नागोठणे : प्रतिनिधी
महायुतीच्या माध्यमातून पेण विधानसभा मतदारसंघातून भाजपचे रविशेठ पाटील यांना पुन्हा एकदा विधिमंडळाची दारे खुली झाली आहेत. सन 2004 मध्ये निवडून गेल्यावर मंत्रिपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळताना त्यांनी नागोठणे विभागात केलेली विकासकामे स्थानिक नागरिक विसरले नसल्याने त्यांच्या विजयाने पुन्हा एकदा येथे विकासकामांची कोटीच्या कोटी उड्डाणे होणारच, असा आत्मविश्वास व्यक्त केला जात आहे.
पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून रविशेठ पाटील यांनी गतवर्षी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. या विधानसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीच्या माध्यमातून पुन्हा जनतेसमोर जाऊन यश मिळवले आहे. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आघाडीचे उमेदवार धैर्यशील पाटील यांचा सुमारे तेवीस हजार मतांनी पराभव केला आहे.
रविशेठ पाटील यांनी मंत्रिपदाच्या काळात (2004 ते 2009) नागोठणे विभागात करोडो रुपयांची विकासकामे केली होती व त्याचीच जाण ठेवून येथील जनतेने त्यांना भरभरून मते दिली आहेत, हे उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे. नागोठण्यासह विभागांतील एकूण 32 मतदान केंद्रांपैकी 22 ठिकाणी रविशेठ पाटील यांना मिळालेली आघाडी सर्वच सांगून जात आहे. नागोठणे शहरात 10 मतदान केंद्र होती. तेथील 8,688 पैकी 5,619 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यातील 3,194 मते मिळवून रविशेठ पाटील अपेक्षेप्रमाणे प्रथम क्रमांकावर राहिले असून धैर्यशील पाटील यांना 2,102 मते मिळाली. येथील काही केंद्रांत रविशेठ यांना आघाडी मिळवून देण्यात काँग्रेसचा मोलाचा हातभार लागला असल्याचे स्पष्ट होत आहे. काही काँग्रेसजनांनी त्यांना उघड उघड साथ दिली होती, तर काहींनी विकासासाठी रविशेठच पाहिजेत हा हेतू डोळ्यासमोर ठेवून मतदान केले असल्याने काँग्रेसचे भावी काळातील धोरण कसे असू शकेल, याबाबत शहरात उलट सुलट चर्चा होताना दिसून येत आहेत.
दरम्यान, येथील ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेची सत्ता असून नागोठण्याच्या विकासाला रविशेठ पाटील यांच्या विजयाने पुन्हा एकदा चालना मिळणार असल्याने शहरात एक चैतन्य निर्माण झाले असल्याचे त्यानिमित्ताने दिसून येत आहे.