पनवेल : प्रतिनिधी
नवीन पनवेलमधील धोकादायक पद्धतीने घरावर टांगलेल्या वीज केबलमुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने त्या भूमिगत करण्याची मागणी नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी महावितरणच्या पनवेल येथील मुख्य अभियंत्यांकडे केली आहे.
नवीन पनवेलमधील सेक्टर 12, 13, 14 आणि 18 मध्ये महावितरणच्या अनेक वीज वाहक केबल उघड्या आहेत किंवा त्या घरावर धोकादायक पद्धतीने टांगलेल्या आहेत. यामधील अनेक केबल घराच्या पत्र्यावर वार्याने घासल्या जाऊन कापल्या गेल्याने पावसाळ्यात त्यातील वीजप्रवाह घराच्या पत्र्यात किंवा इतर वस्तूत उतरून अपघात होऊन तेथील नागरिकांच्या जीविताला धोका होऊ शकतो. यासाठी महावितरणने त्या केबल भूमिगत कराव्यात, असे पत्र नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी अभियंत्यांची भेट घेऊन त्यांना दिले. महावितरणचे मुख्य अभियंता जयदीप नानवटे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी केबल हटवण्यास सुरुवात करण्याची आणि ज्या केबल कट झाल्या असतील त्या बदलण्याच्या कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले. पाऊस कमी झाल्यावर या केबल भूमिगत करण्याचे काम करण्याचे आश्वासन या वेळी त्यांनी नगरसेविका वृषाली वाघमारे आणि जितेंद्र वाघमारे यांना दिले.