Breaking News

कोंढाणे धरण आरक्षित करावे

पनवेल मनपाच्या महासभेत सर्वपक्षीय मंजुरी

पनवेल : प्रतिनिधी

कोंढाणे धरण पनवेल महानगरपालिकेकडे आरक्षित करण्याच्या मागणीला गुरुवारी (दि. 5) झालेल्या मनपाच्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी आवश्यक निधीही शासनाने उपलब्ध करून द्यावा, असा ठराव या वेळी मंजूर करण्यात आला. यामुळे पनवेल महानगरपालिका भविष्यात पाणीपुरवठ्याबाबत स्वयंपूर्ण होऊ शकेल.

पनवेल महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी मागील सर्वसाधारण सभेत स्थगित ठेवण्यात आलेल्या कोंढाणे धरण पनवेल महापालिकेकडे आरक्षित करण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली. पनवेल महानगरपालिका क्षेत्रासाठी 295 दशलक्ष लिटर पाणी आवश्यक असताना सध्या 214.5 दशलक्ष लिटर पाणी प्रतिदिन उपलब्ध आहे. प्रतिदिन 80.50 दशलक्ष लिटर पाण्याची तूट आहे. पनवेल परिसरात वाढणार्‍या लोकसंख्येमुळे 2041मध्ये 543 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे 332.5 दशलक्ष लिटर पाणी अन्य स्रोतांकडून घ्यावे लागणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचा न्हावाशेवा प्रकल्प, पाटबंधारे खात्याचे हेटवणे, बाळगंगा व कोंढाणे हे स्रोत उपलब्ध आहेत. म.जी.प्रा.च्या न्हावाशेवा प्रकल्पातून 100 दशलक्ष लिटर, रोहिंजण भागासाठी आरक्षित 53 दशलक्ष लिटर पाण्यामधून 19 दशलक्ष लिटर पाणी सन 2022पर्यंत उपलब्ध होईल. कोंढाणे धरणाची वापरयोग्य पाण्याची क्षमता 271 दशलक्ष लिटर आहे. भौगोलिकदृष्ट्या जवळ असलेल्या या धरणाची मालकी सिडकोकडे आहे. त्यामुळे उर्वरित 210 दशलक्ष लिटर पाण्याच्या मागणीसाठी कोंढाणे धरण आरक्षित करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर, निलेश बावीस्कर, मनोज भुजबळ व अन्य सदस्यांनी चर्चेत भाग घेऊन या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

रोज बाजारच्या सिडकोकडून हस्तांतरित होणार्‍या जागांचे शुल्क ठरवण्यासही या सभेत मंजुरी देण्यात आली. सिडकोकडून 66 रोज बाजार महापालिकेकडे हस्तांतरित होणार आहेत. त्या ठिकाणी रस्त्यावर विक्री करणार्‍या विक्रेत्यांना बसवायचे आहे. त्यासाठी दैनंदिन भाडे ठरवण्यात आले. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी ‘पनवेलमधील मच्छी मार्केटमध्ये स्वच्छता नसते. कारण त्या ठिकाणी विक्रेते सामान ठेवत असतात. तेथे आता दररोज 100 रुपये फी ठेवावी, तसेच महापालिकेने कोल्ड स्टोरेजसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्यावर तेथे 200 रुपये फी आकारावी,’ असे सुचविले. निलेश बावीस्कर यांनी सिडकोकडून आलेल्या जागांवर फलक लावण्याची मागणी केली. 

या महासभेत गळतीच्या कारणास्तव महापालिका हद्दीत उभारण्यात आलेल्या वेदर शेडना कायमस्वरूपी मान्यता देण्यात यावी. कारण आपल्या येथे हवामानाचा विचार केल्यास इमारतीची गळती थांबवण्यासाठी वेदर शेडला पर्याय नसल्याने त्याची उंची ठरवण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली. त्या ठिकाणचा वापर व्यावसायिक कामासाठी  होणार नाही याची दक्षता घेण्याचेही सूचित केले गेले.

नवी मुंबई महापालिकेच्या बसमध्ये ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांगांना सवलत मिळावी, या आरती नवघरे यांच्या मागणीसाठी नवी मुंबई महापालिकेच्या वाहतूक समितीच्या पदाधिकार्‍यांची भेट घेऊन चर्चा करण्याचे ठरले. महापालिकेकडे हस्तांतरित झालेल्या व महापालिकेच्या मालमत्तांची दुरुस्ती, रंगरंगोटी करून मगच त्या भाड्याने देण्याचेही या वेळी ठरले. 

!पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मोठ्या झाडांमुळे झाकला गेला आहे. तो लोकांना दिसत नाही. पुतळा सर्वांना दिसावा यासाठी तेथील झाडे अन्यत्र पुनर्रोपण करून त्या ठिकाणी नवीन छोटी फुलांची आणि शोभेची झाडे लावावीत.
-परेश ठाकूर (सभागृह नेते, पनवेल मनपा)

Check Also

पनवेल-उरणच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा पाठपुरावा मुंबई : रामप्रहर वृत्तसिडकोमार्फत पनवेल व …

Leave a Reply