Breaking News

वरद विनायकाच्या साक्षीने महेंद्र थोरवे यांचा प्रचाराचा शुभारंभ

खालापूर : प्रतिनिधी 

शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीचे कर्जत विधानसभा मतदारसंघातील उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या प्रचाराचा शुभारंभ अष्टविनायक क्षेत्र महड (ता. खालापूर) येथील वरद विनायकाचे दर्शन घेऊन दसर्‍याच्या मुहूर्तावर करण्यात आला. या वेळी महेंद्र थोरवे यांनी मंदिरात श्रीफळ वाढवून विधानसभा निवडणुकीत यश द्या, अशी मनोकामना व्यक्त केली. मागील 10 वर्षांपासून या मतदारसंघामध्ये भगव्या विचाराचा आमदार नाही. या वेळी शिवसेना-भाजप महायुतीच विजयी होईल असे वातावरण आहे. या निवडणुकीत आपल्यालाच यश मिळणार आहे. तरीही महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने दक्ष असणे गरजेचे आहे, असे मत महेंद्र थोरवे यांनी या वेळी व्यक्त केले. आपली महायुती अभेद्य असून, जे विरोधक आपल्यावर टीका करीत आहेत, त्यांना योग्य वेळी उत्तर देऊ. महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भाई शिंदे यांनी या वेळी व्यक्त केला. हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे. शिवसैनिक व महायुतीच्या  कार्यकर्त्यांनी मागील 10 वर्षांचा वचपा काढून विद्यमान आमदाराला घरचा रस्ता दाखवा, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख विजयभाऊ पाटील यांनी केले. भाजप तालुकाध्यक्ष बापू घारे, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख सुरेश कडव, नवीन घाटवळ, उल्हास भुर्के, तालुकाप्रमुख संतोष विचारे, उपतालुकाप्रमुख संजय देशमुख, विभागप्रमुख हुसेन खान, उमेश गावंडे, आरपीआयचे नरेंद्र गायकवाड यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, खोपोली शिळफाटा येथील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भारतीय जनता पार्टीचे श्रीकांत पुरी, माजी नगराध्यक्ष रोहिदास पाटील, खोपोलीच्या उपनगराध्यक्षा विनिता कांबळे, माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, कैलास वाडकर, शिवसेना शहरप्रमुख सुनील पाटील, उपशहरप्रमुख किशोर पाटील, युवा सेनेचे सोनू शेलार, महिला आघाडीच्या प्रिया जाधव, सुरेखा खेडकर, नरेंद्र गायकवाड यांसह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply