Breaking News

तीन मेट्रो मार्गांना मान्यता

मुंबई : प्रतिनिधी

कल्याण ते तळोजा या मेट्रो मार्गाच्या (मुंबई मेट्रो मार्ग 12) सविस्तर प्रकल्प अहवालास, तसेच या प्रकल्पाची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत अंमलबजावणी करण्यास मंगळवारी (दि. 23) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याशिवाय गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) या मुंबई मेट्रो मार्ग-10 आणि वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलाही (मुंबई मेट्रो मार्ग-11) मंजुरी देण्यात आली; तर पुणे शहरातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाच्या हिश्शाच्या व्यवहार्यता तफावत निधी (व्हीजीएफ ग्रँट) रोखीने देण्याऐवजी जमिनीचे हस्तांतरण करण्यास मंजुरी देण्यात आली.

या प्रकल्पात एमएमआरडीए व राज्य सरकार यांच्यासह सिडको आणि एमआयडीसी यांचाही सहभाग असणार आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या देत असतानाच हा प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प आणि महत्त्वपूर्ण नागरी वाहतूक प्रकल्प म्हणून घोषित करणे, त्यासोबत आवश्यकतेनुसार विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएला नियुक्त करणे या बाबींनाही मान्यता देण्यात आली आहे.

कल्याण-डोंबिवली या शहरांची वाढती लोकसंख्या आणि आजूबाजूला होणारा विकास, 27 गावांचा विकास आराखडा, कल्याण ग्रोथ सेंटर, नैना क्षेत्र, कल्याण-डोंबिवली ही शहरे नवी मुंबईला जोडण्याची गरज, त्यासाठी परिवहन सेवांची आवश्यकता या सगळ्या बाबी लक्षात घेऊन हा प्रकल्प आखण्यात आला आहे. या मार्गामुळे कल्याण, तळोजा, नवी मुंबई, नवी मुंबई विमानतळ या क्षेत्रातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. मेट्रो 5 ठाणे-भिवंडी-कल्याण, नवी मुंबई मेट्रो मार्ग आणि मेट्रो 12 कल्याण ते तळोजा यांचे एकात्मिकरण करण्याचेदेखील प्रस्तावित आहे. यामुळे प्रवाशांना सुलभ प्रवास करणे शक्य होणार आहे.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply