मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते एकामागून एक पक्षातून बाहेर पडत असताना पक्षाला आणखी एक झटका बसला आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आणि श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांनी गुरुवारी (दि. 5) आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा सोपवला.
काही दिवसांपूर्वी अवधूत तटकरे आणि त्यांचे वडील माजी आमदार अनिल तटकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली होती. तेव्हापासून ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर अवधूत यांनी गुरुवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करतील अशी चिन्हे आहेत.
राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे तटकरे कुटुंबात वाद सुरू आहेत. सुनील तटकरे यांची मुलगी जिल्हा परिषद अध्यक्ष आदिती या विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जाते. यामुळेच अवधूत नाराज होते. रोहा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीपासूनच तटकरे कुटुंबात वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद संपुष्टात आल्याचे जाहीर करण्यात आले होते, मात्र अवधूत यांनी वडिलांसह घेतलेली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट आणि त्यांनी दिलेला आमदारकीचा राजीनामा यामुळे तटकरे परिवारात सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper