मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा : मुंबईचा विजयी ‘चौकार’

मुंबई : प्रतिनिधी

कर्णधार सूर्यकुमार यादवने साकारलेल्या आणखी एका धडाकेबाज अर्धशतकाच्या बळावर मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेत पुद्दुचेरीचा 27 धावांनी पराभव केला. ‘ड’ गटात अग्रस्थानी विराजमान असलेल्या यजमान मुंबईचा हा सलग चौथा विजय ठरला.

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकांत 6 बाद 171 धावा केल्या. या वेळी सलामीवीर जय बिश्त (29) व आदित्य तरे (20) लवकर बाद झाले. श्रेयस अय्यरही (19) फारशी चमक दाखवू शकला नाही, परंतु कर्णधार सूर्यकुमार फलंदाजीला येताच सामन्याचा नूर पालटला. सूर्यकुमारने अनुभवी सिद्धेश लाडसह चौथ्या गडयासाठी 65 धावांची भागीदारी रचली. डावाच्या अखेरच्या षटकातील लागोपाठच्या दोन चेंडूंवर सागर त्रिवेदीने अनुक्रमे सूर्यकुमार आणि सिद्धेशला बाद केले. सूर्यकुमारने 37 चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांसह 57 धावा फटकावल्या. सिद्धेशने 22 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांसह 39 धावा केल्या. या दोघांमुळेच मुंबईला पावणेदोनशे धावांच्या जवळ पोहोचता आले.

प्रत्युत्तरात पारस डोग्रा (45) आणि सुब्रमणियम आनंद (39) यांनी पुद्दुचेरीतर्फे झुंजार खेळी केली. परंतु शाम्स मुलानी आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवून इतर फलंदाजांवर अंकुश ठेवल्यामुळे पुद्दुचेरीला 20 षटकांत 7 बाद 144 धावांपर्यंतच मजल मारता आली. आता गुरुवारी (दि. 14) बंगालविरुद्ध रंगणार्‍या सामन्यात सरशी साधून मुंबई विजयाचे पंचक पूर्ण करणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

संक्षिप्त धावफलक

मुंबई : 20 षटकांत 6 बाद 171 (सूर्यकुमार यादव 57, सिद्धेश लाड 39; सागर त्रिवेदी 4/29) विजयी वि. पुद्दुचेरी : 20 षटकांत 7 बाद 144 (पारस डोग्रा 45, सुब्रमणियम आनंद 39; शाम्स मुलानी 2/25).

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply