पनवेल महापालिकेच्या वतीने आयोजन

पनवेल ः प्रतिनिधी
महापालिका क्षेत्रातील महिलांच्या गर्भाशयाच्या कॅन्सरचे रोग निदान शिबिर दि. 1 आणि 2 ऑगस्ट रोजी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात येणार असल्याची माहिती महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
महिला व बाल कल्याण समिती व वैद्यकीय आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्व महिलांसाठी गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे रोग निदान शिबिर सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात येणार आहे. याची माहिती देण्यासाठी महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी मंगळवारी (दि. 30) सकाळी 11.30 वाजता महापालिकेत पत्रकार परिषद घेतली होती. या वेळी महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष लीना गरड आणि सहाय्यक आयुक्त तेजस्विनी गलांडे उपस्थित होत्या. या वेळी त्यांनी 15 जुलै रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या व तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत 150 ते 200 महिलांची जनजागृती करण्यात आल्याची माहिती देऊन एचपीव्ही टेस्टसाठी खाजगी रुग्णालयात दोन ते तीन हजार खर्च येतो. ती या शिबिरात मोफत करण्यात येणार आहे. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र -1 जुने पनवेल, खारघर, कळंबोली आणि कामोठे येथे तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार आहे. त्याचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा, असे आवाहन या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी केले आहे. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1, भगतआळी, महाराष्ट्र व्यायामशाळेसमोर, गावदेवी पाडा, जुने पनवेल येथे डॉ. रेहाना मुजावर या तपासणी करतील. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र खारघर, समाज मंदिर, कम्युनिटी सेंटर, सेक्टर 12, पेट्रोल पंपाजवळ, खारघर येथे डॉ. ऐगल तपासणी करतील. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कळंबोली, समाज मंदिर बिल्डिंग, सिडको, सेक्टर 5 इ, कळंबोली येथे डॉ. वृषाली नलावडे या तपासणी करतील, तर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कामोठे, सेक्टर 8, प्लॉट नं. 32, एम.एन.आर. स्कूलच्या मागे कामोठे येथे डॉ. प्रशाली पाटील या तपासणी करतील.
RamPrahar – The Panvel Daily Paper