गुलाबी थंडीने वातावरण प्रफुल्लित


कर्जत : बातमीदार
गिरीस्थानावर वसलेले पर्यटनस्थळ म्हणून माथेरान शहर प्रसिद्ध आहे. परिसरातील घनदाट जंगलामुळे येथे गुलाबी थंडीचे प्रमाण जास्त असते. या वेळी सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करणारी रात्र माथेरानकरांसाठी व पर्यटकांसाठी थंडीची रात्र ठरली. 31 डिसेंबरला माथेरानचे तापमान 12.4 अंशावर घसरल्याने पर्यटकांनी गुलाबी थंडीचा मनमुराद आनंद घेतला. चार दिवसांपूर्वी मिनिट्रेन सुरू झाली व 31 डिसेंबरच्या रात्री पर्यटकांनी येथील गुलाबी थंडी अनुभवली. 31 च्या दिवशी पाच हजार दोनशे पर्यटक माथेरानला आले होते. माथेरानमध्ये आज सकाळी 12.4 अंश इतकी तापमानाची नोंद झाली. सरत्या वर्षातील ही नीचांक नोंद असून, पुढील काही दिवसात माथेरानचे तापमान यापेक्षाही खाली येऊ शकते, अशी माहिती तापमान निरीक्षक अन्सार महापुळे यांनी दिली.
माथेरानमध्ये दाखल झाल्याझाल्या आम्हाला मिनिट्रेन, गुलाबी थंडी आणि 31 चे सेलिब्रेशन असा तिहेरी संगम अनुभवण्यास मिळाला. यामुळे माथेरानची पिकनिक पैसे वसूल झाली. त्यामुळेच माथेरानमध्ये वारंवार यावेसे वाटते.
-आशिष वंजारे, पर्यटक, मुंबई