बर्मिंगहॅम : वृत्तसंस्था
विश्वचषक स्पर्धेत निर्णायक सामन्यामध्ये दमदार खेळ करीत यजमान इंग्लंडने भारतावर 31 धावांनी विजय मिळवला. भारताच्या पराभवामुळे पाकिस्तानच्या गोटात चिंतेच वातावरण पसरले आहे. उपांत्य फेरीत दाखल होण्यासाठी पाकला बांगलादेशविरुद्ध विजयासोबत इतर संघांच्या कामगिरीवरही अवलंबून रहावे लागणार आहे.
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 337 धावा फटकावल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने झुंज दिली, पण ती अपयशी ठरली, भारताचा संघ 306 धावांपर्यंतच मजल मारू शकला. यासोबतच भारताला पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले, तर इंग्लंडने आपले आव्हान कायम ठेवले आहे.
338 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. लोकेश राहुल एकही धाव न काढता माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्माने शतकी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. यारम्यान दोन्ही खेळाडूंनी आपली अर्धशतके साजरी केली. रोहित-विराटची जोडी भारताला विजय मिळवून देईल असे वाटत असतानाच लियाम प्लंकेटने विराटला बाद केले. त्याने 66 धावांची खेळी केली.
यानंतर रोहित शर्माने ऋषभ पंतच्या साथीने भारतीय संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रोहितने आपले शतकही पूर्ण केले, मात्र ख्रिस वोक्सने त्याला बाद केले. रोहित माघारी परतल्यानंतर ऋषभ पंत, हार्दिक पांड्या ठराविक अंतराने माघारी परतले. तोपर्यंत भारतासमोरचे आव्हान कठीण होऊन बसले होते. अखेरच्या फळीत धोनी-केदार जाधवने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न फोल ठरले. इंग्लंडकडून प्लंकेटने तीन आणि वोक्सने दोन बळी घेतले.
तत्पूर्वी, सलामीवीर जॉनी बेअरस्टोचे आक्रमक शतक आणि त्याला जेसन रॉय, बेन स्टोक्स आणि जो रुट यांनी दिलेली साथ या जोरावर यजमान इंग्लंडने 337 धावांपर्यंत मजल मारली होती. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या इंग्लंडने भारतीय गोलंदाजीचा पुरता समाचार घेतला. मैदानाच्या चौफेक फटकेबाजी करत इंग्लिश फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांच्या चांगलेच नाकीनऊ आणले. बेअरस्टोने 111, बेन स्टोक्सने 79, तर जेसन रॉयने 66 धावांची खेळी केली. भारताकडून मोहम्मद शमीने निम्मा संघ गारद केला. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी एक गडी बाद केला.
इंग्लंडने भारताचा पराभव केल्यामुळे त्यांचे 10 गुण झाले असून, इंग्लंड संघ एका गुणासह पाकिस्तानच्या पुढे निघून गेला आहे. इंग्लंड पुढचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. म्हणजेच 11 गुण असलेले न्यूझीलंड आणि भारत यांच्यासह पाकिस्तान किंवा बांगलादेश यांच्यातील एक संघ असे तीन संघ स्पर्धेत असणार आहेत. इंग्लंडचा भारताविरुद्ध पराभव झाला असता, तर इंग्लंडचे आठ गुण राहिले असते. इंग्लंड न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकला असता तरी, इंग्लंडचे 10 गुण झाले असते. पाकिस्तानने एका संघावर मात केल्यास त्याच्या खात्यात 11 गुण झाले असते. थोडक्यात भारताचा पराभव झाल्याने पाकसाठी ही लढाई
आणखी बिकट झाली आहे.