रसायनी : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील आपट्याजवळील घेरावाडीला अखेर वीज जोडणी मिळाल्याने येथील अंधार कायमचा दूर झाला आहे. या ऐतिहासिक कामाचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (दि.१९) कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात झाला. आदिवासी बंधू-भगिनींच्या घरात पहिल्यांदाच विजेचा प्रकाश पोहचल्याने संपूर्ण घेरावाडीत दिवाळीसारखे वातावरण पहायला मिळाले.
आमदार महेश बालदी यांच्या जिल्हा वार्षिक नियोजन निधी अंतर्गत या महत्त्वपूर्ण कामाचे नियोजन करण्यात आले होते, जे प्रयत्न व पाठपुराव्यामुळे यशस्वी झाले. कार्यक्रमास रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर, गटविकास अधिकारी समीर वाठारकर, जिल्हा परिषद सदस्य आत्माराम भस्मा, पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील, मयूर शेलार तसेच अतुल घरत, सदाशिव वास्कर, एम.के. गडगे, विद्याधर जोशी, रत्नाकर घरत, ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर भोईर, उपसरपंच असद पिट्टू, एमएसीबीचे श्री. देशमुख, ग्रामपंचायत सदस्य मारुती चव्हाण, दामू माडे, दर्शन भोईर, सुहास कदम, राजू देशमुख, महेंद्र टेंबे, धोंडू चव्हाण, शिवदास भोईर, परेश भोईर, दामू माडे, गणपत पिरकड, धर्मी वाघ, राम पारधी, मंगल्या माडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी आमदार महेश बालदी म्हणाले की, समाजातील शेवटच्या माणसाला त्याच्या उत्थानासाठी जो मदत करेल, तोच खरा सहकारी हा विचार मानणारे आपण सर्व आहोत. आज घेरावाडीत वीज आल्यामुळे निश्चितच एक वेगळा आनंद आहे, कारण दुर्गम भागात वीज नसल्याने नागरिकांचे काय हाल होतात याची आपल्याला जाणीव आहे. येत्या काळात तुमच्या इतर समस्या सोडवण्यासाठीही मी सरकार दरबारी पूर्ण प्रयत्न करेन, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. दरम्यान, स्वातंत्र्यानंतर प्रथमच विद्युत सुविधा आणल्याबद्दल घेरावाडीतील समस्त ग्रामस्थांनी आमदार महेश बालदी यांचे आभार मानले.
Check Also
यशाचा सोहळा; सामना, बनवाबनवी, माहेरची साडी… आणि ‘देऊळ बंद २’चा
यश हे सर्वाधिक ताकदवान टॉनिक… चित्रपटाच्या जगात यशाचे नाणं कायमच चालणारं. सर्वांनाच हवेहवेसे वाटणारे. जपून …
RamPrahar – The Panvel Daily Paper