Breaking News

भारत-ऑस्ट्रेलिया आज पहिली वन डे

हैदराबाद : वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला वन डे सामना शनिवारी (दि. 2) हैदराबाद येथे खेळवण्यात येणार आहे. ट्वेन्टी-20 मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी लोकेश राहुलला गवसलेला सूर ही आनंदाची बातमी आहे, पण वन डे मालिकेत संघात मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांचे पुनरागमन होणार आहे. त्यामुळे गोलंदाजीची बाजू बळकट करताना राहुलला पहिल्या वन डेत स्थान मिळेल का, याबाबतची उत्सुकता आहे. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीची ही अखेरची वन डे मालिका असल्याने प्रत्येक खेळाडू मिळणार्‍या संधीचे सोने करण्यासाठी सज्ज आहे.

वन डे सामन्यात सलामीचा विचार केल्यास कर्णधार विराट कोहलीसमोर तीन पर्याय आहेत, मात्र लोकेश राहुल, शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्यापैकी एकाला बसवण्याचा निर्णय कोहलीला घ्यावा लागणार आहे. राहुलला मधल्या फळीतही  विचार केला जाऊ शकतो, परंतु निवड समिती त्याचा तिसरा सलामीवीर म्हणून विचार करीत आहे. त्यामुळे गवसलेला सूर लक्षात घेता त्याला पहिल्या वन डेत संधी मिळाल्यास कोणाला बाकावर बसावे लागेल, हे पाहावे लागेल. दिनेश कार्तिकचा वन डे संघात समावेश करण्यात आला नसल्याने रिषभ पंतचा दुसरा यष्टिरक्षक म्हणून विचार केला होईल. अंबाती रायुडू व केदार जाधव हे दोघेही त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाठी सक्षम आहेत. त्यामुळे पंतला चौथ्या ते सातव्या क्रमांकापैकी कोठेही खेळण्याची संधी मिळू शकते.

टी-20 मालिकेत उमेश यादव व सिद्धार्थ कौल यांना साजेशी कामगिरी करता आली नाही. मोहम्मद शमीच्या पुनरागमनाने भारतीय संघाच्या गोलंदाजी विभागाला मोठा बुस्ट मिळाला आहे. उमेशचा वन डे संघात समावेश करण्यात आलेला नसल्याने सिद्धार्थला आणखी संधी मिळण्याची शक्यता आहे. युजवेंद्र चहलला वन डे मालिकेत कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाची साथ मिळू शकते, पण वन डे सामन्यात युजवेंद्र आणि कुलदीप हीच पहिली पसंती असेल. जडेजाला काही सामन्यांत संधी मिळू शकते. हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आली आहे, त्यामुळे विजय शंकरला या मालिकेत आपले नाणे खणखणीत वाजवण्याची संधी आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply