स्व. मुग्धा लोंढे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सेवाभावी उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या दिवंगत नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त रविवारी (दि.४) पनवेल येथील विरूपाक्ष मंगल कार्यालयात रक्तदान आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लोंढे, ओझे आणि समेळ कुटुंबीयांच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून यंदाही नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
या शिबिराला आमदार प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील, माजी सभागृहनेते तथा नगरसेवक परेश ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक जयंत पगडे, नगरसेवक राजू सोनी, नगरसेविका रूचिता लोंढे, सारिका भगत, युवा नेते मयुरेश नेतकर, अमित ओझे, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, स्वाती कोळी यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले.
यावेळी मान्यवरांनी स्व. मुग्धा लोंढे यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या सामाजिक योगदानाला अभिवादन केले. समाजहितासाठी राबविण्यात येणारे असे उपक्रम हीच त्यांना खरी श्रद्धांजली असल्याची भावना आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली.
स्व. मुग्धा लोंढे या प्रेमळ स्वभाव, जनसामान्यांशी असलेला दांडगा संपर्क आणि समाजसेवेची तळमळ यामुळे पनवेल परिसरात लोकप्रिय होत्या. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी आयोजित या उपक्रमातून अनेक नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला, तर युवकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे, वैद्यकीय पथकाचे आणि स्वयंसेवकांचे लोंढे, ओझे व समेळ कुटुंबीयांनी आभार मानले.
RamPrahar – The Panvel Daily Paper