इंदूर : वृत्तसंस्था
सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेल्या विराट कोहलीने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. भारताने बांगलादेशचा एक डाव आणि 130 धावांनी पराभव केला. या विजयाबरोबरच विराट प्रतिस्पर्धी संघाला सर्वाधिक वेळा डावाने मात देणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दहावेळा प्रतिस्पर्धी संघाचा डावाने धुव्वा उडवला आहे. या जबरदस्त कामिगीरीसोबतच विराटने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले आहे. धोनीने भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करताना नऊ वेळा भारतीय संघाला डावाने विजय मिळवून दिला होता. धोनीनंतर या यादीत मोहम्मद अझरुद्दीन आणि सौरभ गांगुलीचा नंबर लागतो. अझर आणि गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने क्रमश: आठ आणि सातवेळा डावाने विजय मिळवले आहेत.