पनवेल : रामप्रहर वृत्त
वायू प्रदूषण आणि धूळकणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पनवेल महापालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून अत्याधुनिक फॉग कॅनन वाहनांचे महापौर नितीन पाटील, स्थायी समिती सदस्य नगरसेवक परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी उद्घाटन करण्यात आले.
पनवेल महापालिका मुख्यालय येथील छत्रपती संभाजी महाराज मैदानात झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृह नेते ॲड. प्रकाश बिनेदार, नगरसेवक विकास घरत, अजय बहिरा, अमर पाटील, सुमित झुंजारराव, दशरथ म्हात्रे, नगरसेविका सरस्वती काथारा, उपायुक्त स्वरूप खारगे, पर्यावरण विभागप्रमुख मनोज चव्हाण उपस्थित होते.
महापालिकेने याआधी चार फॉग कॅनन वाहने नागरिकांच्या सेवेत दाखल केली आहेत. आता आणखी चार वाहने या मालिकेत सहभागी केली आहेत. यामुळे महापालिका कार्यक्षेत्रातील वायू प्रदूषण आणि धूळकणांवर नियंत्रण मिळवणे सोपे जाणार आहे. ही वाहने उच्च दाबाने सूक्ष्म पाण्याची फवारणी करून हवेत तरंगणारे धूळकण आणि प्रदूषणकारी घटक कमी करण्याचे कार्य करणार आहेत. वाढते शहरीकरण, बांधकामे आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता ही यंत्रणा प्रभावी ठरणार आहे.
या वाहनांमध्ये आधुनिक आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. विशेषतः खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल, खांदा कॉलनी, पनवेल परिसरातील मुख्य रस्ते व बांधकाम क्षेत्रांमध्ये या वाहनांचा वापर होईल.
या उपक्रमामुळे हवेतील सूक्ष्म धूळकणांचे प्रमाण कमी होऊन अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि निरोगी वातावरण उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास आयुक्त मंगेश चितळे यांनी व्यक्त केला आहे. शहराच्या पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने हा उपक्रम एक महत्त्वाचा टप्पा आहे.
Check Also
रक्तसाठा अद्ययावत माहितीच्या मुद्द्यावर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष
रक्तसाठ्याची माहिती वेळेवर अद्ययावत न करणाऱ्या रक्तकेंद्रांवर दंडात्मक कारवाई -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई : रामप्रहर …
RamPrahar – The Panvel Daily Paper