कर्जत : बातमीदार
प्रायोगिक तत्त्वावर चाचणी करण्यासाठी मध्य रेल्वेने इंटरसिटी एक्स्प्रेसला पुश-पुल इंजिन लावून या गाडीचा कर्जत येथील तांत्रिक थांबा रद्द केला आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यासह पेण, पनवेल, खालापुर तसेच डोंबिवली ते नेरळ, भिवपुरी रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे इंटरसिटी एक्स्प्रेसला कर्जत स्थानकात थांबा मिळविण्यासाठी कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन प्रयत्न करत आहे.
इंटरसिटी एक्स्प्रेसला कर्जत रेल्वे स्थानकात थांबा द्यावा, या मागणीचे निवेदन रेल्वे मंत्री पियुष गोयल, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक आणि मुंबई विभागीय महाव्यवस्थापक यांना पाठविल्यानंतर असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन, त्यांना कर्जत रेल्वे स्थानकात इंटरसिटी एक्स्प्रेसला अधिकृत थांबा मिळावा, याबाबत निवेदन दिले. त्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांची त्यांच्या पनवेल येथील कार्यालयात भेट घेऊन, इंटरसिटी एक्स्प्रेसला कर्जत रेल्वे स्थानकात थांबा आवश्यक असल्याबाबत चर्चा केली. यावेळी खासदार बारणे यांनी इंटरसिटी एक्स्प्रेसला कर्जत स्थानकात थांबा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी असोसिएशनचे कार्याध्यक्ष सुरेश खानविलकर, सदस्या कल्पना दास्ताने, शर्वरी कांबळे आणि इतर सदस्य उपस्थित होते.