प्रा. डॉ. बापूराव शिंगटे यांचे आवाहन

खोपोली : प्रतिनिधी
कोणत्याही विषयात पारंगत होण्यासाठी दर्जेदार पुस्तकांचे वाचन आवश्यक आहे. ज्ञानाला प्रात्यक्षिकाची जोड हवी. स्वयं अध्ययनावर भर देत आपली जिज्ञासा वृत्ती जोपासून युवकांनी समाजोपयोगी असे संशोधन करावे, असे आवाहन औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील ज्येष्ठ संशोधक प्रा. डॉ. बापूराव शिंगटे यांनी खोपोलीत केले.
खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित केएमसी महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या अद्ययावत संशोधन प्रयोगशाळेच्या उद्घाटन समारंभात प्रा. डॉ. शिंगटे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या प्रयोगशाळेचा संशोधक विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी अधिकाधिक उपयोग करून घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य धनंजय हरिदास यांनी प्रास्ताविक केले. केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून मिळालेल्या 70 लाख रुपये अनुदानातून ही अद्ययावत संशोधन प्रयोगशाळा उभारण्यात आली असून, या प्रयोगशाळेमुळे भविष्यात पीएचडीपर्यंतचे शिक्षण या महाविद्यालयात उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.
संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप पोरवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात संस्थेचे कार्यवाह किशोर पाटील, मुंबई विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. रवींद्र देशमुख यांचीही समयोचित भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमोल नागरगोजे यांनी केले. डॉ. शरद पंचगल्ले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. संस्थेचे राजेश अभाणी, दिनेश गुरव, भास्कर लांडगे, संदीप पाटील, रसायनशास्र विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. व्ही. के. घोरपडे, वनस्पतीशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. केदार करंदीकर व माजी प्रयोगशाळा सहाय्यक बी. जे. कालेकर यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. खानविलकर यांनी आभार मानले.