नगरसेविका कुसुम पाटील यांची मागणी
कळंबोली : प्रतिनिधी
खांदा कॉलनीत सिग्नल यंत्रणनेजवळ वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी नगरसेविका कुसुम पाटील यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्याकडे केली आहे. या वसाहतीत एक लाखाच्यावर लोकवस्ती आहे. या वसाहतीला लागून व या रस्त्यावर अनेक गावे येत असल्याने बाजारपेठ आहे म्हणून खांदा कॉलनीला जास्त पसंती दिली जाते. वेळ व पैशाची बचत म्हणून तळोजा औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात जाण्यासाठी सर्रास याच मार्गाचा वापर केला जातो. तर याच परिसरात शाळा, कॉलेज, महाविद्यालयाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी विद्यार्थी व महिलांना रस्ता ओलांडनेही अवघड बनले आहे. या ठिकाणी अनेक वेळा अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावा लागले आहेत तर काहींना आपले अवयव गमावण्याची वेळ आली आहे. यावर रामबाण उपाय म्हणून नागरिकांच्या मागणी नुसार छत्रपती शिवाजी महाराज चौकात सिग्नल यंत्रणा सुरु करण्यात आली आहे, त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला होता, परंतु अनेक वाहन चालक सिग्नल यंत्रणेचे नियम पायदळी तुडविताना दिसत आहेत. त्यामुळे वाहन चालक, पादचारी यांना जावे की न जावे असा अवस्थेत अपघात होत आहे. तेव्हा सिग्नल यंत्रणा तोडणार्यावर दंडात्मक कारवाई करून वचक बसून त्यातून धडा मिळणार आहे. तेव्हा नव्याने सुरु झालेल्या या सिग्नल यंत्रणेजवळ काही दिवसासाठी त्वरीत वाहतूक पोलिसाची नेमणुक करावी अशी मागणी नगरसेविकाकुसुम पाटील यांनी पोलिसांकडे केली आहे.
वाहनचालकांना जरब बसण्याची गरज
खांदा कॉलनी वसाहतीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. या ठिकाणी अपघातही होऊन अनेकांना जीव गमावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरीक व सामाजिक कार्यकर्त्यांनी या चौकात सिग्नल बसविण्याची मागणी केली होती, त्या मागणीनुसार येथे सिग्नल यंत्रणा कार्यान्वीत झाली. परंतु सिग्नल यंत्रणेजवळ अनेक वाहनचालक बेकायदेशीरपणे सिग्नल तोडताना दिसत आहे. त्यामुळे छोटे मोठे अपघात होतच आहेत. अशा वाहनचालकांना जरब बसावी यासाठी सिग्नल यंत्रणनेजवळ वाहतूक पोलिसांची नेमणुक करण्याची गरज आहे.