Breaking News

‘स्मार्ट वॉच’मुळे कर्मचार्‍यांचे नुकसान

नवी मुंबई : प्रतिनिधी

पालिकेच्या सफाई कर्मचार्‍यांना ‘स्मार्ट वॉच’ प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे वेळेवर पगार मिळालेला नाही, तर काहींचे वेतन कापण्यात आलेले आहे. या विरोधात गुरुवारी मुख्यालयासमोर कर्मचार्‍यांनी ठिय्या दिला आणि पालिका अधिकार्‍यांना मुख्यालयाच्या आवारातून बाहेर वा बाहेरून आत येण्यास मज्जाव केला.

नवी मुंबई पालिकेच्या मुख्यालयासमोर प्रवेशद्वार बंद आंदोलनामुळे अनेक अधिकारी कार्यालयातच अडकले. याचा फटका माजी महापौर सुधाकर सोनावणे यांनाही बसला. घनकचरा विभागाच्या अधिकार्‍यांनी ‘स्मार्ट वॉच’ प्रणालीतील त्रुटी सुधारण्याची हमी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

‘स्मार्ट वॉच’ अर्थात कामाचे ठिकाण आणि कामाची इत्थंभूत माहिती देणारे घड्याळच सफाई कर्मचार्‍यांसाठी नुकसानीचे ठरत आहे. पालिकेत सध्या 3500 हून अधिक सफाई कर्मचारी आहेत. रस्ते, उद्याने आणि मैदान अशा सर्व विभागांतील स्वच्छता कर्मचार्‍यांचा यात समावेश आहे, मात्र गेले तीन महिने अनेक कर्मचार्‍यांना वेतन मिळालेले नाही. काम करूनही त्याचा मोबदला मिळालेला नाही. सफाई कर्मचार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, कामावर उपस्थित असताना हजेरीपटावर त्याची नोंद होत नाही. प्रशासनाने काम करताना मनगटावर ‘स्मार्ट वॉच’ बांधणे बंधकारक केले आहे. कामचुकारांना वठणीवर आणण्यासाठी हा उपाय परिणामकारक असला, तरी नवी मुंबईतील गावठाण परिसर आणि खाडीकिनारी ‘स्मार्ट वॉच’ यंत्रणेतील ‘जीपीआरएस कनेक्टिव्हिटी’ गायब होत असल्याने सफाई कर्मचारी कामावर असतानाही त्यांची नोंद ‘गैरहजर’ अशीच होत आहे. त्यामुळे ‘स्मार्ट वॉच’चा उद्देश सफल झालेला नाही. घनकचरा विभागाकडून अनुपस्थिती लावल्यामुळे वेतन कमी मिळत असल्याचा दावा अनेक सफाई कर्मचार्‍यांनी केला. कर्मचार्‍यांच्या एका  शिष्टमंडळाने याबाबत उद्यान विभागाचे उपायुक्त प्रवीण काळे आणि घनकचरा विभागाचे उपायुक्त तुषार पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply