Breaking News

फसवणूक करून फरारी झालेल्या दाम्पत्याचा पोलिसांकडून शोध सुरू

पनवेल : वार्ताहर

पनवेलच्या नेरे भागात बंगले बांधून ते विकत देण्याच्या बहाण्याने एका दाम्पत्याने अनेकांकडून बंगलोच्या बुकिंगपोटी लाखो रुपयांची रक्कम उकळून त्यांना बंगलो बांधून न देता, तसेच त्यांची रक्कम परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रोहन आर्ते व अश्विनी आर्ते असे या दाम्पत्याचे नाव असून गुन्हे शाखेने या दाम्पत्याविरोधात फसवणूक, तसेच मोफा कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. या दाम्पत्याकडून फसवणूक झालेल्या काही ग्राहकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या असल्या, तरी या दाम्पत्याने शेकडो लोकांची फसवणूक केल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी रोहन रमेश आर्ते व अश्विनी आर्ते या दोघांनी 2015 मध्ये अश्विनी आर. कन्स्ट्रक्शन प्रा.लि. या कंपनीच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील नेरे भागात व्हिस्परिंग ऑर्चिड्स बंगलो प्रोजेक्ट विकसित करण्यात येत असल्याची जाहिरातबाजी केली होती. त्यामुळे काही ग्राहकांनी आर्ते दाम्पत्याकडे बंगलो बुकिंग केली, परंतु दीर्घकाळपर्यंत बंगलो मिळत नसल्याने आपल्या बुकिंगची रक्कम परत मागण्यास सुरुवात केली. त्यानंतर आर्ते दाम्पत्याने चेकद्वारे काही ग्राहकांना बुकिंगची रक्कम परत केली, मात्र सदरचे चेक बाऊन्स झाले. त्यानंतरही या दाम्पत्याने ग्राहकांना त्यांच्या बुकिंगची रक्कम परत देण्यास टाळाटाळ केली. आजपर्यंत त्यांनी बुकिंगची रक्कम परत न केल्याने काही ग्राहकांनी थेट पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्याकडे धाव घेतली होती. पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेला या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिल्यानंतर गुन्हे शाखेने पनवेल शहर पोलीस ठाण्यात आर्ते दाम्पत्यावर फसवणुकीसह मोफा कलमान्वये गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply