Breaking News

निमित्त जागतिक हास्य दिनाचे : मराठी चित्रपटांनी खूप खूप हसवले…

खरंतर दररोज हसत हसत जगायला हवं. त्यामुळे मानसिक, भावनिक, शारीरिक व बौद्धिकदृष्ट्या आपण एकदम फिट राहतो, पण हे दररोज शक्य होईलच असे अजिबात नाही. म्हणूनच बहुधा 2 ऑक्टोबर हा जागतिक हास्य दिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी चित्रपटांनी, त्यातील अनेक कलाकारांनी, विनोदी व्यक्तीरेखांनी, धमाल प्रसंगांनी आपल्याला नेहमीच हसवलं आहे. त्यातीलच या काही विनोदी गोष्टी.
विष्णुपंत जोग आणि दामुअण्णा मालवणकर ही मराठी चित्रपटातील एक विनोदवीरांची जोडी. हंस चित्र या निर्मिती संस्थेच्या मा. विनायक अभिनित व दिग्दर्शित “ब्रह्मचारी” (1938) या चित्रपटात ही जोडी सर्वप्रथम जमली. ब्रह्मचारी चित्रपटाने पुण्यात आर्यन चित्रपटगृहात रौप्य महोत्सवी यश संपादले. मुंबईत गिरगावातील मॅजेस्टिक सिनेमागृहात हा चित्रपट हाऊसफुल्ल गर्दीत चालला. मॅजेस्टिक सिनेमागृहात एक विशेष उल्लेखनीय गोष्ट, तिकीटाबरोबर सुकामेव्याची छोटी पाकिटे (त्या काळात मार्केटिंग हा शब्दप्रयोग रुळला नसला तरी हे करण्यात आले). ब्रह्मचर्य न पाळणाऱ्या आईबापाबद्दल कुठल्या मुलाला आदर वाटेल असे जन्मदात्यांना ठणकावून औदुंबर ( मा. विनायक) घर सोडतो आणि आचार्य चंडिरामच्या (दामुअण्णा मालवणकर) आश्रमात दाखल होतो अशा मध्यवर्ती कथासूत्रवरचा हा आचार्य अत्रे लिखित धमाल विनोदी चित्रपट. स्वतःसाठी आम्रयोग (आंबे खाणे) व इतरांसाठी
“कष्टयोग हा चंडिरामचा बाणा (आणि जोडीला विष्णुपंत जोग).
दामूअण्णा मालवणकर आणि विष्णुपंत जोग ही जोडी अनेक चित्रपटांत जमली. असाच एक चित्रपट पार्श्वनाथ आळतेकर दिग्दर्शित आणि हंस चित्र निर्मित “सुखाचा शोध”. त्यात दामूअण्णा मालवणकर “बाताराम” ही धमाल व्यक्तीरेखा साकारलीय. (याच चित्रपटावरुन काही वर्षातच या चित्रपटाचे कथा पटकथा व संवाद लेखक नावाची वि. स. खांडेकर यांनी कादंबरीही लिहिली.) हा बाताराम सतत थापा मारत असतो आणि त्यात त्याच्या मित्राची साथ मिळत राहते. या चित्रपटात विष्णुपंत जोग यांच्यावर एक होता राजा… असे धमाल विडंबन गीत आहे. एक विशेष गोष्ट म्हणजे या चित्रपटात बाबूराव पेंढारकर, मीनाक्षी शिरोडकर यांच्या भूमिका असूनही दामूअण्णा मालवणकर व विष्णुपंत जोग भाव खाऊन जातात असे म्हटले तर गेलेच. पण या चित्रपटाच्या टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रातील जाहिरातीत फक्त दामूअण्णा मालवणकर यांचाच फोटो होता. तर बाबूराव पेंढारकर यांनी मात्र व जोग या जोडीला उद्देशून एक पत्र लिहिले, तुम्ही पडद्यावर प्रेक्षकांसमोर आलात की सर्वांचे लक्ष तुमच्यावर केंद्रीत होते. आम्ही कितीही चांगले काम केले तरी ते वाया जाते.
