पनवेल : वार्ताहर
पनवेल परिसरात विनयभंगाच्या दोन घटना घडल्याने महिला वर्गामध्ये भीतीयुक्त वातावरण आहे.
तालुक्यातील डेरवली गावामध्ये एका इसमाने दारूच्या नशेत व पैशासाठी आपल्याच मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी सदर इसमाला अटक केली आहे. व त्याच्यावर विनयभंगासह पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई केली आहे, तर दुसर्या घटनेत खारघर येथे प्यारसिंग गेमती हा से. 19 मधील आरती डेअरीमध्ये काम करतो व तो घरोघरी दूध टाकण्याचे काम करत असे. घरात एकटी मुलगी किंवा महिला असल्याचा फायदा घेऊन तो अश्लील चाळे करून महिलांना त्रास देत होता. अशाच प्रकारे त्याने से. 19 मध्ये एका बिल्डिंगमधील घरासमोर उभे राहून अश्लील चाळे करण्यास सुरुवात केल्याने त्याच्याविरुद्ध खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताच पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
-ज्येष्ठ नागरिकाला फसवले
पनवेल : दोन अनोळखी इसमांनी पुढे नाकाबंदी सुरू असल्याचे सांगून एका ज्येष्ठ नागरिकाला हातोहात फसवून त्यांच्याकडील सोन्याची चेन लंपास केल्याची घटना कामोठे वसाहतीमध्ये घडली आहे.
गंगाराम पवार हे सकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले असताना ते जव्हार इंडस्ट्रीजच्या बाजूला न्यू इंग्लिश स्कूलकडे जाणार्या रस्त्याने एकटे पायी जात असताना दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले व त्यांनी पुढे नाकाबंदी आहे, असे सांगून गळ्यातील सोन्याची चेन काढून ठेवण्यास सांगितले. यावेळी पवार यांनी त्यांच्या गळ्यातील 20 हजार रुपये किमतीची चेन काढून त्यांच्याकडे दिली व ती चेन एका पुडीत बांधून सदर पुडी त्यांच्या खिशात त्या दोन इसमांनी टाकली व ते निघून गेले. काही वेळानंतर पवार यांनी सदर पुडी उघडून पाहिली असता त्यात त्यांना खडे दिसून आले. यावेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याबाबतची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात केली.
-दुचाकीची चोरी
पनवेल : गोडावूनमध्ये उभी करून ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना तळोजा परिसरात घडली आहे. रजत जैन यांनी त्यांची होंडा डीओ ही दुचाकी तळोजा येथील दुकानाच्या गोडावूनमध्ये उभी करून ठेवली असताना अज्ञात चोरट्यांनी सदर गाडी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याबाबतची तक्रार तळोजा पोेलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
-एक्स्प्रेसखाली आल्याने महिलेचा मृत्यू
पनवेल : पनवेल रेल्वे स्थानकातून नेत्रावती एक्स्प्रेस गाडी पकडण्याच्या प्रयत्नात असलेली प्रीती ज्ञानेश्वर चंद्रवंशी (35) ही महिला नेत्रावती एक्स्प्रेसखाली आल्याने तिचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली आहे. प्रीती चंद्रवंशी ही नेत्रावती एक्स्प्रेसने रोहा येथे जाण्यासाठी गाडी पकडताना हा अपघात झाला.
या घटनेतील मृत प्रीती चंद्रवंशी ही रोहा भागातील भाटे वाचनालयासमोरील अन्नपूर्णा अपार्टमेंटमध्ये कुटुंबासह राहण्यास होती. प्रीती चंद्रवंशी हिच्या पतीचे रोहा भागात दुकान असल्याने या दुकानासाठी लागणार्या सामानाच्या खरेदीसाठी ती मुंबईत आली होती. सामानाची खरेदी केल्यानंतर प्रीती लोकलने मुंबईतून पनवेल येथे आली. त्यानंतर ती सव्वाएक वाजण्याच्या सुमारास रोहा येथे जाण्यासाठी फलाट क्र. 7 वर गेली होती, मात्र फलाटावर उभी असलेली नेत्रावती एक्स्प्रेस सुटल्याने प्रीतीने हातातील सामानाच्या दोन पिशव्यांसह धावती गाडी पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तिला सदर गाडी पकडता न आल्याने ती थेट गाडीखाली गेली. त्यामुळे तिचा एक पाय कापला जाऊन ती गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर नेत्रावती गाडी थांबवून जखमी प्रीती चंद्रवंशी हिला बाहेर काढून तत्काळ पनवेल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र अति रक्तस्रावामुळे तिचा काही वेळातच मृत्यू झाला. पनवेल रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
-प्रवाशाचा मोबाईल खेचणार्या लुटारूला अटक
पनवेल : धावत्या लोकलमधील प्रवाशाच्या हातातील मोबाईल फोन खेचून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या लुटारूला रेल्वे स्थानकावर तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांनी पाठलाग करून पकडल्याची घटना जुईनगर रेल्वे स्थानकात घडली. फिरोज जाफर शेख (31) असे या लुटारूचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून लुटला गेलेला मोबाईल फोन जप्त केला आहे.
या घटेनेतील तक्रारदार कन्हैया लोहार हा ठाण्यातील मानपाडा भागात राहणारा तरुण खारघर येथून लोकलने ठाणे येथे जात होता. रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास सदर लोकल जुईनगर रेल्वेस्थानकात येऊन ठाण्याच्या दिशेने जाण्यासाठी निघाली असताना, लोकलमध्ये मोबाईल फोनवर बोलत उभ्या असलेल्या कन्हैयाच्या हातातील मोबाईल फोन लुटारू फिरोज जाफर शेख (31) याने खेचून पलायन केले. त्यामुळे कन्हैया याने चोर-चोर अशी आरडाओरड केली. त्यामुळे जुईनगर रेल्वे स्थानकात तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांनी आरोपी फिरोजचा पाठलाग करून त्याला पकडले. त्यानंतर त्याच्यावर वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली, तसेच त्याने लुटलेला मोबाईल फोन हस्तगत केला.