जेएनपीटी : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील वेश्वी येथे उभारण्यात आलेल्या डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वाराचे लोकार्पण निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. सरपंच विलास पाटील यांनी उरण परिसरात अनेक समाजाभिमुख उपक्रम राबवून आपल्या गावातील ग्रामस्थांना एका छत्राखाली आणण्याचे महान कार्य केले, तसेच त्यांना भेडसावणार्या समस्यांचे निवारण करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे वेश्वी गावचे सरपंच विलास पाटील यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार पद्मभूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी वेश्वी गावचे सरपंच विलास पाटील यांच्या कार्याचे कौतुक करताना काढले. या प्रसंगी भाजपाचे नेते संदीप पाटील, माजी सरपंच विजय पाटील, उपसरपंच शुभांगी स्वप्निल मुंबईकर, विद्याधर मुंबईकर, ग्रामपंचायत सदस्य अजित वसंत पाटील, संदेश लक्ष्मण कोळी, निशा संतोष पाटील, कल्पना प्रल्हाद कासुकर, नरेंद्र शंकर मुंबईकर, लक्ष्मी राम कातकरी, महेंद्र मुंबईकर, के. बी. पाटील तसेच ग्रामस्थ आणि 500 दासभक्त उपस्थित होते. लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सिडकोचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटी बंदराचे ट्रस्टी महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांना भेडसावणार्या समस्यांचे निवारण करण्याचे काम हाती घेतले आणि गावातील ग्रामस्थांना एका छत्राखाली आणून गावात स्मशानभूमीची, सभा मंडपाची, बसथांब्याची उभारणी करून महाराष्ट्रभूषण आदरणीय तीर्थरूप डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार या दोन कमानींची उभारणी तीर्थरूप आप्पासाहेब धर्माधिकारी आणि वेश्वी ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली केली. वेश्वी, दादरपाडा येथे उभारण्यात आलेल्या दोन प्रवेशद्वारांचे उद्घाटन माजी सरपंच विजय पाटील आणि स्वत: सरपंच विलास पाटील यांच्या हस्ते सचिन धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी सरपंच विलास पाटील यांनी वेश्वी ग्रामस्थ तसेच दासभक्तांचे आभार व्यक्त केले.