मुंबई ः रामप्रहर वृत्त
समाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहा दशकांहून अधिक काळाच्या संघर्षमय, कर्तृत्ववान आणि सेवाभावी जीवनप्रवासाचा प्रतिष्ठेच्या बुधवारी (दि. ७) शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार शरद पवार यांच्या हस्ते आणि प्रतिभाताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच राज्यातून आलेल्या हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्या वतीने मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि सार्वजनिक जीवनात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत गोरगरिबांचे आधारस्तंभ, गरजूंच्या मदतीला धावून जाणारे दानशूर व्यक्तिमत्त्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने यथोचित गौरव करण्यात आला.
या सोहळ्यास रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, ज्येष्ठ नेते वाय.टी देशमुख, कामगार नेते महेंद्र घरत यांच्यासह भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेलचे महापौर नितीन पाटील, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, नगरसेवक परेश ठाकूर, सुमित झुंजारराव, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, अमोघ ठाकूर, पूनम ठाकूर, रत्नप्रभा घरत यांच्यासह ठाकूर कुटुंबीय, माजी नगरसेवक अनिल भगत, माजी शहराध्यक्ष जयंत पगडे, शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजारामबुवा शेलार, उपाध्यक्ष भावना घाणेकर, विविध संस्थांचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख त्यांच्या पदांपेक्षा माणसांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यात आहे. मोठेपणाची कोणतीही औपचारिकता न ठेवता सर्वसामान्य माणसांमध्ये सहजपणे मिसळणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि शक्य ते सहकार्य करण्यासाठी तत्पर राहणे ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये राहिली आहेत. गरिबांच्या घरातील अडचण असो, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असो, एखाद्या कुटुंबावर आलेले संकट असो किंवा तरुणांच्या भविष्याचा प्रश्न असो; मदतीची गरज असलेल्या व्यक्तीपर्यंत पोहचण्याची त्यांची भूमिका सातत्याने राहिली आहे. त्यामुळेच अनेक गरजू कुटुंबांसाठी ते आधारवड, तर असंख्य विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची आशा ठरले आहेत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहचला पाहिजे, ही भावना त्यांच्या समाजकार्याच्या केंद्रस्थानी राहिली. त्याचप्रमाणे प्रसिद्धी किंवा प्रसिद्धीचा गाजावाजा करण्यापेक्षा प्रत्यक्ष मदत आणि सामाजिक दायित्वाला त्यांनी महत्त्व दिले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा जीवनप्रवास हा संघर्षातून उभ्या राहिलेल्या कर्तृत्वाची प्रेरणादायी कहाणी आहे. अत्यंत सामान्य परिस्थितीतून पुढे येत त्यांनी व्यवसाय, समाजकारण, शिक्षण आणि राजकारण या विविध क्षेत्रांत आपले स्थान निर्माण केले. शिक्षकाची नोकरी करत असताना सिडकोचे दहा हजार रुपयांचे पहिले काम मिळाले. हे काम स्वीकारण्यासाठी घरातील दागिने गहाण ठेवण्याबरोबरच पैसे उधार घेण्याची वेळ आली, मात्र संकटाला न घाबरता त्यांनी संधीचे कर्तृत्वात रूपांतर केले. कष्ट, प्रामाणिकपणा आणि जिद्दीच्या जोरावर हे काम यशस्वी करत त्यांनी व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. दहा हजार रुपयांपासून सुरू झालेला प्रवास पुढे मोठ्या प्रकल्पांपर्यंत पोहचला, परंतु आर्थिक यश मिळाल्यानंतरही त्यांच्या पायाखालची माती आणि माणसांशी असलेली नाळ कधी तुटली नाही.
छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा. पाटील आणि थोर समाजसुधारक जनार्दन भगत यांना आदर्शस्थानी ठेवून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या कार्याची वाटचाल केली. स्व. दि.बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी झालेल्या विविध आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. जमीन, रोजगार, घरे, साडेबारा टक्के योजना आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी झालेल्या लढ्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. १९८१ आणि १९८४मधील आंदोलनांदरम्यान त्यांनी संघर्षाची धुरा पुढे नेली. या संघर्षातून निर्माण झालेला जनविश्वास त्यांच्या सार्वजनिक जीवनातील मोठी ताकद ठरला. याच जनविश्वासाच्या बळावर त्यांनी लोकसभेपर्यंतची वाटचाल करत दोन वेळा खासदार म्हणून काम केले. राजकीय क्षेत्रात यश मिळाल्यानंतरही पद आणि सत्ता हे अंतिम ध्येय न मानता त्यांनी समाजकारणाला प्राधान्य दिले. वयाच्या ५२व्या वर्षी निवडणुकीच्या राजकारणापासून दूर होऊन समाजकार्याला अधिक वेळ देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर शिक्षण, आरोग्य, क्रीडा, कला, संस्कृती, रोजगार आणि सामाजिक मदत अशा विविध क्षेत्रांत त्यांच्या कार्याचा विस्तार झाला. ‘समाजाने आपल्याला दिले, ते समाजाला परत केले पाहिजे’ या भावनेतून त्यांचे सेवाकार्य पुढे सुरूच राहिले.
रयत शिक्षण संस्थेने दिलेले संस्कार आणि शिक्षणाचे ऋण फेडणे हीच खरी गुरुदक्षिणा या भावनेतून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शिक्षण क्षेत्रासाठी मोठे योगदान दिले. रयत शिक्षण संस्थेच्या शाळा, महाविद्यालये आणि विविध शैक्षणिक सुविधांसाठी त्यांनी १३५ कोटी रुपयांहून अधिक मदत केली आहे. आर्थिक अडचणींमुळे एखाद्या विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, ग्रामीण व गरजू विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळावी यासाठी त्यांनी सातत्याने मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान हे केवळ आर्थिक मदतीपुरते मर्यादित न राहता अनेक पिढ्यांचे भविष्य घडविणारे योगदान ठरले आहे.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, गरजू कुटुंबांना सहाय्य, आरोग्यविषयक उपक्रम, सामाजिक कार्य, क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक उपक्रमांना सातत्याने पाठबळ देण्यात आले आहे. क्रीडापटूंना संधी, कलाकारांना व्यासपीठ, विद्यार्थ्यांना आधार आणि गरजू कुटुंबांना मदतीचा हात देताना त्यांच्या कार्यामध्ये दानशूरपणा सामाजिक दायित्वाची भावना अधिक ठळकपणे दिसून आली आहे. .
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची ओळख केवळ एका राजकीय नेत्याची किंवा उद्योजकाची नसून सामान्य माणसांच्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या आपल्या माणसाची आहे. मोठमोठ्या पदांवर काम करूनही सर्वसामान्यांशी असलेला संवाद आणि संपर्क त्यांनी कायम जपला. याच सहजतेमुळे त्यांच्याभोवती माणसांचे नाते निर्माण झाले. गरिबांसाठी आधार, विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात, तरुणांसाठी संधी, कलाकारांसाठी व्यासपीठ आणि समाजासाठी कार्यकर्ता अशी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची विविध रूपे या जीवनप्रवासात दिसून येतात.
व्यवसायातून आर्थिक स्थैर्य मिळवतानाच भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी संघर्ष करणे, लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचे प्रश्न मांडणे, शिक्षण क्षेत्राला भक्कम आधार देणे आणि त्यानंतर समाजकारणाला अधिक वेळ देत निस्वार्थपणे सेवा करणे या संपूर्ण प्रवासाचा सन्मान शरदरत्न जीवनगौरव पुरस्कार या मानाच्या पुरस्काराने झाला आहे. आपल्या यशाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करण्याची, गोरगरिबांच्या पाठीशी उभे राहण्याची आणि आपल्या मातीशी व माणसांशी असलेली नाळ अखेरपर्यंत जपण्याची त्यांची वाटचाल या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित झाली आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे योगदान मोलाचे -खासदार शरद पवार
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या शिक्षण चळवळीमुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य समाज शिक्षित झाला. या महान शिक्षण परंपरेतूनच लोकनेते रामशेठ ठाकूर घडले आहेत. आज ते उद्योजक म्हणून ओळखले जात असले, तरी त्यांची खरी ओळख ही कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ‘कमवा आणि शिका’ योजनेतून घडलेला विद्यार्थी अशी आहे, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार शरद पवार यांनी सत्कार सोहळ्यात काढले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दिलेला जनसेवेचा आणि शिक्षणसेवेचा वारसा लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जपला आहे. रयत शिक्षण संस्थेला त्यांचे आशीर्वाद आणि भक्कम पाठबळ सातत्याने लाभत आले आहे. रयत शिक्षण संस्था आज यशस्वीपणे उभी राहण्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे. संस्थेच्या पुढील वाटचालीतही त्यांची ताकद आणि सहकार्य अखंडपणे पाठीशी राहील, अशी अपेक्षा आहे, असे सांगून शिक्षण हे केवळ व्यक्तीच्या प्रगतीचे साधन नसून संपूर्ण समाजाच्या विकासाचे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी रामशेठ ठाकूर यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. कर्मवीरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन त्यांनी शिक्षण, समाजसेवा आणि जनकल्याणाच्या क्षेत्रात केलेले कार्य ही सामाजिक बांधिलकीची जपणूक करणारी परंपरा आहे, असेही ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी नमूद केले.
Check Also
पनवेलमध्ये रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिर
स्व. मुग्धा लोंढे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सेवाभावी उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या दिवंगत नगरसेविका मुग्धा …
RamPrahar – The Panvel Daily Paper