बजेट हा मराठी सिनेमाचा नेहमीचाच विषय. अनेकदा तरी बजेटची गणितं न जुळल्यामुळे शूटिंग सुरू असलेले अनेक सिनेमे बंद पडल्याची सुद्धा काही उदाहरणं आहेत. एका विनोदी चित्रपटाने अशा अडचणींवर मात करत यश प्राप्त केले. या सिनेमाचं नाव ‌‘आम्ही जातो आमच्या गावा‌’. या सिनेमाचं शुटिंग जवळपास चार वर्षे सुरू होतं. हा सिनेमा बनवायला इतकी वर्ष का लागली असा तुमचा प्रश्न असेलच. या सिनेमाची कथा मोठी गमतीशीर. तुरुंगातून पळालेले तीन कैदी एका सज्जन माणसाच्या घराचा आश्रय घेतात. सुरुवातीला त्यांचा उद्देश चोरी करण्याचा असतो. पण त्यानंतर या तीन कैद्यांमध्ये कसं परिवर्तन घडतं आणि त्या सज्जन माणसाच्या आयुष्यात असलेल्या अडचणी हे तीन कैदी कशा सोडवतात याची धमाल गोष्ट म्हणजे हा सिनेमा. निर्माते दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांच्या या हा सिनेमाचं शुटिंग 1963 साली सुरु झालं होतं.
या काळात कमलाकर तोरणेंना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं. यामुळे शूटिंग लांबत चाललं होतं. शूटिंग एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल पुढचे चार पाच वर्ष सुरू होतं. आणि या अवधीत या चित्रपटासाठीचे कपडे विटले होते. जुने झाले होते. या सिनेमात सूर्यकांत, श्रीकांत मोघे, मधू आपटे, उमा भेंडे असे कलाकार होते. या सर्व कलाकारांनी सुद्धा कोणतीही तक्रार न करता पार विटून गेलेले हे कपडे वापरून हा सिनेमा पूर्ण केला.
हा सिनेमा पूर्ण करण्यासाठी सिनेमाचे निर्माते दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांनी एका धनाढ्य व्यक्तीकडून दहा हजार रुपयांचं कर्ज काढलं. 1968 सालाचा विचार केल्यास ही रक्कम निश्चितच काही लाखांची होती. अखेर 9 ऑगस्ट 1968 रोजी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. आणि आश्चर्य म्हणजे सिनेमा सुपरहिट झाला. आर्थिकदृष्ट्यासुद्धा सिनेमाने भरपूर कमाई केली.निर्माते दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांना भरपूर आनंद झाला. सिनेमा हिट झाल्याने त्यांना आर्थिक फायदासुद्धा झाला. पूर्वीच्या काळी सिनेमा हिट झाल्यावर कलाकारांना आठवण म्हणून ट्रॉफी दिल्या जायच्या. या ट्रॉफी लाकडाच्या किंवा पत्र्याच्या असायच्या. पण कमलाकर तोरणे यांनी आनंदाच्या भरात सर्व कलाकारांना चांदीच्या ट्रॉफी दिल्या. ज्या माणसाकडून त्यांनी दहा हजार रूपयांचं त्याचं कर्ज घेतलं होतं त्याचं कर्ज त्यांनी व्याजासकट परत केलं.
इतकंच नव्हे तर सिनेमाशी निगडीत सर्व कामगार आणि तंत्रज्ञांना त्यांनी दहा हजार रुपयांचा बोनस दिला. विनोदी चित्रपटाच्या यशात असे अडथळे, अशा अडचणी येत येत मार्ग काढत काढत यश प्राप्त केले. विनोदी चित्रपट हा मराठी चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीतील एक हुकमी एक्का. ऐंशीच्या उत्तरार्धात सचिन पिळगावकर, महेश कोठारे, गिरीश घाणेकर, पुरुषोत्तम बेर्डे यांनी मराठीत विनोदी चित्रपटाचे सातत्य कायम ठेवले. ‘धूम धडाका’ हा महेश कोठारेचा निर्मित व दिग्दर्शित पहिला विनोदी चित्रपट. महेश कोठारेच्या कॉलेजवयीन काळात ‌‘प्यार किए जा‌’ हा श्रीधर दिग्दर्शित विनोदी हिंदी चित्रपट खूप चालला होता. त्यामुळेच याचा रिमेक करण्याचा निर्णय महेशने घेतला. अण्णासाहेब देऊळगावकर यांच्यामुळे हा चित्रपट होऊ शकला. त्यांनी लेखनात महेश कोठारेला खूप मदत केली. मेहमूद, शशी कपूर आणि किशोर कुमार, ओम प्रकाश यांचा हा गाजलेला चित्रपट. याचा रिमेक करताना महेश कोठारेच्या डोळ्यासमोर कास्टिंग निश्चित झाले होते. शशी कपूरच्या रोलसाठी महेश स्वतः, किशोर कुमार यांच्या रोलसाठी अशोक सराफ, ओमप्रकाश यांच्या रोलसाठी शरद तळवलकर आणि मेहमूदच्या रोलसाठी कुणाला कास्ट करायचे हा महेशसमोर मोठा प्रश्न होता. या रोलसाठी लक्ष्मीकांत बेर्डे मिळाला आणि मराठी चित्रपटसृष्टीला एक नवा सुपरस्टार.
धूम धडाकानंतर लक्ष्या आणि महेश कोठारे यांची चांगलीच जोडी जमली. त्यानंतर त्यांनी महेश कोठारेच्या दे दणादण, थरथराट, धडाकेबाज , खतरनाक इत्यादी चित्रपटातून दोघांनी खूप काम केले. एक वेगळंच बॉडिंग त्या दोघांत निर्माण झालं होतं. महेशच्या चित्रपटात लक्ष्मीकांत खुलून काम करायचा. हॉलिवूडमध्ये जशी डिन मार्टिन आणि जेरी लुईस यांची जोडी होती. तशी इथे महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डेची जोडी आहे, असं तेव्हा गमतीने म्हटले जायचं. ‌‘ही दोस्ती तुटायची नाय‌’ हे गाणं त्यातूनच जन्माला आलं होतं असे म्हटलं तरी चालेल.
महेश कोठारेच्या दिग्दर्शनातील चित्रपटातील व्हिलनचे विचित्र नाव हा एक गमतीदार प्रकार होता. ‘दे दणादण’मध्ये जो व्हिलन होता, त्याचे नाव ठेवले होते ‌‘झगड्या रामोशी‌’. या नावांचे श्रेय अण्णासाहेब देऊळगावकर यांना जाते. त्यांनीच व्हिलनची नावे अँटिक ठेवण्याबाबत महेशला सांगितले. कवठे महांकाळ या गावाच्या नावावरुन महेशला ‌‘कवट्या महाकाल‌’ हे नाव सुचले. थ्रिलर चित्रपटातही कॉमेडी असते त्यामुळे ‌‘टकलू हैवान‌’ आणि त्याची टकली गँग साकारली. झपाटलेला चित्रपट महेशने सात दिवसांत लिहून पुर्ण केला होता. पण व्हिलनचे नाव काही सुचत नव्हते. हॉलिवूडमध्ये स्कॉर्पियन नाव प्रचलित होते. त्यावरुन महेशने मराठीत विंचू असे नामकरण केले. विंचूला बॅलन्स करण्यासाठी महेशच्या चित्रपटाच्या सेटवर एक काका होते. त्यांना सगळेच तात्या म्हणायचो. त्यामुळे चित्रपटाचा खलनायक व्हीलन ‘तात्या विंचू’ झाला.
अशोक सराफचा अभिनय क्षेत्रातील चौफेर दीर्घानुभव पाहता त्याचे एकाद्या विषयावरील त्याचे बोलणे अतिशय महत्वाचे हे ओघाने आलंच. अशोक सराफ म्हणतो, ‘मी मुळात विनोदी नट नाही, तर ते ते विशिष्ट पात्र उभं करणारा कलाकार आहे. सुरुवातीला विनोदी भूमिका केल्या म्हणून तसा शिक्का माझ्यावर बसला. तो पुसून टाकायचा, म्हणून तिसऱ्याच चित्रपटात मी खलनायकाची भूमिका केली होती. ‘अरे संसार संसार’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली. लोकांना अशा भूमिकाही आवडल्या. हिंदी चित्रपटसृष्टीच्या दृष्टीनं मराठी माणूस हा नायकाच्या संकल्पनेत बसतच नाही. मराठी कलाकार हिंदी चांगलं बोलू शकत नाहीत, असाही हिंदी चित्रपटसृष्टीत गैरसमज आहे. मला हिंदीत काही चांगल्या भूमिका मिळाल्या; पण अनेक फालतू भूमिकाही मिळाल्या. त्या मी वेळ होता म्हणून केल्या. हिंदी चित्रपटसृष्टीत मराठी कलाकारांना म्हणावी तशी किंमत नाही. रंगभूमीवरचे कलाकार असल्याची जाणीव ठेवून मात्र ते मराठी कलाकारांना टरकून असतात.
राजकमल कलामंदिर (युवा विंग) निर्मित, निर्माते किरण शांताराम आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांचा ‘अशी ही बनवाबनवी’ हा सर्वकालीन लोकप्रिय असा विनोदी चित्रपट. त्याच्याबद्दल किस्से सांगावेत तेवढे थोडेच. या चित्रपटातला आयकॉनिक डायलॉग ‘हा माझा बायको’ स्क्रिप्टचा भागच नव्हता. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची मैत्री खूप घट्ट होती. त्यामुळे ही माझी बायको म्हणण्याऐवजी अशोक सराफने ‘हा माझा बायको’ चुकून म्हटलं आणि तो हिट झाला.
हा चित्रपट 1966 मध्ये आलेल्या ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘बीवी और मकान’चा रिमेक आहे. सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ यांनी याआधीही एकत्र काम केलं होतं. पण सचिन आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे लक्ष्मीकांतला आपली भूमिका कमी होण्याची भीती होती. मात्र प्रदर्शनापूर्वी जेव्हा मुंबईत प्रेस शो झाला तेव्हा त्याने पाहिलं की इतरांना जेवढा स्क्रीन टाइम मिळाला आहे तेवढाच त्यांनाही मिळाला आहे. त्यानंतर सचिन आणि त्यांची मैत्री कायमची घट्ट झाली. हा चित्रपट रंगमंचाचे महानायक बालगंधर्व यांना समर्पित होता. ‘कुणीतरी येणार गं’ या दृश्याच्या चित्रीकरणाच्या वेळी लक्ष्मीकांतला दिवसभर गरोदर बाईच्या गेटअप मध्ये राहावं लागलं. तेव्हा तो म्हणाला, महिलांना यातून जाण्यासाठी किती अडचणींचा सामना करावा लागतो हे आज मला जाणवलं. सचिन पिळगावकरने स्त्रीचं रूप घेऊन सेटवर अनेकांसोबत गंमत केली होती. त्याच्या या रुपाने अनेक जण फसले होते. त्यात चित्रपटाचे लेखक वसंत सबनीसदेखील होते. त्यांनी सचिन पिळगावकरला सुरुवातीस ओळखलेच नाही. जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डेला कळलं की या चित्रपटात स्त्री भूमिकाही करायचीय तेव्हा तो निराश झाला. तेव्हा सचिन त्याला म्हणाला, मीसुद्धा स्त्री भूमिका करणार आहे. त्यावर लक्ष्मीकांत म्हणाला, मला कोण बघेल? सगळे तुलाच बघतील. त्यावर सचिन म्हणाला, लोक माझ्याकडे स्त्री म्हणून बघतील पण तू करत असलेलं पार्वतीचं पात्र ते जास्त एन्जॉय करतील आणि तसं झालंही.
दादा कोंडके अभिनित, निर्मित व दिग्दर्शित “तुमचं आमचं जमलं” या चित्रपटात दादा कोंडके व अशोक सराफ सख्खे भाऊ असतात. एक चांगला तो नायक तर दुसरा वाईट म्हणजे खलनायक. हा खलनायक अशोक सराफने साकारला होता. सेटवर दादा व अशोक सराफ एकमेकांशी फारसं बोलत नसत असे खुद्द अशोक सराफ यांनीच या चित्रपटाची आठवण देताना एकदा सांगितले. अशोक सराफ यांच्या मते त्यांच्या भूमिकेचे वजन जास्त होते. सगळीकडे माकड घेऊन फिरायचे होते. याच माकडापासून चोऱ्या करुन घ्यायच्या. चोरी करण्याचे ट्रेनिंग हा खलनायकच देतो. आणि ते माकड खिडकीतून हात घालून चोरी करीत असे. त्या काळात असे प्रकार झालेही होते. चित्रपटात एकच माकड असले तरी शूटिंगसाठी तीन माकडे वापरली. पहिल्या दिवशी सेटवर माकड आणले तेव्हा अशोक सराफना धडकीच भरली. आपल्याला माकडासोबत काम करायचयं ही ठीक आहे. पण या माकडाला काही प्रशिक्षण दिले आहे ना अशी अशोक सराफ यांच्या मनात शंका होती. मराठीत तेवढं बजेटही नव्हतं. मदारी शिकवे तेवढेच तो करे. मदारी अशोक सराफना म्हणाला, असा हात पुढे करा ते माकड आपोआप तुमच्या हातावरुन तुमच्या खांद्यावर जावून बसेल. माकडाने खरोखरच तसे केल्यावर अशोक सराफ यांच्या मनातील भीती थोडी कमी झाली. तेव्हा पटकन अशोक सराफ म्हणाले, ए शाब्बास! हे ऐकताच त्या माकडाने अशोक सराफ यांच्या डोक्यावर एक सणसणीत टपली मारली. काही झालं तरी माकडाशी बोलायचे नाही असे ठरवूनच अशोक सराफ यांनी या चित्रपटात काम केले पण पहिली दोन माकडे तोपर्यंत पळून गेली.
दादा कोंडके नायक आणि अशोक सराफ खलनायक असे पांडू हवालदार, रामराम गंगाराम व तुमचं आमचं जमलं असे तीन चित्रपट आल्यावर अशोक सराफ यांनी दादांमुळे चित्रपट लोकप्रिय ठरतोय म्हणून आपण त्यांच्या चित्रपटात अडकून रहावे असे अशोक सराफना मंजूर नव्हतेच. म्हणून त्यानंतर अशोक सराफ यांनी स्क्रिप्ट आवडली नाही असे सांगून नकार दिला तरी ते दादा कोंडके यांचे ॠण मानतात. गुडघ्यापर्यंतच्या चड्डी, लोंबणारी नाडी, त्यावर हाफ हाताचा कुर्ता, केसांचा पैलवान कट, बारीक मिशी असणाऱ्या दादा कोंडके यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. दादा कोंडके आज आपल्यात नाहीत, पण त्यांच्या विनोदी आठवणी आजही चाहत्यांना पोट धरुन हसण्यास भाग पाडतात. दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं आणि रामराम गंगाराम या तीन चित्रपटात अशोक सराफची भूमिका असून ही त्या काळातील एक लोकप्रिय जोडी आहे. दादा कोंडके यांच्या विनोदाचा वारसा काही प्रमाणात पुढे समर्थपणे पेलला तो सर्वांचे लाडके अभिनेते सराफ यांनी. दादा कोंडके यांनी अशोक सराफ यांना एक गुरुमंत्र दिला होता.
दादा कोंडके यांनी दिलेला गुरुमंत्री आजही अशोक मामा विसरु शकले नाहीत. ‌‘दादांचा विनोद कधीच ओढून ताणून नव्हता तर त्यामध्ये एक उत्स्फूर्तता होती. विनोदातील निखळता आणि विनोदी संवादातील उत्स्फूर्तता कशी आणायची हे मी दादांकडे पाहून शिकलो. दादांनी जणू मला हा गुरूमंत्रच दिला होता. दादांच्या विनोदातील सहजता लोकांना इतकी भावली की दादांचा सिनेमा म्हणजे ज्युबिली स्टार हे समीकरणच झालं.‌’ पुढे अशोक सराफ म्हणाले, ‌‘दादांमध्ये खूप टँलंट होतं. दादा पडद्यावरच नव्हे तर व्यक्तीगत आयुष्यातही हजरजबाबी होते. बोलताना त्यांना सहज विनोद सुचायचे. मला त्यांच्यातील आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांनी बहुतांश सिनेमे विनोदी ढंगातील करूनही त्यांचा विनोद प्रत्येक वेळी नवीनच वाटला,‌’ असंदेखील अशोक मामा म्हणाले.
शरद तळवलकर व दादा कोंडके हीदेखील एक मराठी चित्रपटाच्या पडद्यावर जमलेली जोडी.
ही जोडी जमली, दादा कोंडके निर्मित व अभिनित आणि गोविंद कुलकर्णी दिग्दर्शित “एकटा जीव सदाशिव” या चित्रपटापासून. या चित्रपटात शरद तळवलकर हे दादांच्या डॅडींच्या (खरंतर पित्याच्या) भूमिकेत होते. चित्रपटात दादा ग्रामीण नायक तर शरद तळवलकर शहरातील पिता. म्हणून दादा त्यांना आपलं सारखं डॅडी, डॅडी म्हणत. दोघेही कमालीचे हजरजबाबी. कधी कुठे कसे पंचेस घेतील आणि विनोद निर्मिती होईल हे काहीच सांगता न येणारे. पडद्यावर त्यांची जोडी छान जमली आणि चांगलेच हंसे वसूल केले. पिक्चर अर्थातच सुपरहिट झाला आणि आपल्या चित्रपटात जेव्हा जेव्हा शरद तळवलकर यांची आवश्यकता असेल तेव्हा तेच पाहिजेत असा दादा कोंडके यांचा आग्रह व हट्टदेखील. दादा कोंडके यांनी आता आपल्या दिग्दर्शनातील “ह्योच नवरा पाहिजे” या चित्रपटात शरद तळवळकर यांना एक भूमिका दिली.
त्यांनी कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओत एका दृश्याचे चित्रीकरणही केले आणि त्यानंतर दुसऱ्या चित्रीकरण सत्रात शरद तळवळकर यांच्यावर चित्रीकरण होते. शरद तळवलकर आपल्या नाटकाच्या दौऱ्यात रमले आणि अशातच याच दौऱ्यात त्यांचे आजारपण उदभवले. त्यात त्यांच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. एक प्रकारे शरद तळवळकर यांचा हा पुनर्जन्मच होता. दादांपुढे प्रश्न होता, आता करायचे काय? चित्रपटातून ही व्यक्तीरेखाच काढून टाकायची की अन्य कलाकाराला घेऊन मार्ग काढावा. दादांच्या हे अगदीच मनाविरुद्ध होते. त्यांनी कसेबसे चित्रीकरण केले. आणि मग ट्रायल पाहिल्यावर त्यांच्या मनात आले, शरद तळवळकर आजारातून पूर्ण बरे होईपर्यंत आपण थांबायचे. झालेले सगळे चित्रीकरण आपण रद्द करायचे. काही दिवसांनंतर शरद तळवळकर यांना घेऊन दादांनी पुन्हा काही दिवसांचे चित्रीकरण केले आणि मगच आपला हा चित्रपट प्रदर्शित केला. दादा कोंडके व शरद तळवलकर यांची जोडी जमली होती, त्यामुळेच तर हे घडले.
-दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक

Check Also

विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात विविध क्षेत्रांचा अनुभव घ्यावा -लोकनेते रामशेठ ठाकूर

उरण : रामप्रहर वृत्तकर्मवीर अण्णांनी दिलेला शिक्षण आणि संस्कारांचा आदर्श आपल्याला पुढे घेऊन जाणे अत्यंत …

Leave a Reply