Breaking News

पाली येथे भाजपची सेवा ज्योती यात्रा

पाली ः प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक सेवेतील ऐतिहासिक प्रवासाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात सेवा संकल्प अभियान राबवले जात आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून पाली येथील श्री क्षेत्र बल्लाळेश्वराच्या पवित्र भूमीत बुधवारी (दि.७) सेवा ज्योती यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
७ ऑक्टोबर २००१ रोजी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली होती. तेथून सुरू झालेला हा सेवाप्रवास पुढील काळात २०१४पासून देशाचे पंतप्रधान म्हणून अविरतपणे सुरू आहे. या २५ वर्षांच्या कालावधीत त्यांनी जनसेवा आणि राष्ट्रविकासाच्या भावनेला प्राधान्य दिले. २५ वर्षांचा हा सेवाप्रवास पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सेवा संकल्प अभियानांतर्गत सेवा ज्योती यात्रा काढण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन व्हिडीओ स्क्रिनच्या माध्यमातून दाखविण्यात आले.
या उपक्रमादरम्यान बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक स्तरावर एक नवी ओळख निर्माण केली आहे. गुजरात राज्याचा कायापालट करण्यापासून ते देशातील कोट्यवधी गरिबांना दारिद्य्ररेषेच्या वर आणणे, मेक इन इंडिया उपक्रम, अंतराळ क्षेत्रातील चांद्रयान मोहीम यांसारख्या मोठ्या घोडदौडी आणि कोरोना काळात १०० कोटींहून अधिक लसीकरणाचा टप्पा पूर्ण करणे या सर्व ऐतिहासिक कामगिरींचा यात समावेश आहे.
भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार धैर्यशील पाटील यांनी सरकार नेहमीच जनतेला अधिक चांगले आणि पारदर्शक प्रशासन देण्यासाठी कटिबद्ध आहे, असे सांगितले. या उपक्रमाबद्दल महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष चित्रा पाटील यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगतिपथावर जात असल्याचे म्हटले.
सेवा ज्योती यात्रेत अभियान प्रमुख तथा जिल्हा परिषद सभापती वैकुंठ पाटील, भाजप नेते प्रकाश देसाई, गीता पालरेचा, आलाप मेहता, पंचायत समिती सभापती जागृती मानकर, सुधागड तालुकाध्यक्ष श्रीकांत ठोंबरे, महिला मोर्चा अध्यक्ष प्रणाली शेठ, नगराध्यक्ष पराग मेहता, अमित घाग, जि.प. सदस्य चंद्रकांत वारगुडा तसेच दादा घोसाळकर, शर्मिला पाटील, अरिफ मनियार, सुजित बारसकर, शरद चोरगे, विठ्ठल सिंदकर, रोहन दगडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यानंतर विकसित भारत संकल्प सभा झाली. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या २५ वर्षांच्या सेवाप्रवासाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमात अर्चना शेडगे हिने विकसित भारत दर्शविणारी भव्य रांगोळी काढली. त्याबद्दल तिला मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Check Also

पनवेलमध्ये रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिर

स्व. मुग्धा लोंढे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सेवाभावी उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या दिवंगत नगरसेविका मुग्धा …

Leave a Reply