शहरीकरणातून प्रचंड बोकाळलेल्या काँक्रिटीकरणातून झाडांची मुळे कमकुवत होत चालल्याचे सर्वज्ञात आहे. अशावेळेस पाहणी करताना संभाव्य धोका लक्षात घेऊन अधिक बारकाईने पाहणी व्हायला नको का? यासंदर्भातील स्वतंत्र घटनांतील जीवितहानीची आकडेवारी एक वा दोन बळी अशी असल्याने या स्वरुपाच्या घटनांकडे दुर्लक्ष व्हायला नको. मुंबईतील सुयोग्य धोरणाचा लाभ अन्य छोट्या शहरांतही होऊ शकेल.
पावसाळ्यात झाडे कोसळून सर्वसामान्यांचा बळी जाण्याचा मुद्दा रविवारच्या घटनेने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबईतील मुलुंड येथील रस्त्यावर रविवारी मध्यरात्री झाड कोसळून रिक्षाचालक आणि प्रवासी गंभीर जखमी झाले. संबंधित रिक्षाचालकाला इस्पितळात मृत घोषित करण्यात आले तर प्रवासी अद्यापही इस्पितळात अपचार घेत आहे. झाड कोसळण्याच्या घटनेत एखाद्याचा बळी जाण्याची मुंबईतली ही वर्षभरातली सहावी घटना आहे. यापैकी चार घटना पावसाळा सुरू झाल्यानंतरच्या आहेत. मे महिन्यात झाड कोसळण्याच्या निरनिराळ्या घटनांमध्ये दोघांचा बळी गेला आहे तर जूनमध्ये तीन जणांचा. अशाच तर्हेची झाड कोसळण्याची घटना गुजरातच्या अहमदाबाद शहरातही रविवारी सकाळी घडल्याचे वृत्त असून या घटनेतही रिक्षाचालकाचा डोक्याला जबर दुखापत झाल्याने मृत्यू झाला आहे. अन्य राज्यांतही झाडे कोसळण्याच्या घटनांची नोंद झाली आहे. मुलुंडच्या घटनेत, झाडाची मुळे कुजल्याने कमकुवत झाली होती व त्यामुळे हे झाड कोसळल्याचे पालिकेच्या चौकशी अहवालात म्हटले आहे. खरे तर चौकशीतील या माहितीत नवीन काहीच नाही. सर्वसाधारणपणे घटना घडून गेल्यानंतर हेच तपशील जाहीर होतात. पालिकेकडील माहितीनुसार 2013 ते 2019 या काळात मुंबई शहर व उपनगरांत झाडे वा फांद्या कोसळण्याच्या सुमारे 24 हजारांहून अधिक घटनांची नोंद झाली आहे. या दुर्घटनांमध्ये सुमारे 34 जणांचा बळी गेला असून 270 जखमींची नोंद आहे. या दुर्घटनांची सातत्याने चर्चा होत असल्याने एखादे धोकादायक झाड दिसल्यास नागरिक तातडीने संपर्क साधून पालिकेकडे झाडाच्या फांद्या छाटण्याची विनंती करत असतात. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पालिकेकडून झाडांचे सर्वेक्षणही केले जाते. यावर्षीच्या पाहणीत रस्त्यांच्या कडेला असलेल्या 1 लाख 81 हजार 840 झाडांचे सर्वेक्षण पालिकेकडून केले गेले. त्यापैकी 99 हजार 552 झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली तर सुमारे 492 झाडे धोकादायक ठरवली गेल्याने पाडण्यात आली. पालिकेच्या कारवाईसंदर्भात खाजगी सोसायट्या वा जमिनींवरील झाडांबाबत अनेक दिवस विचित्र पेच सुरू आहे. खाजगी जमिनीवरील झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी वा झाड कापण्यासाठी पालिका मोठी रक्कम आकारत असल्यामुळे फारच कमी प्रमाणात संबंधित मालक वा सोसायट्या याकरिता पुढे येतात. यात शहरातील झाडांचे प्रमाण जर पाहिले तर एकूण 29 लाख झाडांपैकी 54 टक्के झाडे म्हणजे 15.63 लाख झाडे ही खाजगी जमिनीवर आहेत. एकंदरच या झाडांच्या निगराणी व पाहणीबाबत अधिक वैज्ञानिक दृष्टिकोनातून व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली धोरण आखले जाण्याची गरज आहे. एखादे झाड कोसळून त्यात कुणाचा तरी बळी गेल्यानंतर उजेडात येणारी झाडाची मुळे कुजल्याची माहिती जर संबंधित यंत्रणेच्या हाती आधीच लागली तर सुयोग्य कारवाई करून जीवित वा मालमत्तेची हानी टाळता येऊ शकेल.
RamPrahar – The Panvel Daily Paper