नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

पाली-बेणसे ः प्रतिनिधी
सुधागडसह संपूर्ण रायगड जिल्ह्याला सलग चार दिवस पावसाने चांगलेच झोडपले. परिणामी मुसळधार पर्जन्यवृष्टीने जनजीवन विस्कळीत केले आहे. अशातच मंगळवारी (दि. 23) रात्रीपासून पावसाचा जोर कायम राहिल्याने सकाळी पाली, जांभूळपाड्यासह सुधागडात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे दिसून आले.
सलग कोसळणार्या पावसामुळे 1989च्या प्रलयकारी महापुराच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. पाली-खोपोली राष्ट्रीय महामार्गावरील पाली व जांभूळपाडा तसेच तामसोली आंबा नदीच्या पाण्याच्या प्रवाहाने वेग धरला आहे. अशातच नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला. वाकण-पाली मार्गावरील आंबा नदीवरील पूल मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडतो.
तसेच दक्षिण कोकणातून पुणे व मुंबईला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने जाणारे प्रवासी व वाहने याच मार्गावरून जातात. परिणामी येथील आंबा नदी पुलावरून पाणी गेल्यास प्रवासी व वाहने दोन्ही बाजूस अडकून राहतात. दरवर्षी जूनअखेर व जुलै महिन्यात अशा प्रकारे पुलावरून पाणी गेल्यानंतर वाहतूक ठप्प होते. या वेळीदेखील मुसळधार पावसामुळे पाली आंबा नदीवरून पाणी जात असल्याने पूल बंद ठेवण्यात आला होता. बुधवारी पाण्याचा प्रवाह वाढल्याने पुन्हा एकदा आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सखल व खोलगट भागात पाणी शिरले आहे, तर नद्या, नाले, दुथडी भरून वाहत आहेत. येथील गावांना जोडणार्या पुलांवरून पाणी वाहत असल्याने वाहतुकीस अडसर निर्माण झाल्याचे दिसून आले. शेतीच्या कामांनादेखील खीळ बसली आहे.