Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे समाजकारण नव्या पिढीसाठी आदर्शवत

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडून शुभेच्छा

पनवेल ः रामप्रहर वृत्त
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आणि त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘रामपर्व’ या चरित्रग्रंथाच्या प्रकाशनाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. या संदर्भात त्यांनी एक विशेष शुभेच्छापत्र पाठवून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाचा गौरव करून उत्तम आरोग्य, निरामय आणि उदंड आयुष्य लाभो, अशा शब्दांत त्यांचे अभीष्टचिंतन केले आहे.
शुभेच्छा संदेशात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे की, अत्यंत सामान्य आणि मर्यादित साधनसंपत्ती असलेल्या कुटुंबात जन्म घेऊन केवळ अथक परिश्रम, जिद्द, प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टीच्या बळावर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी समाजकारण, राजकारण, शिक्षण, उद्योग-व्यवसाय आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा त्यांचा ध्यास, समाजकारणातील निष्ठा, शिक्षण क्षेत्रातील योगदान आणि जनकल्याणासाठी केलेले अविरत प्रयत्न हे सर्व गुणधर्म ‘रामपर्व’ या ग्रंथाच्या प्रत्येक पानातून त्यांचे प्रेरणादायी गुण समोर येत असून हा ग्रंथ तरुण पिढीसाठी नेतृत्व, सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीचे जिवंत उदाहरण म्हणून मार्गदर्शक ठरेल.
पुढे ना. गोयल यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवनप्रवासाचे आणि सामाजिक कार्याचे कौतुक केले. त्यांनी शुभेच्छापत्रात नमूद केले की, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दोन वेळा संसदेत जनतेचे प्रतिनिधित्व करताना शेतकरी, श्रमिक आणि स्थानिकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडली व अनेक प्रश्नांचे पालकत्व घेऊन ते मार्गी लावले. राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नसून “माणसं जोडण्याची कला” आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. कोरोनाच्या कठीण काळात हातावर पोट असलेल्या असंख्य कुटुंबांसाठी त्यांनी केलेले कार्य आणि आपल्या उत्पन्नातील मोठा हिस्सा समाजकार्यासाठी अर्पण करणारा त्यांचा दानशूर स्वभाव नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आदर्श आहे. सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, साहित्य, कला, संस्कृती आणि आरोग्य या सर्व क्षेत्रांत त्यांनी केलेले कार्य म्हणजे समाजासाठी दीपस्तंभ आहे.
रयत शिक्षण संस्थेशी आणि कर्मवीरांच्या विचारांशी जोडलेली त्यांची नाळ, आदिवासी व मागास भागातील विद्यार्थ्यांसाठी उभारलेली शैक्षणिक पायाभूत सुविधा, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससारखी क्रीडासंरचना तसेच साहित्य-कला क्षेत्राला भक्कम आधार देणारे त्यांच्या विविध उपक्रमांचे जाळे हे सर्व त्यांच्या व्यापक सामाजिक दृष्टीचे द्योतक आहे. समाजोपयोगी उपक्रमांतून त्यांची व्यापक सामाजिक दृष्टी दिसून येते, असेही त्यांनी अधोरेखित केले.
याचबरोबर ना. गोयल यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली आहे तसेच ‘रामपर्व’ हा ग्रंथ केवळ वाचनाचा आनंद देणारा चरित्रग्रंथ न राहता नेतृत्व, प्रामाणिकपणा, सेवाभाव, पक्षनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी यांचे जिवंत उदाहरण म्हणून तरुण पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करून या ग्रंथाच्या निर्मितीत योगदान देणारे लेखक, संपादक, संशोधक आणि प्रकाशक यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.

Check Also

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वहाळ येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

आयडियल सेंटर डिजिटल लॅबचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये सोमवारी (दि.१५) …

Leave a Reply