऱ्या पैठणी साड्यांची ही मोठी परंपरा एकाच छताखाली अनुभवण्याची नामी संधी या महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना आणि विशेषतः महिलावर्गाला आहे. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रमांची साखळी जपतानाच या पारंपरिक कला-संस्कृतीला आणि विणकरांना प्रोत्साहन देण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला आहे.
तीन दिवस सुरू असणाऱ्या या महोत्सवात विविध डिझाईन्स, आकर्षक रंगसंगती आणि उत्कृष्ट सिल्क दर्जाच्या पारंपरिक तसेच आधुनिक पैठणी साड्यांचे भव्य प्रदर्शन आणि विक्री सुरू असून पनवेल व आसपासच्या परिसरातील नागरिकांनी या सोनी पैठणी महोत्सवाला आवर्जून भेट देऊन या कलावैभवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper