Breaking News

‘घराणेशाही संपविण्यासाठी सज्ज व्हा’

माणगावात महायुतीचे विनोद घोसाळकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

माणगाव : प्रतिनिधी

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांच्या माणगाव कचेरी कॉर्नर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर मंगळवारी (दि. 8) शिवसेना नेते अ‍ॅड. राजीव साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीवर्धनमधील तटकरेंची घराणेशाही संपविण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन राजीव साबळे यांनी या वेळी कार्यकर्त्यांना केले. महायुतीतील शिवसेना, भाजप व अन्य सार्‍या मित्रपक्षांचे नेते व कार्यकर्ते खाद्यांला खांदा लावून काम करीत आहेत. त्यामुळे श्रीवर्धनमध्ये या वेळी कोणत्याही परिस्थितीत महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर हेच निवडून येणार आहेत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी नियोजनबध्द काम करावे, असे अ‍ॅड. साबळे यांनी सांगितले. महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांना श्रीवर्धन मतदारसंघातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यादव गवळी समाजाने महायुतीला पाठिंबा दिला आहे. विनोद घोसाळकर आणि महाड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार भरत गोगावले यांच्या प्रचारासाठी 19 ऑक्टोबरला माणगाव येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे, तसेच आमदार प्रवीण दरेकर, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, सुभाष देसाई यांच्याही जाहीर सभा होणार असल्याची माहिती माजी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी या वेळी दिली. या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख गजानन अधिकारी, भाजपचे बाळशेठ घोणे, शहरप्रमुख अजित तार्लेकर, नगरसेवक सचिन बोंबले, नितीन बामगुडे, तालुका युवा सेना अधिकारी कपिल गायकवाड, गिरीश वडके, अनिल सोनार, सुनील पवार यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply