पनवेल : रामप्रहर वृत्त
दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील प्रकल्पग्रस्त सर्वपक्षीय संघर्ष समिती पनवेल-उरणच्या कोअर कमिटीची बैठक शुक्रवारी (दि. 5) पनवेल येथील आगरी समाज सभागृहात संघर्ष समितीचे अध्यक्ष, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी शेतकरी, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष समितीचा विस्तार करण्याबाबत विचारविनिमय करून 105 जणांची विस्तारित कमिटी स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला.
पनवेल-उरण तालुक्यात सिडको व जेएनपीटीसह नैना, न्हावा-शिवडी सेतू, अलिबाग-विरार कॉरिडॉर, रेल्वे अशा विविध प्रकल्पांसंदर्भातील प्रश्न आहेत. यासंदर्भात शेतकर्यांचा लढा सुरू असून, त्याला दिशा देण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली 25 जणांची दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील प्रकल्पग्रस्त सर्वपक्षीय संघर्ष समिती पनवेल उरण कोअर कमिटी स्थापन करण्यात आली आहे. प्रकल्पग्रस्तांचे वाढते प्रश्न लक्षात घेता संघर्ष समितीचा विस्तार करण्याच्या अनुषंगाने 105 जणांची विस्तारित कमिटी नेमण्याचे या बैठकीत ठरले. यात सर्वपक्षीय मंडळी, विविध संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश केला जाणार आहे. येत्या आठ दिवसांत ही विस्तारित कमिटी नेमून सुरुवातीला सिडकोसंदर्भातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी व्यवस्थापनाबरोबर बैठक घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रेल्वे कॉरिडॉर भूसंपादनाच्या मुद्द्यावर पनवेलच्या प्रांत अधिकार्यांसोबत बैठक घेण्याचेही या वेळी ठरले.
या बैठकीस सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील, भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, कामगार नेते महेंद्र घरत, काँग्रेसचे सुदाम पाटील, राष्ट्रवादीचे सूरदास गोवारी, मनसेचे केसरीनाथ पाटील, निमंत्रक अतुल पाटील, भूषण पाटील, दिनेश पाटील, सुधाकर पाटील, सुरेश पाटील, जे. डी. तांडेल, रविशेठ पाटील, नंदराज मुंगाजी, अनिल नाईक, प्रभाकर जोशी, प्रल्हाद केणी, संतोष पवार आदी उपस्थित होते.