Breaking News

माणगावमध्ये कंपनीत स्फोट : 18 कर्मचारी भाजले; पाच जण गंभीर

माणगाव : माणगाव तालुक्यातील विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रात क्रिप्टझो कंपनीत शुक्रवारी (दि. 15) सायंकाळी स्फोट होऊन लागलेल्या आगीत 18 कर्मचारी भाजले आहेत. जखमींना तातडीने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

क्रिप्टझो कंपनी फायर ब्रिगेडसाठी आग विझवण्याची सिस्टीम बनविण्याचे काम करते. या कंपनीत अनेक कर्मचारी काम करतात. कंपनीतील एका प्लान्टमध्ये शुक्रवारी सायंकाळी 4च्या सुमारास अचानक स्फोट झाला. त्यानंतर या खोलीतून आगीचा लोळ बंद दरवाजा तोडून बाहेर आला. बाहेरील खोलीत टेस्टिंगचे काम करणार्‍या 18 कर्मचार्‍यांच्या अंगाला या आगीची झळ बसून ते भाजले. या कर्मचार्‍यांनी आरडाओरडा करताच इतर ठिकाणी असणार्‍या कर्मचारी व अधिकार्‍यांनी त्या प्लान्टकडे धाव घेतली. जखमी कर्मचार्‍यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

या दुर्घटनेत सुनील किसन रेणोसे (वय 36, रा. भागाड, ता. माणगाव), चेतन बाळाराम करकरे (26, माणगाव), राकेश हळदे (30, उंबर्डी, ता. माणगाव), कैलास पाडावे (32, शिरवली, ता. माणगाव), आशिष (पूर्ण नाव माहित नाही) हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत, तर उर्वरित जखमींमध्ये शुभम रमेश जाधव (23, महागाव ता. सुधागड), सुरज बाळाराम उमटे (23, रा. भाले, ता. माणगाव), किशोर यशवंत कारगे (30, शिरवली, ता. माणगाव), रूपेश लक्ष्मण मानकर (25, रा. बोंडशेत ता. माणगाव), सुरेश सुभाष मांडे (24, नांदगाव, ता. पाली), प्रसाद पुंडलिक नेमाणे (23, कुडली ता. रोहा), वैभव संजय पवार (26, शिरवली, ता. माणगाव), राजेश रमेश जाधव (28, रा. रवाळजे, ता. माणगाव), आकाश दिलीप रक्ते (20, भागाड, ता. माणगाव), मयूर विष्णू ताम्हणकर (24, विळे, ता. माणगाव), रजत बाळकृष्ण जाधव (22, कुडली, ता. रोहा), प्रमोद काशिराम म्हस्के (23, मुगवली, ता. माणगाव), सुहीत केशव पाटील (25, माणगाव) यांचा समावेश आहे.

स्फोटाचे वृत्त समजताच माणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी तातडीने घटनास्थळी व उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन भाजलेल्या कर्मचार्‍यांची विचारपूस केली. त्याचबरोबर तहसीलदार प्रियांका अयरे, निवासी नायब तहसीलदार बी. वाय. भाबड यांनीही जखमींची विचारपूस केली. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply