ग्रामपंचायतीने पाणीप्रश्न लावला मार्गी
![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2019/06/Pali-1024x541.jpg)
![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2019/06/Pali1-768x1024.jpg)
![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2019/06/Pali2-1024x899.jpg)
पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर गावात ब्रिटिशकालीन छोटे धरण आहे. गळती लागल्याने या धरणाची दुरूस्ती करणे गरजेचे होते. सिद्धेश्वर ग्रामपंचायतीने 14व्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर करून या धरणाची नुकतीच दुरुस्ती केली आहे. त्यामुळे धरणाच्या जलसाठ्यात वाढ होऊन ग्रामस्थांसह मुक्या जनावरांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.
ब्रिटिशकालीन सिद्धेश्वर धरणाच्या पत्र्याच्या दरवाजांतून गळती होऊन पाणी वाया जात होते. धरणाचा दरवाजा सडला होता. दगडी भिंतींचीदेखील दुरवस्था झाली होती. त्यामुळे धरणात पाणी साठत नव्हते. अनेकदा वेगवेगळ्या उपाय योजना करूनही त्याचा फारसा उपयोग होत नव्हता. सिद्धेश्वर ग्रामपंचायतीने या धरणाच्या दुरुस्तीचा निर्णय घेतला. आणि 14व्या वित्त आयोगाच्या निधीतून धरणाला नवीन दरवाजे बसवून त्याखाली सिमेंटचे पाईप लावण्यात आले. धरणाच्या मूळ दगडी बांधकामाला धक्का न लावता तुटलेल्या ठिकाणी योग्य प्रकारे दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता या धरणाची गळती थांबून मुबलक पाणी साठणार आहे व परिसरातील पाण्याचा प्रश्नदेखील मार्गी लागणार आहे.