पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निष्कलंक, बार्गेनिंग न करणारा, सगळ्यांशी जुळवून घेणारा भाजपला मिळालेला कोहिनूर हिरा म्हणजे आमदार प्रशांत ठाकूर, अशा शब्दांत त्यांना 45व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस श्रीनंदन पटवर्धन यांनी उद्गार काढले. ‘रामप्रहर’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते भरभरून बोलले.
श्री. पटवर्धन पुढे म्हणाले की, कै. रामभाऊ म्हाळगी नेहमी म्हणत असत संघाच्या कार्यकर्त्याच्या डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि पायाला भिंगरी असली पाहिजे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या बाबतीत ते खरे ठरले आहे. त्यांच्या वागण्यात हे नेहमी आपल्याला पाहायला मिळते. आपले जीवन त्यांनी पनवेलकरांसाठी समर्पित केले आहे. प्रशांत ठाकूर म्हणजे उत्तुंग, शिस्तबद्ध आणि प्रोटोकॉल पाळणारे, कोणत्याही विषयाचा अभ्यास करून पाठपुरावा करणारे व्यक्तिमत्त्व. त्यामुळेच या वेळी आम्ही विधानसभा निवडणुकीत अब की बार एक लाख पार हे मताधिक्याचे उद्दिष्ट ठरवले आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांचे वडील माजी खासदार रामशेठ ठाकूर हे माझे शिक्षक असल्याने आजही मी त्यांना सर म्हणतो. त्यांचे पुत्र आमदार प्रशांत ठाकूर मनमिळावू स्वभावाचे, विरोधासाठी विरोध अशी राजकीय विरोधकाची भूमिका न ठेवता वैचारिक विरोध करणारे आहेत, जो गरजेचा आहे. रायगड जिल्ह्यात ते पक्ष संघटनेचे काम
निःस्वार्थी आणि निष्कलंक पद्धतीने करीत आहेत. सगळ्यांना सोबत घेऊन ते काम करतात. कोणताही निर्णय एकतर्फी घेत नाहीत. मी देविदास नायक यांच्याकडून काम कसे करायचे शिकलो. आमदार प्रशांत ठाकूर यांच्याबरोबर
काम करण्याची मला संधी मिळाली आणि अदबशीर बोलणारा लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उदाहरण पाहावयास मिळाले.
दुसर्या पक्षातून येऊन संघ स्वयंसेवकाला लाजवेल असे काम करणारा नेता अशी आमदार प्रशांत ठाकूर यांची ओळख निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळेच त्यांना सिडकोचे अध्यक्षपद देण्यात आले. त्याबाबतचा भाजपच्या एका आमदाराने मला एक किस्सा सांगितला. त्यांनी सांगितले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दुसर्या एका नेत्याला सिडकोचे अध्यक्ष करावयाचे होते, पण मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच फाईलवर सही केली होती. त्याबाबत त्यांना एका पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने विचारले तेव्हा त्यांनी सांगितले मला सिडकोचे प्रोजेक्ट पूर्ण करावयाचे आहेत. त्यासाठी मला विश्वासू माणूस हवा होता. मी उद्धव ठाकरेंना सांगितले माझ्या खात्याचे काम असल्याने मी प्रशांत ठाकूर यांची निवड केली.
गोव्याला राष्ट्रीय कार्यकारिणीत नरेंद्र मोदींची घोषणा झाली आणि वातावरण बदलले. रायगड जिल्ह्यात त्यापूर्वी भाजपचे अध्यक्षपद बाळासाहेब पाटील, विश्वास भिडे, डॉ. प्रभाकर पटवर्धन आणि संजय कोनकर यांनी सांभाळले होते. त्या वेळी आम्हाला मर्यादा होत्या; कारण आम्ही विरोधक होतो. उरणमध्ये महेश बालदी यांनी तेथील राजकीय आणि जातीय राजकारण विरोधात असताना भाजपचे नगरसेवक निवडून आणले. नगराध्यक्ष निवडून आणला. आज प्रशांत ठाकूर यांच्यामुळे आमचा आमदार निवडून आला. पनवेल महापालिकेत आमची सत्ता आहे. जिल्ह्यात नगर परिषद आणि ग्रामपंचायतीमध्ये आम्हाला सत्ता मिळाली आहे. त्यांच्यामुळे आज पनवेलमध्ये कमळ फुलले, याचा आम्हाला आनंद आहे
आमच्यापेक्षा जास्त शिस्त पाळणारे, संघाच्या बैठकांना आणि गुरुपौर्णिमा उत्सवाला हजर राहणारे प्रशांत ठाकूर यांना ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारींचे आशीर्वाद मिळाले आहेत. त्यांना 2019च्या निवडणुकीनंतर मंत्रिपद मिळावे यासाठी आम्ही पक्षातील वरिष्ठांशी बोलण्यास तयार आहोत. आपल्या वयाच्या 45व्या वर्षी सगळे मौजमजा करतात. अशा वेळी पनवेलकरांसाठी आपले जीवन समर्पित करणार्या प्रशांत ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
-श्रीनंद पटवर्धन, सरचिटणीस,रायगड जिल्हा भाजप