पेण : प्रतिनिधी
शहरातील चारही तलावांमध्ये मच्छीमारी करण्याचा अधिकार पेण नगर परिषदेने कोळी समाज बांधवांना दिला आहे. त्यामुळे येथील कोळी समाजामध्ये गैरसमज पसरवून तेढ निर्माण करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, असे आवाहन न. प.चे गटनेते अनिरुद्ध पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले.
पेण शहरातील कुंभार तळे, कासार तळे, मोतिराम तळे व कवंडाळ तळे या चारही तळ्यांत मच्छीमारीसाठी कोळी समाज बांधवांना परवानगी देण्यात आल्याचे अनिरुद्ध पाटील यांनी पेण न. प. सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
पर्यावरणाचे नियम लक्षात घेऊन पेण नगर परिषदेने चारही तलावांत मच्छीमारी करण्यास परवानगी दिली. आम्हाला वेळोवेळी सहकार्य केले.आवश्यक गोष्टी पुरवण्याचा प्रयत्न केला, मात्र विरोधकांनी कोळी समाजात वितुष्ट आणण्याचा प्रकार केला आहे. त्याला आळा घालण्यासाठी नगर परिषदेने अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी. कोळी बांधवांसाठी नगर परिषदेतील सत्ताधारी नेहमीच प्रयत्नशील असतात, मात्र त्यामध्ये कोणी खो घालण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही त्याला कायदेशीर उत्तर देऊ, असा इशारा पेण मच्छीमारी सहकारी संस्थेचे संचालक व माजी अध्यक्ष विजय आवास्कर यांनी या वेळी दिला.
पेण मच्छीमारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष जनार्दन भोईर, उपाध्यक्ष नरेश कोळी, सचिव विजय पाटील, संतोष थळे, गणेश वास्कर, वसंत कोळी, अनंत कोळी आदी या वेळी उपस्थित होते.
– पेण नगरपरिषद व कोळी बांधवांचे चांगले संबंध असताना त्यात वितुष्ट आणण्याचा वा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी केला, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– अनिरुद्ध पाटील, गटनेते,
पेण नगर परिषद