
कर्जत ः बातमीदार
कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रापंचायत हद्दीत अनेक ठिकाणी कचर्याचे ढीग दिसून येत आहेत. घंटागाडी नियमित येत नसल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याने स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक वेळा ग्रामपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणूनदेखील याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून डासांमुळे स्थानिक हैराण झाले आहेत.
उमरोली ग्रामपंचायत हद्दीत डिकसळ, उमरोली, गारपोली, कोषाणे, आषाणे, वावे, आषाणेवाडी, कोषाणेवाडी, पाली वसाहत, पोतदार संकुल, डायमंड, तुलसी अशी अनेक गावे, वाड्या, मोठी गुहसंकुल यांचा समावेश आहे. या परिसरात उघडी गटारे, सांडपाणी रस्त्यावर येत आहे. डायमंड वसाहतीचा कचरा बाजूलाच टाकला जात आहे. तो कचरा ग्रामपंचायत उचलत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
फवारणी मशीनसंदर्भात आमच्या मीटिंगमध्ये चर्चा झाली असून फवारणीचे काम दिले गेले आहे, परंतु पाऊस असल्याने फवारणी करता येत नाही, तसेच घंटागाडी सुरू आहे. सर्वच ठिकाणी कचरा उचलला जातो. ज्या ठिकाणी जात नसेल तिथलाही कचरा उचलला जाईल.
-विनोद चांदोरकर, ग्रामविकास अधिकारी, उमरोली