Breaking News

नवी मुंबईत कोविड सेंटरमध्ये ग्रंथालय

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

कोरोना बाधितांचा कोविड सेंटरमधील कालावधी तणावरहित जावा आणि त्यांना सकारात्मक जीवनाची अधिक ऊर्जा मिळावी यासाठी सिडको एक्झिबिशन कोविड सेंटरमध्ये विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करून देण्यात आलीत. त्यासाठी पुस्तकांचे अनोखे विश्व खुले करून देण्यात आले आहे. अशाप्रकारे कोविड सेंटरमधील कोरोना बाधितांना पुस्तकांच्या स्वरुपात मानसिक बळ देणारा ’कोविड सेंटरमध्ये ग्रंथालय’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे.

नवी मुंबई महानगरपालिका आणि लेट्स रीड फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ’कोविड सेंटरमध्ये ग्रंथालय’ हा आगळावेगळा उपक्रम सुरू करण्यात आलाय. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पाहणीदेखील केली. या वेळी त्यांच्या समवेत उपआयुक्त योगेश कडुस्कर, सेंटरचे नोडल अधिकारी निलेश नलावडे, सेंटरचे नियंत्रक डॉ. वसंत माने व डॉ. लोहार तसेच या अभिनव उपक्रमाची संकल्पना राबविणारे लेट्स रीड फाऊंडेशनचे वानखेडे उपस्थित होते.

याच विचारांतून ’लेट्स रीड फाऊंडेशन’ या समर्पित भावनेने व्यापक वाचक चळवळ राबविणार्‍या संस्थेच्या संकल्पनेतून नवी मुंबई महानगरपालिकेच्या सिडको एक्झिबिशन कोविड सेंटरमध्ये हा अतिशय वेगळ्या स्वरूपाचा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. याठिकाणी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील उत्तम ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पुस्तकांच्या निवडीवर खूप मेहनत घेण्यात आली आहे. हलकीफुलकी मनोरंजक पुस्तके तसेच प्रेरणा देणारी चरित्रे, सकारात्मक विचार देणारे ग्रंथ अशा विविध आशयाची व नामवंत लेखकांची पुस्तके याठिकाणी आहेत.

कोविड सेंटरमध्ये दाखल असण्याच्या कालावधीत लागलेली पुस्तक वाचनाची आवड काहीजण घरी गेल्यानंतरही आवडीने जोपासतील व त्यातून एक व्यापक वाचक चळवळ उभी राहील असा विश्वास आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला. तसेच ही अभिनव संकल्पना राबविण्यासाठी पुढाकार घेणार्‍या लेट्स रीड फाऊंडेशनच्या वाचनसंस्कृती वाढीसाठी ते करीत असलेल्या कामाची प्रशंसा करीत शुभेच्छा दिल्या. सिडको एक्झिबिशन कोविड सेंटर प्रमाणेच महानगरपालिकेच्या इतरही कोविड सेंटरमध्येही असा उपक्रम आगमी काळात सुरू केला जाईल असे आयुक्तांनी सांगितले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply