मुंबई : प्रतिनिधी
भारतीय महिलांनी पहिला एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर 66 धावांनी दमदार विजय मिळवला. भारताच्या या विजयाची शिल्पकार ठरली ती फिरकीपटू एकता बिश्त. एकताने या सामन्यात चार बळी मिळवत इंग्लंडचे कंबरडे मोडले. भारताने प्रथम फलंदाजी करताना 202 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाला 136 धावाच करता आल्या.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. भारताच्या जेमिमा रॉड्रिग्स आणि स्मृती मानधना यांनी दमदार 69 धावांची सलामी दिली. जेमिमाने 48 आणि स्मृतीने 24 धावा केल्या. यानंतर कर्णधार मिताली राजने 44 धावांची खेळी साकारली. झुलान गोस्वामीने 30 आणि तानिया भाटियाने 25 धावा केल्या आणि त्यामुळे भारताला दोनशे धावांचा पल्ला गाठता आला.
भारताच्या गोलंदाजांपुढे 202 धावांचे आव्हान टिकवणे कठीण होते, पण अशक्यप्राय नव्हते. भारताच्या गोलंदाजांनी अचूक मारा केला आणि त्यामुळेच इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. एकताने अचूक मारा करत 25 धावांत चार बळी मिळवले. या नेत्रदीपक कामगिरीमुळेच एकताला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.